बायकोच्या बहिणीच्या मुलाला सुरक्षा दिली म्हणून एवढा थयथयाट. अहो, ती इतिहासात रमणारी माणसे, तशीच वागणार! गांधारीसोबत शकुनी आलाच होता की राजदरबारात. तिकडे विराटाच्या दरबारातसुद्धा त्याच्या बायकोचा भाऊ कीचक होताच. त्यामुळे सत्ता आली की नातेवाइकांचा उद्धार हा होणारच. आता तुम्ही म्हणाल की भावाची सुरक्षा कमी केली व सासुरवाडीला महत्त्व दिले. अरे बाबांनो सध्या ‘लेडीज फर्स्ट’चा जमाना आहे. म्हणून तर बारामतीच्या वहिनींनासुद्धा सुरक्षा कवच मिळाले. एक लक्षात घ्या. सत्तेतले खरे कवचकुंडल पद नाही तर सुरक्षाच असते. त्याशिवाय ते इतरांपेक्षा वेगळे कसे ठरणार? आणि ते ‘लोकशाहीत सारे समान’ असे रडगाणे सतत गाऊ नका. लोकशाही असली तरी राजेशाहीच्या थाटात वावरण्याची सवय आहे या सर्वाना. तेव्हा राजवस्त्रे होती, राजदंड होता, राजमुकुट असायचा. त्यामुळे सत्ताधीश लवकर ओळखू यायचा. आता यातले काहीच उरले नाही. लुकलुकता लाल दिवासुद्धा त्या नागपूरच्या नितीनभौंनी काढून घेतला. मग सत्तेचा लाभ म्हणून दोनचार जवान सोबत ठेवले तर बिघडले कुठे? आता ते विरोधक ओरडतात. ही कृती अन्यायकारक म्हणून! पण त्यांनी तरी काय वेगळे केले होते? तेव्हाही सुरक्षा कपात केलीच होती ना! काँग्रेससाठी अजूनही संजीवनी असलेल्या गांधी घराण्याची सुरक्षा कमी करताना काय बोलले ते आठवा जरा. म्हणे, पूर्वसूचना का दिली नाही? तुम्ही दिली होती का तशी सूचना नोटाबंदी करताना? नाही ना! मग बोंबा कशाला मारता! आम्ही सामान्यांसारखेच आहोत असे एकीकडे म्हणायचे व दुसरीकडे असामान्यत्वाची कवचकुंडले काढली की अस्वस्थ व्हायचे. तरी एक बरे की, या निर्णयावरून कुणी अन्यायाचा टाहो फोडला नाही. फोडणार तरी कसा म्हणा! शेवटी पेरले तेच उगवेल ना! ते नागपूरचेच दुसरे भाऊ. सुरक्षा नसली तरी फिरणारच म्हणे! भरपूर फिरा भाऊ, आता तेच काम उरले आहे. इकडच्या रिक्षाची चाके फेव्हिकॉलने चिकटवली आहेत. सध्या तरी निखळणार नाहीत ती. अहो, सत्तेच्या माध्यमातून वचपा काढणे हे राजेशाहीपासूनचे सूत्र आहे. त्याचा वापर तर होणारच ना! अन् ते थोरल्या साहेबांचे काही सांगू नका. पाहिजे तर माझी सुरक्षा काढा असे म्हणालेत म्हणे ते. अहो, ते ऐंशीपार गेलेत. मोह, मायेपासून दूर जात आहेत ते सध्या. विरक्तीच्या भासातून बोलले असतील कदाचित. आधी तुमचे बघा. सत्ता गेली तरी दार उघडायला जवान. गर्दीत कडे करायला जवान. तुमचे बोलणेही सत्तेत नसून असल्यासारखे. कशाच्या तर दिल्लीच्या बळावर. कोणताही शहाणा सत्ताधारी हे कसे सहन करणार? दिला झटका तर आता ओरडता कशाला? आणि हो, आता त्या जिवाला धोका, धमकीचे फोन आलेत अशा चाणक्यमंडळीय बातम्या अजिबात पेरू नका. त्यामुळे आता काहीच फरक पडणार नाही. त्या युवासेनावाल्याचा तर मुद्दाच काढू नका. काहीही झाले तरी सासुरवाडीची माणसे!  इतिहासाचे दाखले देत यातून पुढे महाभारत घडेल अशी स्वप्नेही बघू नका. बाकी सत्ता येण्याची स्वप्ने बघायची मोकळीक दिलीच आहे तुम्हाला. तेवढय़ावरच समाधानी राहा. तुम्हीही दाजींना असेच उपकृत केलेच होते हे लक्षात ठेवा. सध्याच्या सत्ताकाळात दरबार कसा चालवायचा हे आरंभापासूनच ठरले आहे. जास्त ओरड चालवली तर नवा ‘झटका’ सहन करण्याची तयारी ठेवा. नाहीतर राणेंसारखी दिल्लीची सुरक्षा घेऊन मोकळे व्हा. मग ‘ना रहेगा बास, ना बजेगी बासरी’.