शतश: आभार. शतश: धन्यवाद. त्याशिवाय आणखी काही शब्द असतील तर ते देखील सगळेच शतश: किंवा शतप्रतिशत. हे आभार कुणाचे? आता हे काही सांगण्याची गरज आहे? आजच्या स्वातंत्र्यदिनी आभार कुणाचे मानणार? अर्थातच केंद्रातील मोदी सरकारचे. नाही नाही.. मोदींमुळे आणि त्यांच्या राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेल्या भारतीय जनता पक्षामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले, असे आम्ही म्हणत नाहीच आहोत. आमचे म्हणणे वेगळेच आहे. देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले ते अनेकांच्या बलिदानामुळे. अनेकांनी आपल्या घरांवर तुळशीपत्र ठेवले, आपले आयुष्य वेचले, तुरुंगवास सोसला, ब्रिटिशांचा जुलूम सोसला तेव्हा कुठे स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. पण देशवासीयांना या गोष्टींची जाणीव होती कुठे इतकी वर्षे? ते आपले बिनजाणिवेच्या अंधारातच मश्गूल होते. स्वातंत्र्याचे अ‍ॅप डाऊनलोड केल्यामुळेच स्वातंत्र्य मिळाले, असे बहुतांश लोकांना वाटत होते. स्वातंत्र्य दिन काय, प्रजासत्ताक दिन काय, यांचे नेमके महत्त्व काय, हेच माहिती नव्हते मूढ देशवासीयांना. असे देशवासी म्हणजे प्राणहीन, तेजहीन, ओजहीन, स्व-सत्त्वहीन बुजगावणीच केवळ. असल्या बुजगावण्यांच्या गाण्यांमध्ये काय जोर असणार? अशीच बिनजोराची गाणी कित्येक वर्षे देशभर सर्वत्र सुरू होती. पण आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मोदी सरकारने केवळ एकच आदेश काढला आणि देशातील सारे वातावरणच बदलून गेले. प्रत्येक देशवासीयाच्या मनामध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी, त्यांच्यात उत्साह निर्माण करण्यासाठी, माननीय पंतप्रधानांचे नव्या भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम आयोजित करा, असा आदेश सरकारने जारी केला राज्यांसाठी. शाळा, महाविद्यालये म्हणजे भावी पिढीला घडविण्यासाठीची स्थाने. तेथेच देशभक्तीचे संस्कार केले म्हणजे ते कायमस्वरूपी टिकणारच. स्वातंत्र्य दिनाच्या आधी हे संस्कार कार्यक्रम आयोजित करावयाचे होते. त्या आयोजनाचा फायदा आजच देशभर दिसतो आहे. आजवर असे काही दिवस म्हणजे सुट्टीची सोय, असा बिनदेशभक्तीचा हिशेब असायचा सगळ्यांचा. पण मोदी सरकारच्या आदेशाचा परिणाम पाहिलात का? आज दहाही दिशांमधून केवळ देशभक्तीचा प्रबळ हुंकार कानांवर पडत आहे. आजवर असे काही दिवस म्हणजे मनोजकुमारची गाणी लावण्याचा दिवस, एवढाच फिल्मी हिशेब असायचा सगळ्यांचा. आजही मनोजकुमारची गाणी ऐकू येत आहेतच, पण जणू त्या गाण्यांना समस्त भारतवासी एकदिलाने कोरस देत असल्याचे भासत आहे. आजवर असे कधीच झालेले नव्हते. आजवर असे दिवस म्हणजे शुभ्र कपडे घालण्याचा दिवस एवढाच एकरंगी हिशेब असायचा सगळ्यांचा. आजही सगळ्यांनी शुभ्ररंगी कपडे घातले आहेत, मात्र त्या कपडय़ांभोवती देशप्रेमाची एक आभा विलसत असल्याचे सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास दिसून येईल. हा तर निव्वळ चमत्कार आहे आणि तो घडला आहे मोदी सरकारमुळे. इतकी वर्षे स्वातंत्र्य दिनाची पहाट कशीबशी, अशीतशी असायची. आजची पहाट मात्र रम्य आहे आणि ती कित्येक दशकांनंतर पाहिलेली आहे..