‘ये इंडिया बहुत परेशान मुल्क है!’.. हे आपल्याकडील ‘बेबी’ नामक चित्रपटातील वाक्य. आता तेच पाकिस्तानचे थोर शांततावादी नेते हाफीज सईद यांनी उच्चारावे याचे कोणासही आश्चर्य वाटेल. मियाँ सईद यांची मुलाखत घेणाऱ्या अखबारनवीसास तसेच वाटले. त्याच्या दिमागात उगाचाच शंका-ए-किडा आला, की मियाँ हिंदी चित्रपटही पाहतात की काय? पण तसे नसावे. मियाँ म्हणजे पाच वक्त के नमाजी. ते कशाला असले धर्मद्रोही प्रकार करतील? त्या अखबारनवीसाने मनातील शंका-ए-पाल झटकून टाकत त्यांना विचारले, ‘पण जनाब, आपणांस तर इंडियाच्या दडपणामुळेच नजरकैदेत ठेवले आहे ना?’ त्यावर मियाँनी एक सुस्कारा सोडला. ते म्हणाले, ‘बदकिस्मती से हे सच आहे.. हे इंडियावाले सारखे म्हणत होते आमच्यावर कारवाई करा, कारवाई करा. आपले निकम्मे सरकार त्यांना घाबरले.’ अखबारनवीसास वाटले होते आपल्या सवालावर मियाँ उसळतील. त्यांच्या डोळ्यांतून आग के शोले बरसतील. जुबान-ए-कात्री कचाकचा चालू लागेल. परंतु मियाँ तर एकदमच खोलात गेले. भारताच्या दबावाखाली कारवाई झाली असे म्हणू लागले. बरे ही कारवाईही साधीसुधी नाही. यापूर्वी ज्याप्रमाणे मियाँना नजरकैदेत ठेवले होते अगदी तशीच. फरक एवढाच की या वेळी मियाँचे नाव दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गतच्या यादीतही समाविष्ट केले आहे. मोठे धाडसच म्हणायचे हे शरीफ सरकारचे. त्यांना सत्तेची काळजी नाही की काय? भारताच्या दबावाखाली सरकार अशी कारवाई करू लागले तर पाकिस्तानी अवाम काय म्हणेल? येथील जम्हुरियतचे काय होईल? ‘लेकिन जनाब, एक बात अशीही चाललीय, की ट्रम्प यांच्यामुळे हे होतेय.. पुन्हा इस हफ्ते पॅरिसमध्ये फिनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सची मीटिंग आहे. त्यात शरीफपण शरीक होणारेत. तेव्हा ते लक्षात घेऊन तुमच्यावर कारवाई केलीय,’ अखबारनवीस म्हणाला. ते ऐकताच हाफीजमियाँनी जोरदार ठहाका लगावला. आपली दाढी कुरवाळत ते म्हणाले, ‘ही सारी मनगढंत बात आहे. आम्हांस अटक केली, आमचे शस्त्रपरवाने रद्द केले, ते इंडियाच्या दबावामुळेच. हे शरीफ सरकार बहुतही कमजोर आहे.’ अखबारनवीसास समजेना, की हा थोर नेता हे असे का बरे म्हणतो आहे? मियाँ बोलत होते, ‘हे सगळे शरीफ-मोदी फ्रेंडशिपच्या बदौलत चाललेय. सगळी अवाम जाणते की त्यांचा दोस्ताना किती गहरा आहे ते..’ अखबारनवीसास वाटले, की एवढी मैत्री आहे तर मग बॉर्डरवर हल्ले का होतात?.. पण असे सवाल विचारायचे नसतात.. मियाँ बोलत होते, ‘आमच्यासारख्या मुल्कपरस्त लोकांवर दुश्मन देशांचे ऐकून कारवाई केली जात आहे.. अवाम हे कधीही सहन नाही करणार..’ हे ऐकले आणि अखबारनवीसाच्या मेंदूत टय़ूब-ए-लाइट पेटली. – की अरेच्चा, तर हे असे आहे तर! अगदी हम तो डूबेंगे, लेकिन तुम्हालाही घेऊन डूबेंगे सनम छापाचे राजकारण!