‘त्या निकोलस मादुरोंचा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक मिळाला तर जरूर कळवा’ असा संदेश सुमारे २८ अमेरिकास्थ नातेवाईकांना पाठवून अप्पा थांबले नव्हते. आन्हिके, योगासने, भोजन, वामकुक्षी आदी  वगळता सलग बारा तास ते अत्याधुनिक संगणकीय तंत्रज्ञानाच्या साह्याने ते मादुरोंचा भ्रमणध्वनी क्रमांक शोधत होते. मादुरोंचा देश व्हेनेझुएला. त्या देशाची भाषा स्पॅनिश. स्पॅनिशमध्ये भ्रमणध्वनी क्रमांकाला ‘मोविलन्यूमेरो’ म्हणतात हे सारे ज्ञान एकत्र करून, तेही पणाला लावले अप्पांनी. पण व्यर्थ! तो भ्रमणध्वनी क्रमांक काही मिळाला नाही.. तो मिळाला असता तर एव्हाना मादुरोंनी विमानच पाठवले असते अप्पांसाठी, आणि खास व्हेनेझुएलाला बोलावून घेतले असते, सल्लागार म्हणून. अप्पांनीही सल्ले देण्यात कसूर ठेवली नसती. मादुरोंच्या परवाच्या त्या वक्तव्यावर टीका करणारे अख्खे जग अप्पांमुळे नांगी टाकल्यासारखे सरळ आले असते. कुणी दूरदेशीचे राष्ट्राध्यक्ष असलेले बिचारे मादुरो कधी नव्हे ते, आपल्या आयुर्वेदात आधीच सांगितलेल्या ओव्याच्या गुणधर्मावर विश्वास ठेवताहेत, तर जग लागले त्यांच्यावर टोचा मारायला. मादुरो इतके बिचारे की, त्यांना ओवा नीट माहीतसुद्धा नसेल. ते एवढेच म्हणाले की, ‘‘हे करोनावर एक शक्तिशाली- अति शक्तिशाली औषध आहे. याचे दहा थेंब जिभेखाली दर चार तासांनी टाकायचे की करोना विषाणू गायब होतो.. या औषधाचे नाव करवाटिवीर’’- मादुरोंना काय माहीत की, वीरांची नेहमीच कुचेष्टा होते, हाच आमचा इतिहास आणि हेच आमचे वर्तमान आहे. आधी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची खिल्ली पाश्चात्त्य देशांनी उडवली, मग फ्लॅव्हिपिरावीर, मग रेमडेसिवीर अशा एकेका वीर औषधांसाठी आमच्या कल्याण- डोंबिवलीत रांगा लागत असताना त्याही औषधांची उपेक्षाच ज्या पाश्चात्त्य जगाने केली, तेच आता मादुरोंच्या वक्तव्यावर  दात विचकून हसते आहे. अरे आयुर्वेदालाही असेच हसत होतात, वास्तुशास्त्रालाही हसलात, पण ब्रिटन युरोपच्या आग्नेयेकडे आहे, म्हणून तर झाले ना युरोपीय संघाच्या परिवारात भांडण? ठरलेच की नाही वास्तुशास्त्र खरे! करोना विषाणूवर आमच्याकडे हजारो वर्षांपूर्वीपासूनच असणार औषध, ते तुम्हाला माहीत नाही म्हणून काय झाले? आम्ही आत्मनिर्भरपणे ते शोधून काढणार.. त्या मादुरोंच्या व्हेनेझुएलाने तर इंग्रजीसदृश आणि अ‍ॅलोपॅथीक वाटेल अशा नावाचे ‘करवाटिवीर’ वापरले. तेही तुम्हाला हास्यास्पद वाटते? ..

.. अशी बाजू मांडणारे अनेक संदेश अप्पांनी तयार केले असते, मादुरोंच्या बचावासाठी. आणि मग मादुरोंमार्फत, स्पॅनिश भाषेत अनुवादित होऊन  ते संदेश प्रत्येक व्हेनेझुएलावासीच्या भ्रमणध्वनीवर धडकले असते. मग कदाचित हेच संदेश विविध भाषांमधून जगभर गेले असते! पण असे होणे नव्हते. मादुरोंना जग हसेल, घटकाभर करमणूक म्हणून त्यांचे ते वक्तव्य विसरले जाईल.. हे असे होऊ नये, हसणाऱ्यांना धडाच शिकवावा.. असे अप्पांना मनापासून वाटत होते. या  निमित्ताने भारताकडून काही शिकण्याची संधी व्हेनेझुएलाने गमावू नये, हीच अप्पांची कळकळ होती. त्याचसाठी तर थेट मादुरोंना व्हॉट्सअ‍ॅपवरून मदत करण्यास ते सरसावले होते.. असो. योग नव्हता म्हणायचे. आता ते करवाटिवीर औषध मूळचे भारतीयच असणार, असे संदेश आपल्याच व्हॉट्सअ‍ॅप गटांमध्ये पाठवावेत.. तेवढे तरी समाधान, असे अप्पांनी ठरविले.