हुश्श.. सुटलो एकदाचे. संपल्या पंचायत निवडणुका. ना पक्ष, ना पक्षाचे चिन्ह.. तरीही ‘आपणच कसे क्रमांक एक’वर असे दावे ओरडून करावे लागतात. खोटे तरी किती बोलायचे हो? त्यालाही एक सीमा असतेच ना! तरीही इतरांच्या तुलनेत मागे पडू नये म्हणून तातडीने माध्यमांना बोलावून ‘ठोकून’ द्यावे लागते. करणार काय? स्पर्धाच तशी निर्माण झालीय! आता साऱ्यांच्या दाव्यांची गोळाबेरीज केली तर पंचायती होतात २७ हजार. निवडणुका झाल्या १४ हजार ठिकाणी. सामान्यांच्या हे लक्षात येत नसेल का? येतच असेल. पण बिचारे कुरकुर न करता ऐकतात, वाचतात. अशी एकगठ्ठा निवडणूक घेतली की माहोलही तयार होतो.. कालचा होता ना, तसा! जणू विधानसभेचेच निकाल लागलेत असे वातावरण सगळीकडे. त्या चॅनेलीय चर्चानी तर कानाचा पडदा विटला. काय तावातावाने भांडत होते सारे. एखाद्या ग्रामपंचायतीचे नाव विचारले तर तेही धड सांगता येणार नाही, पण अभिनिवेश बघा केवढा मोठा! ते नागपूरचे भाऊ ‘हा ग्रामीण जनतेने केंद्राला दिलेला कौल..’ असे म्हणाले. राज्यही नाही, थेट केंद्रच! काय गंमत चालवली राव! इकडे गावखेडय़ात सासू सुनेविरुद्ध लढते ती काय केंद्राची प्रतिनिधी म्हणून का? फेकण्यालाही काही मर्यादा हव्या ना! तिकडे तीनचाकी रिक्षात बसलेले पक्ष तर ‘झाले आघाडीवरच्या विश्वासावर शिक्कामोर्तब’ अशाच आविर्भावात बोलत होते. बरं, एकत्रही लढले नाही ते- तरीही विजय आघाडीचा! म्हणे तिघांची मिळून संख्या विरोधकापेक्षा जास्त. लोकांना मूर्ख समजतात की काय? यातल्या कुणाही जवळ खरी आकडेवारी नाहीच. निवडून आलेला एक, मात्र त्यावर दावा चौघांचा. बिचारा नवनिर्वाचित! आता त्याला रोज एकाच्या दारावर जावे लागणार. ‘मी तुमचाच’ हे सांगायला. यांचे दावे होतात, पण गावकऱ्यांची पंचाईत होते, त्याचे काय? मतदारांना बाटली, पैसे द्यायचे उमेदवाराने. त्यासाठी प्रसंगी कर्ज काढायचे; आणि टिळा लावणार हे! वा रे वा! तसेही गावखेडय़ातले लोक हुशार व बेरकी असतात. गावात ज्याची गाडी आली त्याचा दुपट्टा घालून हजर राहतात. म्हणून तर यांच्या दाव्यांची पोलखोल कधी होत नाही. ते बिचारे दादा.. नाही आली त्यांच्या गावात सत्ता- म्हणून काय त्यांची एवढी बदनामी करायची! गडचिरोलीच्या विकासासाठी ‘अहोरात्र’ झटणाऱ्या एकनाथरावांचे झाले असेल थोडे दुर्लक्ष; म्हणून काय त्यांना नावे ठेवायची? आता नाथांनी हाताला बांधलेले घडय़ाळ नसेल दिसले त्यांच्या गावकऱ्यांना; म्हणून त्यांना खिजवायचे? पडला असेल त्या जयंतरावांचा मेहुणा.. त्याचा इतका बागुलबुवा करायचा? छे: ‘अपमान ठेवावा मनात’ नाही का?! पण नसत्या झाल्या एकत्रित निवडणुका तर या चर्चा राज्यव्यापी झाल्या असत्या का? दुसऱ्याचे भले करताना होते कधी कधी स्वकीयांकडे दुर्लक्ष. म्हणून काय या निकालाचे धागेदोरे राज्य-केंद्राशी जुळवायचे? इन-मिन पंचायतीच्या निवडणुका. त्यातही सगेसोयऱ्यांना जास्त महत्त्व. अशा वेळी उंचीच्या नेत्याकडे दुर्लक्ष होणारच. पण चावट माध्यमे ऐकायला तयारच नाहीत. आणि त्यावर वरताण ठरणारे हे बेलगाम दावे. हो बाबा! तुम्ही सारेच क्रमांक एकवर. पक्षाचे चिन्ह नसल्याने वास्तव तरी कुठून समोर येणार? तेव्हा करत राहा ‘आम्हीच जिंकलो’ हा घोशा. तिकडे गावात एव्हाना बकऱ्यांचे बळी जाणे सुरूही झाले असेल. रश्श्याचा गरम घोट घेत कसे बनवले राजकीय पुढाऱ्यांना, यावर सामिष चर्चाही झडत असतील. तुम्ही बसा घसा फोडत!