‘‘दोन दिवस पाहात्येय, दुपारभर नुसता खेकसून बोलत असतोस. डबा घासतोस ना स्वत:चा ऑफिसात? मग इथे ताट सिंकमध्ये ठेव म्हटलं तर म्हणे मीच भांडते?’’ – डायनिंग टेबल पुसता पुसता ती बोलत होती.. त्याला ऐकू जात असेल पण तो ऐकणार नाही याची खूणगाठ बांधूनच, जणू स्वत:शीच! ‘‘काल मायक्रोवेव्हमध्ये भाजी तशीच. तीही मीच काढायची. कामं कर ना म्हणे.. मी करतेच! सांगावं लागतं ते तुला. तेही तू ऐकत नाहीस.. मीही ऑफिसची कामं सांभाळत्येय.. मेल्स बघायच्यात मलापण आत्ता’’ – बोलत बोलत बाल्कनीचे स्लायडिंग दरवाजे ओढून घ्यायला जाता जाता तिनं, अभ्यासाच्या टेबलाशी पाठमोरा बसलेल्या त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या लॅपटॉपवर त्या नेहमीच्या चौकटी दिसत नव्हत्या एक्सेलच्या. त्याऐवजीच काही तरी.. बहुतेक बातम्या असाव्यात. जाऊ दे. आपण नाही बोलायचं आता, असं मोठय़ा संयमानं ठरवत ती आतल्या खोलीत, संगणकापाशी गेली. ऑफिसचा मेल रिफ्रेश केला तोच जीमेलचं नोटिफिकेशन – ‘तुम्हाला आले आहेत तीन नवे मेल’ असं इंग्रजीत. तिन्ही त्याचेच? घरातल्या घरात ईमेल? ‘कायै बघू..’ मनाशी म्हणत तिनं मेल उघडले एकापाठोपाठ. तिन्हीवर नुसत्या लिंक्स! कुठल्या संकेतस्थळांचे हे दुवे? तिनं लिंका क्लिक केल्या तर तीच पानं उघडली.. त्याच्या लॅपटॉपवर दिसलेली. ‘कायै बघू..’

लिंकवरली पहिली बातमी होती चीनच्या आग्नेय भागातल्या सिचुआन प्रांतातल्या दाझू का कुठल्याशा शहरात, करोना विषाणूमुळे ‘विलगीकरण’ म्हणून एकत्र ठेवलेल्या जोडप्यांनी १४ दिवस संपल्यावर घटस्फोटाचे अर्ज केले होते त्याची. किती होते अर्ज? तीनशे! ‘आपण चीनच्या आग्नेय भागातल्या सिचुआन प्रांतातल्या दाझू का कुठल्याशा शहरात राहात असतो तर’? हा विचार फेकून देत लगेच दुसरी बातमी नजरेसमोर : ती ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समधली. या ब्रिटिश उमराव सभेतली एक फिओना शॅकल्टन नावाची उमरावबाई घटस्फोटाच्या प्रकरणांची वकीलसुद्धा आहे. लेडी डायना, मॅडोन्ना यांचे घटस्फोट घडवले या फिओनाताईंनी. त्या थेट उमराव सभेत भाषण करताहेत की, नवराबायको दोघेच घरी राहात असतील तर या करोनाच्या १४ दिवसांनंतर घटस्फोटांचं प्रमाण ब्रिटनमध्येही वाढेल! बातमीतून अभ्यासूपणा कळत होता ताईंचा. तर तिसरी बातमी : नेब्रास्का विद्यापीठातल्या मनोविज्ञान संशोधन केंद्राचा प्रमुख डेव्हिड केट्स चीनमधल्या घटस्फोटांबद्दल बोलताना शांक्सी प्रांताचा उल्लेख करतो आणि म्हणतो- अमेरिकेतसुद्धा हेच होण्याची शक्यता आहे. जोडपी ताण सहन करू शकत नाहीत..

‘याला गरज काय असलं काहीबाही पाठवायची? ते काही नाही. मुलीला उद्यापासून आजीकडे बिजीकडे काही ठेवायचं नाही. राहू दे घरात. करू दे आवाज.. याला काय त्रास व्हायचा तो होऊ दे..’ – हा विचार करताना ती जवळपास थरथरतच होती; हे खोलीत तो अचानक आल्यामुळे ती रक्तप्रवाह थांबल्यासारखी स्तब्धावली तेव्हा तिच्या लक्षात आलं. ‘‘काही नाही, सांगायला आलोय, आई येतेय आत्ताच तिला घेऊन. मग संध्याकाळी आपण तिघंही जाऊ या आईला सोडायला.’’

..हा प्रसंग जुन्या मराठी कथाबिथांमधला असता तर ‘ती त्याला बिलगली’नं शेवट झाला असता.. पण तिची प्रतिक्रिया न पाहता हा गेलासुद्धा निघून त्याच्या लॅपटॉपकडे..