दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना अंधार कवा झाला ते मिनिष्टर पाटलांच्या ध्येनातच आलं न्हाई.. ढोरवाडीचा संवाद संपवून पाटीलसायेब गाडीत बसले, अन् अंधारातनं वाट काडत गाडी फुडच्या गावात जाधवांच्या शिवारात पोचली. गाडीतून भायेर येत सायेबानं सवयीनं केसावर कंगवा फिरिवला, आन् कापडं ठाकठीक केली.. ‘सायेब, रातीच्या टायमाला आंधारात कोन बगनार हाय..’  पीये सायबाच्या कानात कुजबुजला. ‘ठीकाय,’ म्हनून सायबांनी दोन पावलं फुडं टाकली. आसपास मानसं गोळा झाल्याली अंधारातपन समजत व्हती. येकजन फुडं आला. त्यानं सायबाचा चरनस्पर्श केला.. सायेब थबकलं.. लागलीच पाय मागं घ्यून सायबांनी कापऱ्या आवाजात इच्यारलं, ‘कोन हाय?’.. अंधारातून आवाज आला, ‘सायेब म्या, सरपंच.. आमच्या गावात तुमचं स्वागत हाय’.. वळखीचा आवाज आयकून सायेब सावरले. त्यांनी खिशातला मोबाइल काडला, आनि त्येचा उजेड सरपंचाच्या त्वांडावर मारून सायेब सोताशीच खदादा हासले.. ‘चला वावरात.. पाहणी करून घ्यू.. काय म्हन्ते तुमचे गाव?.. काय म्हन्ते राजकारन?’.. अंधारातच मोबाइलच्या प्रकाशात एकएक पाऊल दमानं फुडं टाकत सायेब सरपंचाशी बोलत व्हते. मागून गावातली काय चारपाच मान्सं आदबीनं पीयेसोबत चालू लागली, आन् सायबाचा दुष्काळी पाहणी दौरा सुरू झाला. सरपंच सायबासंग चालत व्हता. पायाखाली काय जनावर फिनावर यू नये म्हनू सरपंचानं आपल्या मोबाइलची ब्याट्रीबी चालू केली, आणि पावलाखाली पुरेसा प्रकाश होताच सायेब शिवारातून चालू लागले. अंधारात वावरातलं कायच दिसत न्वहतं.. ‘सायेब, बगा तुमीच आपल्या डोळ्यांनी’. सरपंच केविलवाण्या आवाजात बोलत व्हतं, आनि सायेब अंधारातूनच लांबवर पाहायचा प्रयत्न करत व्हते.. आपन शिवारातनं चालतुया, का रस्त्यातनं त्येचा कायबी अंदाज सायबास्नी येत न्हवता.. तरी मोबाइलच्या ब्याट्रीच्या उजेडात दुष्काळ पाहणी दौरा सुरूच व्हता. ‘गावातलं दोनचार बातमीदारपन सोबत हायती’.. सरपंचानं हळूच सायबाच्या कानात सांगितलं, आनि सायब गंभीर झालं.. ‘उद्याच्याला पेपरात बातमी येनार’.. सायबानं मनातल्या मनात स्वत:लाच बजावलं, आनि वाटंतच थांबून त्यांनी गावकऱ्यांशी संवाद सुरू केला. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. सरपंचानं पुन्हा वावरावर मोबाइलची ब्याटरी मारली, आनि सायेब सोताशीच चुकचुकलं.. ‘उद्याच्याला दुष्काळाचा सविस्तर रिपोर्ट तयार करून ठेवा. सादर करायला हवा’.. सायेबानं अंधारातच पीयेच्या दिशेनं अंदाजानं मान फिरिवली, आणि पीयेला दम भरला. पीयेनं अंधारातच मान हलविली. मग सायेब शिवारात येका बांधावर थांबलं. ‘कोन बातमीदार हायेत?’.. अंधारातच त्यांनी इच्यारलं, आनि दोगंजन फुडं आलं. सायेबानं मोबाइलची ब्याट्री तोंडावर मारली, आन् ते समाधानानं हासले. ‘..आज आम्ही या भागाचा दुष्काळी दौरा केला, गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या व्यथापन जानून घेतल्या. दुष्काळाच्या काळात आमी त्येंच्या पाठीशी ठाम हुबं ऱ्हानार’.. सायबांनी बातमीदारांस्नी सांगितलं, आनि मोबाइलच्या ब्याट्रीच्या प्रकाशात झपाझप चालत जाऊन सायेब गाडीत बसले.. गाडी सुरू झाली. गाडीच्या लायटीचा झगझगीत प्रकाश पडला. पारावर गप्पा मारत बसल्याला म्हाताऱ्या नाना आणि आण्णाच्या तोंडावर त्याचा झोत आला, आनि त्ये गांगरले. ‘कोन आलं म्हनं रातीच्या टायमाला गावात?’.. नानांनी आण्णाला इच्यारलं. ‘मिनिष्टर हायती. दुष्काळा दौरा काहाडलाय गावात’. आन्ना म्हन्लं, आणि नानांनी कपाळावरचा हात मागं घेत मान हालिवली..