पक्षाच्या मुख्यालयातील नटनटय़ा हाताळणी सेलचे प्रमुख सकाळपासून काळजीत पडले होते. महामहीमच्या कार्यालयाकडून आलेल्या निरोपाचे टिपण त्यांच्या पुढय़ात होते. कंगनाप्रमाणे याही नटीला वाय सुरक्षा देण्याचा निर्णय घ्यावा लागला तर हे ठरवून रचलेले डावपेच आहेत हे लोकांच्या लक्षात येईल, अशी भीती त्यांना सतावत होती. तशीही या नटीला समोर करण्याची गरज आधी नव्हतीच. पण सुशांत प्रकरणात अडकलेल्या रियाच्या बाजूने बंगाली अस्मिता उभी राहते आहे हे लक्षात आल्यावर तसेच सतत टीका करणाऱ्या त्या दिवटय़ा अनुरागला वठणीवर आणण्यासाठी कुणीतरी बंगाली चेहरा हवा हे मंथनातून समोर आल्यावर या नटीला हुडकून काढावे लागले. ते करताना किती कष्ट पडले याची जाणीव प्रमुखांना पुन्हा एकदा झाली. हिला समोर केल्याने रियाविषयीची सहानुभूती आपसूक संपुष्टात येईल हा पक्षाचा अंदाज खरा ठरू लागला असतानाच आता तिच्या नव्या मागणीने प्रमुख बुचकळ्यात पडले होते. नटय़ांच्या विचित्र वागण्या/ मागण्यांचा सराव नाही!  यापेक्षा पक्षकार्यकर्ते परवडले. बिचारे गपगुमान ऐकून घेतात असा विचार त्यांच्या मनात आला. या नटीला सोबत म्हणून पक्षाने सामाजिक अभिसरणाच्या गप्पा मारणाऱ्या एका नेत्याला कामाला लावले. तेही तिला समजवण्यात कमी पडलेले दिसतात. तसेही या नेत्याला त्या राज्यात कुणी गांभीर्याने घेत नाही म्हणा! तिकडे त्या नटीने सुरक्षा मिळणारच आहे अशी समजूत करून घेत घरासमोर मंडप, खुर्च्या वगैरे टाकून ठेवल्याची माहिती प्रमुखांना मिळाली होती. हे जरा अतिच हे त्यांना कळत होते, पण अशावेळी थेट नकार देणेही फायद्याचे नसते याची त्यांना कल्पना होती. एखाद्याची महत्त्वाकांक्षा जागृत करणे सोपे असते पण एकदा का ती जागृत झाली की मग आवरणे कठीण असते. हे सारे प्रकरण तर खोटय़ावरच उभे केलेले. अशावेळी करायचे काय हे प्रमुखांना सुचत नव्हते. बंगालच्या निवडणुकांना भरपूर वेळ आहे. तेव्हा तिला एखाद्या ठिकाणाहून उमेदवारीही देता येईल, पण तोवर सुरक्षा हे अतिच झाले. तिची समजूत काढायला त्या आंबे खाणाऱ्या नटाला पाठवावे असा विचार डोक्यात येताच प्रमुखाला थोडे बरे वाटले. तसा हा नट साधा आहे. नेत्याशी एकनिष्ठ आहे. सुरक्षा देणार नाही म्हटल्यावर होणारी तिची नाराजी तो दूर करू शकेल. अशी प्रकरणे अतिशय संवेदनशीलपणे हाताळावी लागतात. तिकडे दीदी व तिचे सहकारी टपून बसलेलेच आहेत. भविष्यात दीदींनी या नटीलाच कह्य़ात घेतले तर साराच भांडाफोड व्हायचा. प्रमुखांनी ‘सायलेंट मोड’वर असलेला मोबाइल बघितला. तिचे दहा फोन येऊन गेलेले. संदेशाची तर भरमार होती. एकच घोषा ‘सुरक्षा पाहिजे’. ‘नृत्याचा पदन्यास घेतला की पहिले हातातले ‘कंगन’ खणखणतात मग पायातले ‘पायल’ रुणझुणतात’. असा एक तऱ्हेवाईक संदेश वाचून त्यांना हसू आले. कंगनाचे प्रकरण वेगळे होते. हिचे वेगळे. हे तिला कोण समजावणार? तक्रारीवर कारवाई झाली व तो डावा दिग्दर्शक आत गेला तर सुरक्षा देऊ असा निरोप तिला त्या नटामार्फत देण्याचे ठरवून प्रमुख खुर्चीतून उठले. हा करोनाकाळ कुठवर पुरणार कुणास ठाऊक? यापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी, निवडणुकांसाठी आणखी किती नटनटय़ांना झेलावे लागणार काही कळत नाही. मनातून हा विचार झटकत ते पुन्हा खुर्चीत बसले. तोवर त्यांच्या सेलमधील संशोधन विभागाने बॉलीवूडमधील आणखी काही भानगडींच्या फायली समोर आणून ठेवल्या होत्या. प्रमुख नव्या उत्साहाने पुन्हा कामात गढून गेले.