‘माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनींनो. आजवर आम्ही बहुतेक सगळ्या महत्त्वाच्या लढाया मिळून लढल्या, पण या वेळी आम्ही एकटय़ाने लढतोय. आम्ही मागे हटणार नाही. ही लढाई आम्ही एकटय़ाने लढू आणि जिंकून दाखवू. गेली २५ वर्षे या लोकांनी हे शहर सडवले.’ लोकांमधून प्रश्न.. ‘तुम्ही काय करीत होतात मग २५ वर्षे?’ ‘मला वाटलेच होते असा प्रश्न तुम्ही विचाराल. २५ वर्षे आमचे हात त्यांच्या हातात होते हे खरे आहे. पण त्यांचे हात भ्रष्टाचारात बरबटले आहेत. आमचे हात स्वच्छ आहेत.’ लोकांमधून प्रश्न.. ‘मग त्यांचा भ्रष्टाचार थांबवला का नाही तुम्ही?’ ‘मला वाटलेच होते असा प्रश्न तुम्ही विचाराल. तर त्याचे काय आहे..’ (पुढे ते काय बोलत आहेत हेच कळत नाही. दळण दळल्यासारखा घोगरा आवाज केवळ ऐकू येतो. समोरील ग्लास उचलून ते त्यातील पाणी पितात.) ‘मी तुम्हाला शब्द देतो. आमचा कारभार त्यांच्यासारखा अपारदर्शी नसेल. टेंडरे कशीही हाकायचे ते. आमचे तसे नसेल. नियम म्हणजे नियम.’ लोकांमधून आवाज.. ‘अहो मग त्या टेंडरांना वठणीवर का नाही आणले तुमच्या माणसांनी?’ ‘मला वाटलेच होते असा प्रश्न तुम्ही विचाराल. आम्ही किती प्रयत्न करायचो त्यांना रोखण्याचा. पण त्यांच्याकडे मनुष्यबळ होते ना. त्यापुढे काय चालणार आमचे?’ लोकांमधून आवाज.. ‘मग तुमच्या लोकांनी असल्या अपारदर्शी कारभारास साथ देण्यापेक्षा राजीनामा का नाही दिला?’ ‘मला वाटलेच होते असा प्रश्न विचाराल तुम्ही. त्याचे काय आहे..’ (ग्लास उचलून ते पाणी पितात आणि बोलायला सुरुवात करतात. त्यातील एक अक्षरही कळत नाही. वॉशिंग मशीन लावल्यावर येतो तसा काही तरी अगम्य आवाज केवळ.).. ‘आता तरी कळला असेल तुम्हाला सारा प्रकार. म्हणूनच सांगतो तुमच्या शहराची सूत्रे आमच्या हाती द्या.’ लोकांमधून आवाज.. ‘पण तुमचा भरवसा काय? गेल्या वेळीही तुम्ही असेच म्हणत होतात. वेगवेगळे लढलात. पण नंतर पुन्हा एकत्र आलात. आत्ताही तसेच होणार नाही याची खात्री काय?’ ‘मला वाटलेच होते असा प्रश्न विचाराल तुम्ही. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा तेवीस पूर्णाक तीन दशांश..’ (पुढे ते काय बोलतात ते कळत नाही. मिक्सर चालू असावा असा आवाज केवळ. ते ग्लासातले पाणी पितात.) ‘म्हणून तसा निर्णय घ्यावा लागला.’ तेवढय़ात समोरच्या गर्दीतून घर्र.. असा मोठ्ठा आवाज येतो. ते क्षणभर दचकतात. गर्दीकडे रोखून पाहू लागतात. अनेक जण काही तरी बोलत असतात. बोलणाऱ्यांच्या चेहऱ्यावर जाब विचारत असल्याचा भाव. मात्र ते काय बोलत आहेत तेच कळत नाही. घरघंटीसारखा आवाज केवळ. ते त्यांच्याकडे पाहून गालातल्या गालात हसतात. ग्लासातले पाणी एका दमात पिऊन टाकतात आणि भाषण संपवून आपल्या जागेकडे वळतात..