आता एक तप उलटले आहे. २००४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर संसदेत सत्तेच्या बाकावरून विरोधी बाकावर बसण्याची वेळ भाजपवर आली. अटलबिहारी वाजपेयी यांनी सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आणि लोकसभेतील पक्षाची फळी सांभाळण्याची जबाबदारी लालकृष्ण अडवाणी यांच्या खांद्यावर पडली. तेव्हाच धोक्याच्या घंटा वाजू लागल्या होत्या. वाजपेयी-अडवाणींसारख्या नेत्यांनी आता निवृत्त व्हावे आणि नव्या रक्ताला वाव द्यावा असे मातृसंस्थेचे सरसंघचालक के. सी. सुदर्शन यांनी सुचविले तेव्हाच भाजपच्या नव्या रक्ताने काळाची पुढची पावले ओळखली असावीत. गेल्या १२ वर्षांत सारे काही आडाख्यानुसार घडत गेले आणि जुन्या रक्ताचे मन नव्या सत्तेत रमणार नाही अशी व्यवस्थाच झाली. भाजपची मातृसंस्था असलेल्या संघात, तर्क चालत नाही. तेथे आज्ञा चालते. १२ वर्षांपूर्वी तेव्हाच्या सरसंघचालकांनी दिलेल्या एका आज्ञेनंतरही तर्काच्या जोरावर टिकाव धरण्याचे प्रयत्न सुरूच राहिल्याने, आज पुन्हा सरसंघचालकांनी त्याचा पुनरुच्चार करावा हा योगायोग मानता येईल का? तिकडे मोतीबागेच्या आवारात सरसंघचालक मोहन भागवत आज्ञेचे महत्त्व स्वयंसेवकांना पटवून देत असताना इकडे संसदेच्या परिसरात लालकृष्ण अडवाणी सरकारला अनुभवाचे खडे बोल सुनावतात, हादेखील एक योगायोगच असेल का? वयोमानानुसार थकलेल्या खांद्यांना राजकारणाचे बदलते ओझे पेलवणार नाही हे माहीत असल्याने सत्तेच्या पहिल्या बाकावर बसूनही हातात हात घालून सभागृहाच्या कामकाजाकडे पाहणारी अडवाणींची तटस्थ मूर्ती विरोधी बाजूच्या शेवटच्या बाकावरील एखाद्या मौनी सदस्यासारखीच भासू लागते, तेव्हा असंख्य वादळे झेललेल्या या मनात कोणती घालमेल सुरू असेल हे न कळण्याएवढे सारे असंवेदनशील असतील असे मानता येईल का? सभागृहातील सत्ताधारी बाकावर अडवाणी नावाची एक इतिहासवस्तू असणे हाच अभिमानबिंदू मानणाऱ्या पक्षात या पुराणपुरुषाची कशी घुसमट होत असेल, याची जरादेखील कल्पना कुणालाच नसेल असे म्हणता येईल का? आसपासच्या नि:शब्दतेमुळेच या परिपक्व  मनात घुसमटणाऱ्या वादळाचा स्फोट अखेर झाला. नोटाबंदीनंतर लोकसभेत सुरू असलेल्या गोंधळामुळे मनातले हे वादळ बाहेर आले आणि अडवाणी यांनी घरचा आहेर दिला. पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत कुठेच नसलेले, पण सल्लागाराच्या भूमिकेचा टिळा लावून कोपऱ्यातील मानाच्या स्थानावर बसविले गेलेल्या अडवाणींनी थेट लोकसभा अध्यक्षांच्या आणि संसदीय कामकाज मंत्र्याच्या क्षमतेवरच बोट ठेवल्याने काही क्षणापुरती पक्षात अस्वस्थता माजली असली, तरी भक्तगणांच्या फौजा आता युक्तिवादाच्या ढाली पुढे करून या अस्वस्थ वटवृक्षाचे शब्द वाटेतच थोपवतील आणि पुन्हा हाताची बोटे एकमेकांत गुंफून त्रयस्थपणे कामकाज न्याहाळत बसण्यावाचून त्याच्यापुढे पर्याय राहणार नाही, हेच बहुधा भविष्याचे वास्तव असेल. सत्ताधारी बाजूचा तटस्थ अश्वत्थ म्हणून अडवाणींच्या अलीकडच्या कारकीर्दीची नोंद होणार आहे. १२ वर्षांपूर्वीची आज्ञा कानाआड केली नसती, तर कदाचित हे टळले असते.. असेच आता त्यांच्या चाहत्यांनाही वाटत असेल.