09 April 2020

News Flash

दृष्टिकोन बदला..

रात्रजीवन व अशा सोहळय़ांना प्रोत्साहन देत मुंबईकरांना वास्तवापासून दूर नेणे हाच आजचा प्रागतिक विचार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

आपल्या देशात लोकशाही येऊन जुनी झाली, पण विलायती राजेशाहीचे आकर्षण अद्याप अनेकांच्या मनात कायम आहे. त्यातही या आकर्षणाचा कर्ताधर्ता युवराज असेल तर मग काही बघायलाच नको! भलेही मुंबईचे लंडन आम्ही करू शकलो नाही, तशा सोयी व पायाभूत सुविधा देऊ शकलो नाही, तरीही ‘चेंज ऑफ गार्ड’चा सोहळा पाहायला आता मराठीजनांना लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसकडे फिरकावे लागणार नाही. तो मुंबईतच दिसेल. येत्या महाराष्ट्र दिनापासून कडक शिस्तीत उमटणारे कवायतींचे आवाज आपल्या कानावर आदळू लागतील. हे स्वप्न युवराजाचेच असल्याने तमाम मराठी मनांना त्याचे स्वागत करणे अनिवार्य आहे. काही शतकांपूर्वी राजेशाहीच्या काळात या प्रथांनी जन्म घेतला. त्यामागचे कारण स्पष्ट होते. राजाचा सन्मान केलाच पाहिजे हे जनतेच्या मनावर कायम बिंबवत राहणे. लोकशाही आली तरी सामान्यांना वास्तवापासून दूर नेणे, भ्रामक कल्पनांच्या जगात वावरायला लावणे हे जे राजेशाहीच्या काळात चालायचे तेच आताही सुरू आहे. तेव्हा राज्यव्यवस्थेच्या चर्चेत न पडता या सोहळय़ाचे स्वागत व्हायला हवे. नुसते चेंज ऑफ गार्डच का, चेंज ऑफ अ‍ॅटिटय़ूड का नाही असाही प्रश्न काही बोरूबहाद्दर विचारू शकतात. अशा विघ्नसंतोषींकडे दुर्लक्ष करणे हेच उत्तम. शेवटी दृष्टिकोन काय? केव्हाही बदलता येतो. युवराजाचे डोळे वटारणेसुद्धा त्यासाठी पुरेसे असते. अशा वेळी पोलीस दल जनताभिमुख झाले का? त्यांची वागणूक सौजन्यशील आहे का? ब्रिटिश ‘बॉबीं’सारखे आपले सखाराम जंटलमन झाले का? यासारखे प्रश्न फिजूल ठरतात. शेवटी पर्यटन महत्त्वाचे. त्यातून होणारी आर्थिक उलाढाल महत्त्वाची. भलेही हा सोहळा बघण्याची इच्छा असलेल्यांना मुख्यालयात जाण्यासाठी ट्रॅफिक जामसकट अनंत अडचणींचा सामना करावा लागला तरी चालेल. तसेही बॅण्डचे आकर्षण आपल्याला जुनेच. रस्त्यावरून साधी वरात जात असली तरीही थांबून बघण्याची आपली सवय अतिशय पुरातन. त्यामुळे या सोहळय़ाला लोक पदरमोड करून नक्की येतील यात कुणी शंका घेण्याचे कारण नाही. तसेही युवराजांच्या प्रस्तावावर शंका घेण्याची कोणाची काय बिशाद म्हणा! तिकडे ब्रिटनमध्ये एक युवराज राजघराण्याची वस्त्रे उतरवून ठेवत असताना आपल्या युवराजाला त्याच राजघराण्याची राजेशाही परंपरा जोपासावीशी वाटणे हाच खरा आधुनिक दृष्टिकोन व हेच सत्तांतराचे मर्म! त्यामुळे या सोहळय़ाचे स्वागत करणे हे आपले नैतिक कर्तव्यच ठरते. बाकी मुंबापुरीतले प्रवाशांचे लोंढे, पायाभूत सोयींची वानवा या समस्या पाचवीला पुजलेल्या आहेतच. त्या काय केव्हाही सोडवता येतील. रात्रजीवन व अशा सोहळय़ांना प्रोत्साहन देत मुंबईकरांना वास्तवापासून दूर नेणे हाच आजचा प्रागतिक विचार आहे. याला कुणी प्रतिगामी म्हणालेच, तर इतक्या पुरोगामी राज्यात एखादा प्रतिगामी सोहळाच कसा खुपतो? हेच का दिसते? ते का नाही? या प्रश्नांची सवय आपल्याला आहेच! तेव्हा, मुंबईतला हा सोहळा हे लंडनच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. हे सर्वसामान्यांनी लक्षात घ्यावे. आता राहिला राहिला दृष्टिकोनातील बदल, तो काय केव्हाही करता येईल. युवराजांच्या मनात तर येऊ द्या!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2020 2:20 am

Web Title: change of guard ceremony at the maharashtra police headquarters like london s buckingham palace zws 70
Next Stories
1 गरिबी हटाव!
2 हेही शिकवूच त्यांना..
3 .. ते शब्द हरवले कोठे?
Just Now!
X