‘दोन महान नेत्यांची तुलना’ या विषयावर मला बोलण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो. जगात आज दोनच महान नेते उरले आहेत. आपण सारे प्रेमाने त्यांना तात्या आणि शेठ म्हणत असलो, तरी हे दोघे आज जगाचा आदर्श आहेत. तात्यांनी आज तर कमाल केली. करोनाग्रस्त असतानासुद्धा ७४ वर्षांचे तात्या रुग्णालयातून बाहेर आले, समोरच्या रस्त्यावर जमलेल्या समर्थकांसाठी एक ‘रोड शो’ करून परत गेले. याला म्हणतात खरे राष्ट्रप्रेम. तिकडे पत्नी याच आजाराने ग्रस्त असतानासुद्धा त्यांना तिची भेट घ्यावीशी वाटली नाही. आधी देश महत्त्वाचा, मग कुटुंब हाच या नेत्याचा कार्यगुण राहिला आहे. त्याचेच दर्शन आज घडले व तमाम अमेरिकन त्यांच्या या राष्ट्राभिमानी वृत्तीने दिपून गेले. करोना हा आजार अंधार असेल तर त्यातून वाट काढण्याची म्हणजेच प्रकाश दाखवण्याची क्षमता केवळ आपल्यातच आहे हे तात्यांनी दाखवून दिले. आता विरोधक याला शोबाजी म्हणतील पण ती करायलासुद्धा कल्पकता लागते. मोक्याच्या क्षणी चतुराई दाखवावी लागते. तीच या तात्यांच्या अंगी ठायीठायी भरलेली आहे. सारे जग करोनाला घाबरत असताना तात्या आरंभापासून त्याला निडरपणे सामोरे गेले. मुखपट्टीसुद्धा त्यांनी आधी लावली नव्हती. अनेकांनी यावर टीका केली पण सामान्य जनतेतील भीती घालवण्यासाठी लोकनेत्याला अशी निडरता दाखवावीच लागते हे कुणाच्या लक्षात आले नाही. करोनावरून तात्यांनी भले चीनला नावे ठेवली असतील, पण या विषाणूने तात्यांच्या शरीरात प्रवेश करताना जे अचूक ‘टायमिंग’ साधले, त्याला तोड नाही. यामुळे या आजाराचा ‘इव्हेंट’ करण्याची आयती संधी तात्यांना मिळाली. सहानुभूतीच्या लाटेवर आता ते स्वार होणार. बरे झाल्यावर अतिजोखमीच्या गटातल्या व्यक्तीसुद्धा करोनावर मात करू शकतात, असा प्रचार त्यांच्याकडील निवडणुकीत करायला ते मोकळे राहणार. दुसरे महान नेते अधिक आपले. आपल्याकडे निवडणुका नसल्या तरी ते कायम त्याच उत्साहात असतात. परवा निर्मनुष्य बोगद्यात हात हलवणारी त्यांची छबी बघून आपणा साऱ्यांचाच ऊर अभिमानाने भरून आला. लोक आजूबाजूला असोत वा नसोत, हात हलवणे सोडायचे नाही अशी सवयच त्यांनी अंगी भिनवून घेतली आहे. कॅमेरा हे नवे दैवत त्यांच्यामुळेच लोकांना कळले. उगाच का त्यांनी केदारनाथचे मंदिर पाठीमागे असताना, नमन मात्र कॅमेऱ्यासमोर केले? मोर त्यांच्याजवळ येईना म्हणून कॅमेरा किती तरी वेळा वेगवेगळ्या कोनांतून फिरवावा लागला. या घटना तशा साध्या असल्या तरी नेत्याच्या पारदर्शीपणाची साक्ष देणाऱ्या आहेत. तात्या व ते मित्र असल्याने या नेत्यानेसुद्धा मुखपट्टी न वापरता पारंपरिक दुपट्टय़ाचा वापर केला. येणारे प्रत्येक संकट ही संधी आहे असे समजून त्यावर मात करण्यासाठी वेगवेगळे ‘इव्हेंट’ करण्यावर भर देतात, तेच खरे नेते. विरोधक म्हणतात हे दोघेही धडधडीत खोटे बोलतात, पण त्यावर आमचा तसेच जनतेचा अजिबात विश्वास नाही. या कथित खोटेपणाला जनतेने वारंवार उचलून धरले आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. या दोन्ही नेत्यांकडे बघून जगात एकाच स्वभावाच्या दोन व्यक्ती असू शकतात यावर आमचा विश्वास बसला आहे. धन्यवाद!  (टाळ्यांचा प्रचंड कडकडाट)