मग काऽय करायचे ठरवले तुम्ही? मी कामाचा लेखाजोखा देणार नाही म्हणजे नाही. वेठबिगार समजतात की काय आम्हाला? अरे मी प्राध्यापक आहे. विद्यार्थी घडवणारा, त्यासाठी किती बौद्धिक कष्ट करावे लागतात हे सरकारी अधिकाऱ्यांना काय कळणार? बुद्धिवंतांना त्यांच्या कलाने, निवांतपणे जगू दिले पाहिजे, त्यावरच तर देशाची प्रतिष्ठा अवलंबून असते. एखाद्या ज्ञानोपासकाला छळणे हे सुदृढ देशाचे लक्षण नव्हे, पण कागदपत्राची खानेसुमारी करण्यात माहीर असणाऱ्या अधिकाऱ्यांना हे कसे कसे कळणार? म्हणे गेल्या दोन महिन्यांत काय केले त्याचा हिशेब द्या.. तोही एक्सेल शीटमध्ये. अरे बाबांनो, चिंतन, मनन, वाचन या काही असल्या शीटमध्ये बसवता येण्यासारख्या गोष्टी असतात का? त्या रकान्यांत चिंतन मांडता येते का? तब्बल साठ दिवस वाचलेली पुस्तके , त्यावर केलेले मनन, चिंतन रकान्याच्या बाहेर जाणार नाही एवढय़ा त्रोटक शब्दात मांडायला आम्ही काय कारकून आहोत का? ज्ञानार्जनाला सरकारी कोष्टकात कसे बसवता येईल, असा साधा प्रश्नही तुम्हाला पडत नाही? सारे सरकारी सेवक करोनाकाळात सक्रिय आहेत व केवळ आम्हीच घरी आहोत म्हणून असूयेपोटी ही लेखाजोख्याची नाटके  चालवलीत तुम्ही, हे कळते आम्हाला! भलेही तुम्ही पगार देत असाल, पण आम्ही स्वायत्त आहोत. स्वतंत्रपणे काम करत राहणे, संस्कारक्षम विद्यार्थी घडवत राहणे याच ध्यासात आम्ही कायम मग्न असतो. आता अचानक सुट्टी मिळाली तरी आम्ही आमच्या ध्यासापासून तसूभरही ढळलेलो नाही. अरे, आम्ही ‘एक्सेल व्हिजन’वाली माणसे आहोत. आम्हाला कसल्याकसल्या ‘शीट’मध्ये बसवण्याचा प्रयत्न करताच कसा? प्राध्यापकांना शिक्षक समजू नका. गेले दोन महिने कैक वेबिनार केले. त्यातल्या काहींत सहभागी झालो तर वामकुक्षीच्या वेळेत असलेल्यांमध्ये फक्त सहभाग नोंदवला. तरीही डोळे मिटून सारे काही ऐकलेच की! आता त्यातील विषयपद्धती, तपशीलवार मांडणी, चर्चेत ऐकलेले वेगवेगळे संदर्भ यावर आमचे चिंतन सुरू असताना हे उगीच माहिती देण्याचे काम कशाला मागे लावता? काळ करोनाचा असो अथवा साधा, अध्यापन प्रक्रियेत कुणी अडथळा आणू नये हे साधे तत्त्व तुम्हाला ठाऊक नाही काय? या काळात महाविद्यालय, वर्ग, तासिका बंद होते. विद्यार्थी नव्हते, हे खरेच; पण आमचा अभ्यास तर सुरूच होता ना! आता तो कसा केला याचा पुरावा मागता? बुद्धिवंतांना डिवचताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? पाहिजे तर या सुट्टीच्या काळाला ‘अभ्यासरजा’ समजा. पण चिंतन, मननात मिठाचा खडा टाकू  नका. समजले?

एका साध्या प्रश्नावर पतीची सुरू झालेली टकळी बघून पत्नी सर्दच झाल्या. आपणही तिच्यासमोर नाहक बोललो हे लक्षात आल्यावर प्राध्यापकही ओशाळले. आता पुन्हा काय ठरवले असे विचारायचेच नाही, असा निर्धार करत त्या दुपारच्या चहाचे आधण ठेवायला निघून गेल्या. प्राध्यापकांची नजर मात्र सहसंचालकाकडून आलेल्या त्या पत्रावरच खिळलेली होती.