साधुसंत, जोगी-वैरागी यांच्या बाबतीत अलीकडे अनेक प्रवाद सुरू झाल्याने आणि काही संतांनी तर आपले अवतारी चमत्कार आकलनापलीकडे विस्तारल्याने त्यांच्याकडे आजकाल फार काही आदराने वगैरे पाहिले जात नाही. तरीही, या समाजात संत-वैराग्यांना मिळणारे स्थान हे कोणासही हेवा वाटावा असेच आहे. यातील काहीजण व्यवसाय म्हणून संतगिरी करतात, तर काहीजणांना त्यांचे भक्त संताचा मुखवटा चढवितात. ‘नावापुरता संत आणि वागणुकीत वसंत’ असे काहीजण अशा काही ऐय्याशीत वावरत असतात, की त्यांच्या तसे असण्याचा सर्वसामान्यांना हेवा वाटावा. काहीजण केवळ ‘संधीसाधू’ असतात, तर काहीजण ‘संधीअभावी साधू’ बनलेले असतात. काहींच्या नावात साधुत्वाची, किंवा योगी-वैराग्याची लक्षणे असली तरी त्यांना प्रत्यक्ष जीवनात तसे वावरणे अवघड झालेले असते. अशा काही मोजक्यांपैकी एक म्हणजे, आपले छत्तीसगडचे जोगी!. यांच्या आडनावात वैराग्याचा वारसा दडलेला असला, ते नावापुरते जोगी असले तरी खरे म्हणजे हे कुटुंब राजयोगी आहे. आपण आता कोणतीही निवडणूक लढविणार नाही, असे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे एकेकाळचे आणि नंतर पक्षातून निलंबित झालेले, तरीही दिग्गज राहिलेले नेते अजित जोगी यांनी जाहीर केलेले असले, तरी त्यांनी राजसन्यास घेतला असा याचा अर्थ नाही. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांना हटविण्यासाठी वेळ पडली, तर जोगीवस्त्रे दूर करून ते पुन्हा राजयोगी बनू शकतात, अशी चर्चा आहे. आगामी निवडणुकीत काहीही झाले, म्हणजे, कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी आपल्या कुंडलीतील राजयोगाचे ग्रह भक्कम राहणार असा दैवयोगच या कुटुंबाच्या नशिबी आला आहे. स्वत: जोगी आणि त्यांचे सुपुत्र काँग्रेसमधून पक्षविरोधी कारवायांच्या आरोपावरून सहा वर्षांसाठी निलंबित झाल्यावर त्यांनी स्वत:चा छत्तीसगड जनता काँग्रेस नावाचा पक्ष काढला असला, तरी अजित जोगींची पत्नी, डॉ. रेणू जोगी या अजूनही काँग्रेसच्या सदस्य असल्याने आगामी निवडणुकीत त्यांच्या गळ्यात काँग्रेसकडून उमेदवारीचा हार पडण्याची चिन्हे आहेतच. खरे म्हणजे, ज्या पक्षाने आपली हकालपट्टी केली, त्या पक्षाने उमेदवारी दिली तरी पत्नीने ती स्वीकारू नये असेच अजित जोगींना वाटत होते असे म्हणतात. पण स्त्रीहट्टापुढे काही चालत नाही, हे ओळखून त्यांनी आपला हट्ट सोडून दिला आहे. नावाप्रमाणे मनातही जोगी प्रवृत्ती कशी वास करत असते, त्याचेच हे आदर्श उदाहरण!.. उद्या काँग्रेसने रेणू जोगींना तिकीट दिले नाहीच, तर त्यांची आमदारकीची स्वप्ने जपण्यासाठी स्वपक्षाकडून उमेदवारी द्यायची, असेही जोगींच्या मनात असल्याची चर्चा आहे. बलस्थानी असलेले राजयोगाचे ग्रह काहीही झाले तरी आपला प्रभाव कायम ठेवतात, त्याचीच ही प्रचीती! जोगींच्या पक्षाने मायावतींच्या बहुजन समाज पक्षाशी हातमिळवणी करण्याचे ठरविल्याने, अजित जोगींची स्नुषा, ऋचा जोगी यांची बसपकडून उमेदवारी जवळजवळ नक्की आहे, आणि निवडणूक लढविणे हा तर अमित जोगी यांचा हक्कच आहे. एखाद्या घराण्याच्याच कुंडलीत राजयोगाचे ग्रह भक्कम असतील, तर घराणेशाहीच्या नावाने कुणीही कितीही बोटे मोडली, तर या ग्रहांचे काहीही वाकडे होत नाही हेच खरे!