आपण जसे नाही, तसे आहोत हे दाखवण्याचा सतत प्रयत्न करत राहणे हा माणसातला अंगभूत गुण. यापासून फार थोडेच सज्जन परावृत्त झालेले दिसतात. बहुतेकांचे मात्र तसे नसते. म्हणूनच कदाचित मुखवटय़ांचे जग असा वाक्प्रचार प्रचलित झाला असावा. अनेकदा या मुखवटय़ाच्या आतला माणूस ओळखणे फार अवघड असते. करोनाकाळाने या मुखवटय़ाच्या जगात भर घातली ती मुखपट्टय़ांची! एरवी औषधदुकानांत एका कोपऱ्यात पडून राहणाऱ्या या पट्टय़ांनी गेल्या दोन महिन्यांत थेट काऊंटरचा ताबा घेतला. प्रारंभी सुदृढ आरोग्याची गरज म्हणून विकल्या जाणाऱ्या या पट्टय़ांनी आता बहुविध रूपे धारण केलेली दिसतात. मदतीचा हात ईश्वरी असतो असे म्हणतात; पण प्रत्येक गोष्टीत स्वार्थ शोधण्याची सवय झालेल्या भारतीय राजकारण्यांना या पट्टय़ांमध्येही पक्षाचा प्रचार दिसला. त्यातून मग कमळाचे फूल, हाताचा पंजा, पक्षाचा झेंडा, नेत्यांचा चेहरा असलेल्या पट्टय़ा अनेकांच्या तोंडावर दिसू लागल्या. आठवा जरा.. सहा वर्षांपूर्वी जॅकेट, फेटे, साडय़ा, सदरे यांनीही असे पक्षीय रूप धारण केले होते. हा प्रचार कधीकाळी शरीराचा महत्त्वाचा भाग असलेल्या तोंडावर सुद्धा येईल असे कुणाला तेव्हा वाटले नव्हते. पण नाना पटोले काँग्रेसच्या झेंडय़ाशी मिळतीजुळती मुखपट्टी लावून नेत्यांपुढे जातात किंवा गुजरात भाजपचे सारे नेते-कार्यकर्ते कमळाचे चित्र छापलेल्या केशरी मुखपट्टय़ा वापरतात हे गेल्या काही दिवसांत दिसले. समाजातील बहुतेकांना आपली निष्ठा कुणाच्या तरी ठायी अर्पण करावीशी वाटत असते. काहींना त्याचे प्रदर्शन करणे आवडते. त्यांच्यासाठी या पट्टय़ा दिशादर्शक ठरू लागल्या हा करोनाकाळातला सर्वात मोठा बदल समजायला काय हरकत आहे? खरे तर याला भारतीय राजकारणाची कमाल म्हणता येईल. तसेही, संकटाच्या काळात संधी शोधणे सोपे काम नाहीच. दुसरीकडे फॅशनच्या दुनियेलासुद्धा या पट्टय़ांनी भुरळ घातली आहे. कपडय़ांच्या रंगाशी जुळणारे, कोणत्या रंगावर कोणता ‘ऑफबीट’ रंग शोभून दिसेल याचे नियोजन करून केलेल्या पट्टय़ा बाजारात आलेल्या आहेत. अशा कोणत्याही वस्तूची मागणी सेलेब्रिटींशिवाय बहरत नाही. म्हणूनच मग समाजमाध्यमांवर अमुक नटाने वा नटीने घातलेली पट्टी किती महागडी अशा चर्चा सुरू झाल्या आणि बघताबघता या पट्टय़ांनी बाजारपेठेत आपले स्थान पक्के केले. आता तर आपापल्या चेहऱ्यांची ठेवण स्पष्ट दिसेल अशाही पट्टय़ा बाजारात आल्या आहेत. यातून माणूस ओळखता येतो म्हणे! पण, त्याच माणसाच्या चेहऱ्यावर असलेल्या अदृश्य मुखवटय़ाचे काय हा प्रश्न उरतोच. एकूणच मंदीच्या काळातही व्यवसायाला बहर आणता येतो याचे हे उत्तम उदाहरण! बाजारपेठेतले, राजकीय वर्तुळातले हे रंगीबेरंगी बदल एकीकडे व महामार्गावरून पायवाट तुडवणाऱ्या हजारो मजुरांच्या तोंडावर असलेल्या साध्या व स्वस्त पट्टय़ा, रुमाल दुसरीकडे हा विरोधाभास आहे खरा.. पण बाजारपेठीय मूल्यांना महत्त्व देणाऱ्यांना त्याच्याशी काही घेणेदेणे नाही. सर्वत्र धुमाकूळ घालणारा करोनाचा विषाणू शरीरात शिरताना जात पात धर्म पंथ बघत नाही. त्यामुळे या आजाराने जगातील सर्वाना समान पातळीवर आणून ठेवले, पण त्याच्यापासून बचावाच्या साधनांनी मात्र पुन्हा वर्गवारीच्या भिंती उभ्या केल्या.. यालाच म्हणतात जगरहाटी!