इच्छाशक्ती प्रबळ असली की एखादी असाध्य गोष्टसुद्धा सहज शक्य होऊन जाते. चलनातून बाद होऊ घातलेले अणे नावाचे एक नाणे याच इच्छाशक्तीच्या जोरावर आज पुन्हा खणखणू लागले आहे. स्वतंत्र राज्यासाठी विदर्भात गेली कित्येक वर्षे गरजेनुसार आणि राजकीय सोयीनुसार आंदोलनांचे झेंडे फडकवले गेले असतील, पण अणे यांनी मात्र, सुरीच्या एका घावात महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा करून दाखविला. खरे म्हणजे, याचे श्रेय मनसेप्रमुख राजसाहेब ठाकरे यांना दिलेच पाहिजे. राज्य वेगळे करणे हे वाढदिवसाचा केक कापण्याएवढे सोपे वाटते का असा सवाल राजसाहेबांनी केला नसता, तर कित्येक वर्षांपासूनचे हे भिजत घोंगडे मेणबत्तीच्या मिणमिणत्या उजेडात सहजपणे पार पाडणे श्रीहरी अणेंना साधले असते की नाही याबद्दल शंकाच आहे. वेगळे राज्य कसे करायचे याची सोप्पी युक्तीच राज ठाकरे यांनी अणे आणि विदर्भसमर्थकांसमोर ठेवली आणि हा हा म्हणता केकच्या नकाशावरून विदर्भाचा भाग वेगळा काढून अणे यांनी आपल्या अतृप्त इच्छापूर्तीच्या नंदनवनात वावरण्याचा अवर्णनीय आनंदाचा आस्वाद घेतला. वाढदिवसाच्या त्या रात्री रविभवनाच्या सभागृहात नेमके काय झाले हे कुणालाच माहीत नाही. पण तसेही, स्वातंत्र्याची आंदोलने अशी अंधाऱ्या रात्री आणि गनिमी काव्यानेच लढावयाची असतात, हा इतिहासाचा धडा अणे यांना पाठच असल्याने त्यांनी ज्या गनिमी काव्याने विदर्भाला महाराष्ट्रापासून वेगळे काढून दाखविले, त्याला तोड नाही. आता स्वतंत्र विदर्भाच्या या अनोख्या आंदोलनातून मिळालेल्या धडय़ाचे अनुकरण वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या विचारांच्या आणि सुप्त इच्छाशक्तीचे दृश्य आविष्कार दाखवू पाहणाऱ्या साऱ्यांनाच करता येणार आहे. स्वतंत्र होणे किंवा जोडणे हे केक कापण्याएवढे सोपे करून, काहीतरी ‘करून दाखविण्या’चा ध्यास घेणाऱ्या अनेकांना करून दाखविण्याचा साधासोपा मार्ग श्रीहरी अणे यांनी दाखवून दिला आहे. बेळगाव-कारवार-निपाणी-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीचे सूर गेल्या पाच दशकांपासून महाराष्ट्रात घुमत असले तरी त्याला नैतिक पाठिंबा देणाऱ्यांनी ताकास तूर लागू दिलेली नाही. ‘अणेमार्गा’चा अवलंब करून संयुक्त महाराष्ट्राचा केक तयार करण्याचा सोपा मार्ग निवडला, तर आंदोलने करण्याची गरजच उरणार नाही. आंदोलनांच्या इतिहासाला नवी दिशा दिल्याबद्दल तमाम आंदोलनकारी प्रवृत्तींनी तसेच, खुंटीवर लटकावून ठेवल्या गेलेल्या मागण्यांकडे वर्षांनुवर्षे पाहून थकलेल्यांनी आता केक कापावेत किंवा वेगवेगळे केक जोडून आपल्या प्रबळ इच्छाशक्तीचा आविष्कार घडवावा. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा एका केकच्या तुकडय़ातून निकाली काढणाऱ्या अणे यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता अखंड हिंदुस्थानाचे स्वप्नदेखील साकार करणे शक्य होईल. राजकारणात कुणीतरी टीकेच्या निमित्ताने का होईना, नेमकी दिशा दाखवून जातो आणि असाध्य ते साध्य केल्याचे समाधान कुणाला तरी मिळते, ते असे!