कोणत्याही चित्रपटात एखादा खलनायक चित्रपट संपता-संपता जेव्हा म्हणतो की मी परत येईन, त्यावेळी पट्टीच्या चित्रपट शौकिनांची खात्री पटते, की या चित्रपटाचा ‘सीक्वेल’ येणारच! तद्वत अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊससमोर शेवटच्या जाहीर स्वगतात जेव्हा सांगितले, की मी कोणत्या तरी रूपात परत येईन तेव्हा त्याबाबत साधकबाधक चर्चा होणे आवश्यकच नव्हे काय?

हां, आता ‘मी परत येईन..’, ‘मी पुन्हा येईन’ म्हणणारे सारेच काही खलनायक नसतात. उगाच आपापल्या प्रदेशातील पुन्हा/ परत येऊ इच्छिणाऱ्यांची छबी यात शोधू नये. हल्ली असे खुलासे आगाऊच करावे लागतात. नाहीतर समाजमाध्यमांवर ट्रोलधाड ठरलेली. तिकडे वॉशिंग्टनमध्ये शपथविधी होऊन २४ तासही उलटत नाहीत, तोवर ट्रम्प यांच्यापेक्षाही धडाक्याने नवीन अध्यक्ष निर्णय घेऊ लागलेत किंवा फिरवू लागलेत. त्यामुळे अस्वस्थ होऊन ट्रम्प यांच्या सौभाग्यवती मेलानिया ट्रम्प वारंवार विचारू लागल्या आहेत.. ‘‘मी परत येईन’चं काही मनावर घेतलंयस की नाही? की मीच सुरू करू ट्वीट, विरोधकांविरुद्ध?’

ट्रम्प रमलेत फ्लोरिडात त्यांच्या आलिशान इस्टेटीत गोल्फ खेळण्यात. गोल्फ त्यांना अतिप्रिय. मतमोजणी सुरू होती तेव्हा, ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर आंदोलकांचे दमन सुरू होते तेव्हा, कोविडमुळे अमेरिकेत माणसे दगावत होती तेव्हा नि परवा त्या कॅपिटॉलवर ‘लोकशाहीचा पोरखेळ’ सुरू होता तेव्हाही ट्रम्प यांच्या गोल्फभक्तीत खंड पडला नाही. फारच भुणभुण सुरू झाल्यानंतर जे बोललो, त्याचा विचार करणे भाग पडले. कित्येक वर्षांनी अशा रीतीने हे साहेब विचार करू लागले!

पुन्हा येईन, पण आता जाणार कुठे? ट्विटरवर ब्लॉक, फेसबुकवरही ब्लॉक. ‘पार्लर’वर जायचं, तर तेही गुगल आदींकडून हद्दपार. फॉक्सवालेही हल्ली फारच शेफारलेत. माझ्या भक्तीमुळे मोठे झाले नि आता मलाच डोळे दाखवतात. वॉशिंग्टनमध्ये तर माझ्याविरुद्ध डाव्या लोकशाहीवाद्यांचं कुटिल कारस्थान सुरू. फ्लोरिडातला गोल्फ कोर्स बरा. नाहीतर टेक्सासमधील एखादी रँच. न्यूयॉर्कमध्ये जायची सोय नाही. तिथले दुष्ट बँकर कर्जवसुलीसाठी तगादा लावणार. सिलिकॉन व्हॅली तर कधीच आपली नव्हती. कॅनडात आपल्याला कोण उभेच करत नाहीत नि मेक्सिकोत सगळेच आपल्याला आडवे करण्यासाठी धावत येणार. मग दूर कुठेतरी परदेशीच जावे काय? इंग्लंडमध्ये तो चिनी व्हायरस अजूनही इथल्यासारखाच आहे. फ्रान्स, जर्मनीचे राष्ट्रप्रमुख दीडशहाणे. आपल्याला कधीच आवडले नाहीत ते. मग.. अरे पण आपला जिगरी दोस्त बिबी आहे ना. इस्रायलला जाऊ, बायको-मुलगी-जावयासंगे. सौदी अरेबियाच्या त्या मुजोर राजपुत्रालाही तिथून बघून घेता येईल. शिवाय उत्तर कोरियातला माझा तो बुटका मित्रही कधीचा बोलावतोय. नाहीतर रशियात गेलो असतो. पण थंडी फार सध्या तिथं. शिवाय तो पुतीनही व्होडकाच्या पलीकडे काही पाजणार नाहीच. किंवा मग.. ओ हॅल्लो.. माझ्या निवडणुकीच्या कितीतरी आधी ज्याने माझा प्रचार केला, तो माझा मित्र तर मला कधीही स्वीकारेलच. परत तिथेच जाऊया का? हाऊडी??