नेहमीप्रमाणे हिडिसफिडिस करण्याची तर सोयच नाही, पण थोडेफार कौतुक करावे तरी पंचाईत असे काहीसे झाले.  धीर धरणेच बरे. आम्ही घरी रामरक्षा सकाळसंध्याकाळ म्हणतोच. कुटुंबातले सारेजण म्हणतो. जमल्यास हिच्या माहेरच्यांना व्हीडिओ कॉल करून त्यांच्यासह म्हणतो. ‘आत्तसज्जधनुषा’च्या वेळी तिथल्यांची चाल चुकते, तरीही सांभाळून घेतो. शिवाय टीव्हीवर सकाळी रामायण सुरू झाले आहे तेही पाहातो. राम आणि कृष्णात भेद करत नाही. चॅनेल बदलून महाभारतही पाहातो. पुरेसा आरामही करतो. आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आम्हाला गाण्यांच्या भेंडय़ा खेळायला सांगतात, त्यांचे अजिबात न ऐकता आम्ही संस्कारीच राहातो. दिल्लीचे मुख्यमंत्री मात्र असे काही बोलतात, की आमची पंचाईत होते. राहावत नाही. कुणाला वाटेल महाराष्ट्रात राहून आम्हांस दिल्लीची चिंता कशाला. ती करावी लागते. दिल्ली कशी सरळ झाली पाहिजे. तिथे राष्ट्रपती शासनच हवे. हे आमचे एकटय़ाचे मत नाही. आमच्या परिवारबंधूंचेही असेच म्हणणे आहे. दूरचे आहेत, आमची एकमेकांची प्रत्यक्षात ओळखदेखही नाही, तरीही बंधूच. त्यांची आमची स्थिती सारखीच झालेली आहे : हिडिसफिडिस करण्याची तर सोयच नाही, पण थोडेफार कौतुक करावे तरी पंचाईत. या स्थितीस कोण कारणीभूत आहेत ते आम्ही का म्हणून सांगावे? सांगितले तर तुम्ही कौतुकच करत सुटाल त्यांचे, म्हणून? आम्ही का म्हणून द्यावी आयती संधी? फार झाले आता.. दिवस नव्हे महिने नव्हे वर्षे झाली.  खिजवण्याची एकही संधी सोडत नाहीत.  म्हणे काम केले. म्हणजे काय केले? वीज, पाणी, बसप्रवास मोफत. फुकटेगिरी सगळी. राष्ट्राचा पैसा काय झाडाला लागतो? रिपब्लिक म्हणा, आजतक म्हणा, झी म्हणा, कितीकांनी किती वेळा यांच्या चुका केवढय़ा निष्पक्षपातीपणे दाखवून दिल्या. किती तरी वेळा विधायक आणि सकारात्मक टीका करून यांची नालायकी दाखवून दिली. पण हे आपले गिरे तो भी टांग ऊपर. हनुमान चालीसा म्हटल्याने खरेच यांची संकटे दूर होतात काय?

आता म्हणे, गीतापठण करा. तेही म्हणतात कसे, ‘यापुढे टाळेबंदीचं पालन करून घरी राहणं हीच खरी देशभक्ती आहे. टाळेबंदीचे आता आणखी १८ दिवस उरले आहेत. एवढय़ा काळात काय करायचं असा कुणाला प्रश्न पडेल. एक उपाय सांगतो तो पटला तर ऐका.. माझ्या धर्मपत्नीने घरात गीतापठण सुरू केले आहे. पटत असेल, तर तुम्हीही करा. गीतेचे १८ अध्याय आहेत, रोज एक वाचा.’! आम्ही यांना सिक्युलर आणि फुरोगामी म्हणतो ते उगाच नव्हे. गीतापठण हा काही वाईट उपाय नव्हे. पण तो सांगणारे हे कोण? आपला देश धर्मनिरपेक्ष आहे हे माहीत नाही का यांना? बरखास्तच केले पाहिजे यांना.

नाही. धर्मनिरपेक्षतेचा भंग हे बरखास्तीचे कारण नको, पण दुसरी केवढीतरी कारणे आहेत. आणि परिवारबंधूंनाही आमचे सांगणे राहील की, ती कारणे मिळू द्या. केवळ रोज टीव्हीवर येऊन गीतापठण वगैरे आवाहने करतात हे राजीनामा मागण्याचे कारण नव्हेच. विनंती हीही राहील की, दुसऱ्या अध्यायातला त्रेसष्टाव्वा श्लोक आठवा:

क्रोधाद्भवति संमोह: संमोहात्स्मृतिविभ्रम:। स्मृमिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति॥

-धीर धरलात, तर हस्तिनापुर आपलेच आहे!