गुजरातचे ५०हून अधिक व्यापारी राजस्थानमध्ये जुगार खेळताना पकडले गेले. आता कुणी म्हणेल या बातमीत नवीन काय? अशा जुगाराच्या बातम्या देशाच्या कानाकोपऱ्यातून येतच असतात. मात्र बारकाईने पाहिलेत, तर ‘साध्याही विषयात मोठा आशय’ आढळेल..  मुळात व्यापार म्हटले की व्यावसायिक वृत्ती आलीच. म्हणजे जोखीम घेणे ओघाने आलेच. जुगार हीसुद्धा एक जोखीमच की! आता तो आपल्या राज्यात खेळायचा की दुसऱ्याच्या, हा ज्याचा त्याचा प्रश्न. एरवीही गुजरात व राजस्थानमध्ये गेली अनेक वर्षे भाईचारा असल्याने व्यापारी तिथे बिनधोक जायचे. पण राजकारणाचा अदृश्य वावर ठिकठिकाणी असतो हे भल्याभल्यांना कळत नाही. हे तर बिचारे व्यापारी. कायम नफ्यातोटय़ाचा विचार करणारे. राजकारणात झालेल्या तोटय़ाचे उट्टे आपल्यावर कारवाई करून भरून काढले जाणार याची त्यांना कल्पना तरी कशी असणार? आता बसतील कोठडीत किंवा भरतील भलाथोरला जामीन. ते व्यापारी असल्याने व सध्या राजकारणात व्यापाराचीच चलती असल्याने त्यांनाही कुणी तरी सोडवेलच. तरी पण कारवाईमुळे बदनामी झालीच ना! नुकताच राजस्थानमध्ये गुजरात्यांचा राजकीय जुगार यशस्वी ठरला नाही. तशी ही दोन्ही राज्ये व्यापारप्रवीण म्हणून ओळखली जातात. त्यामुळे नुकत्याच घडलेल्या राजकीय व्यापारयुद्धात कोण यशस्वी होतो याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागलेले. संकट कितीही गहिरे असले तरी गुजराती माणूस त्यातून मार्ग काढतोच हा पूर्वानुभव अनेकांना ठाऊक असल्याने सरकार गडगडणार असेच गृहीतक साऱ्यांनी मांडलेले, पण राजस्थानचे व्यापारीही हुशार. त्यांनी हुकमाचे पत्ते हातात ठेवून हा डाव उलथवून लावला. त्यामुळे पहिल्यांदा जुगाऱ्याला खरा जुगारी भेटला अशी चर्चा सुरू झाली. आता सारा देशच मुठ्ठीत असलेल्यांनी सुरू केलेल्या या वचपा कारवाईला एक इवलेसे राज्य उत्तर तरी काय देणार? मग त्यांनी खरे जुगारीच पकडले. तेवढीच गुजरातची बदनामी. त्या तुलनेत कर्नाटक व मध्य प्रदेशात जुगार हातोहात यशस्वी ठरला. त्यासाठी फार चालीही खेळाव्या लागल्या नाहीत. तिथे तशीही जुगाऱ्यांची संख्या कमीच असते म्हणा! त्यामुळे व्यापारीवृत्तीचीही वानवा! या राज्यांना म्हणूनच गुजरातींनी सहज मात दिली. अर्थात अजूनही राजस्थानात जुगारातले डावपेच सुरूच आहेत! पण पहिला डाव काही जिंकता आला नाही.

आता या पार्श्वभूमीवर आलेल्या या कारवाईच्या बातमीचा संबंध राजकारणाशी कसा जोडता राव असे कुणीही विचारू शकेल. आपल्याकडे यालाच बादरायण संबंध जोडणे, असे म्हणतात. राजकारणात प्रत्येक शक्यता पडताळून पाहताना आपसूकच असा संबंध जोडला जातो व त्यातून वेगवेगळे अर्थ काढले जातात. तसे ते याही बातमीचे काढले गेले तर त्यात गैर काय?

यातली खंत एकच. जुगार हा नेहमी विश्वासावर खेळला जातो. त्यामुळे बिनधास्त असलेल्या गुजराती व्यापाऱ्यांना कारवाईमुळे जो धक्का बसला त्याचे काय?

राजकारणात विश्वासघात अनेकदा होत असतो. त्याची या व्यापाऱ्यांना कल्पना असावी यासाठी गुजरातेत आता प्रबोधनाची मोहीम हाती घेतली जाणार आहे म्हणे! उगीच पुन्हा अशी नाचक्की नको यासाठी!