अगोदरच मतदान यंत्रांच्या कपाळावर अविश्वासाचा शिक्का बसलेला असताना, तो पुसून टाकण्याऐवजी त्या संशयात भर घालणारे काहीही घडले, तर त्या यंत्रांना दोष देण्यात काय अर्थ आहे? सोमवारी पार पडलेल्या पोटनिवडणुकांमध्ये पुन्हा एकदा या यंत्रांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. मतदान यंत्रे बिघडली, त्याला जोडलेली मत-पडताळणी यंत्रे काम करेनाशी झाली, आणि ‘हे काही फार गंभीर नाही’ म्हणून निवडणूक आयोगाने हात झटकले. ही मत-पडताळणी यंत्रे म्हणजे, मतदान यंत्रावरील संशयाचे ढग बाजूला करण्याचा खासा उपाय होता. पोटनिवडणुकीत तीच यंत्रे संशयात सापडली. निवडणुकीच्या काळात सारे वातावरणच तापलेले असते. कोणत्याही मोसमात निवडणुका घेतल्या, तरी हवामान ‘तप्त’च असते, हे निवडणूक आयोगास माहीत असावे. म्हणूनच, ही यंत्रे वापरात आणण्याआधी त्यांची चाचणी घेतली होती, असे म्हणणारा आयोगच पुढे हवामानाला दोष देतो. लेहच्या कडाक्याच्या थंडीत आणि जेसलमेरच्या कडक उन्हाळ्यातही ही यंत्रे परीक्षेत पास झाली होती. शिलाँगच्या दमट हवेलाही या यंत्रांनी दाद दिली नव्हती. मग भंडारा-गोंदियाच्या उन्हाळ्यात मात्र, या यंत्रांमधील कागद वितळला असे म्हणतात. कारण काहीही असले, तरी यंत्रे बंद पडली हे खरे असल्याने, आता नेहमीप्रमाणे त्याची कारणे शोधणे हे एक काम ओघानेच येते. या यंत्रांची एक गंमत असते. सत्ताधारी पक्ष आणि विरोधक या दोघांनाही ती सोयीनुसार आपली वाटतात. आजचे सत्ताधारी जेव्हा विरोधात होते, तेव्हा या यंत्रांवर त्यांनी संशयाचा शिक्का मारला होता, आणि आज विरोधक असलेले सत्ताधारी तेव्हा या यंत्रांची तारीफ करीत होते. पण आता सत्तेवर असलेल्या तेव्हाच्या विरोधकांचा या यंत्रांवर कमालीचा विश्वास आहे आणि विरोधकांना कधी कधी ही यंत्रे शत्रूसमान भासू लागली आहेत. मंगळवारच्या पोटनिवडणुकीत मात्र, मतप्रक्रिया पूर्ण होण्याआधीच अनेक यंत्रांनी असहकार पुकारला. तापलेल्या राजकीय वातावरणात या यंत्रांची यंत्रणा बंद पडली आणि दोष हा कुणाचा यावर चर्चा सुरू झाली. मतदान यंत्रे निदरेष आहेत, त्यात गडबड करता येत नाहीत, यावर आयोग ठाम असल्याने, हा दोष यंत्रांचा, की ती हाताळणाऱ्या यंत्रणेचा, हा प्रश्न आता सोडवावा लागेल. यंत्रांमधील बिघाड हे षड्यंत्र तर नाही ना, या प्रश्नाचे उत्तर आयोगाला द्यावे लागेल. मतदारांना मताची पावती देणारी, म्हणजेच मत-पडताळणी करणारी ती ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रप्रणाली नव्यानेच वापरात आणल्याने, ती वापरण्याचा अनुभव नसलेल्यांकडून काही तरी गोंधळ झाला असावा अशी शंका आयोगातील माहीतगारच आता घेत आहेत. मतदाराच्या दृष्टीने निवडणूक हा भले एक दिवसाचा राजयोग असला, तरी राजकीय पक्षांच्या आणि त्यांच्या उमेदवारांच्या दृष्टीने उभ्या भविष्याचा प्रश्न असतो. बिघाड यंत्रांचा असो किंवा यंत्रणेचा असो. त्या बिघाडामुळे यंत्रांबरोबर यंत्रणेच्या विश्वासार्हतेला पणाला लावण्याचे कारण नसते. यंत्रे तर केवळ हुकमाचे गुलाम. यंत्रांची यंत्रणा त्यांना हाताळणाऱ्या यंत्रणेच्या हाती सोपविली असते. त्यामुळे यंत्रांचा वापर षड्यंत्रांसाठी होणार नाही याची खबरदारी घेतली नाही, तर यंत्रांना संशयाच्या भोवऱ्यात सोडणारी यंत्रणा तपासली पाहिजे. निवडणूक आयोगाने त्या दृष्टीने काम सुरू केले आहे. आता सदोष काय, यंत्रे की यंत्रणा, याचा शोध लवकरच लागेल. एखादी यंत्रणा यंत्रांचे दोष दूर करू शकेल, पण यंत्रणेचे दोष दूर करणारी यंत्रे अद्याप बाजारात आलेली नाहीत!