बंदुका, रायफली या हिंसक गोष्टी आहेत, त्यामुळे त्यांची जागा अन्य गोष्टींनी घ्यायला हवी.. हे सांगणे महात्मा गांधी यांचे नाही किंवा दलाई लामा यांचेही नाही. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना असे सांगते आहे. जगभरात नेमबाजी क्रीडास्पर्धात बंदुका, रायफली वापरल्या जातात आणि त्यासोबत गोळ्या. त्या जागी बंदुका आणि लेझर किरण असे नवे समीकरण तयार करायला हवे, असे संघटनेला वाटते. किती छान. ऑलिम्पिक संघटनेचा याबाबतचा प्रस्ताव मान्य झाला तर यापुढे नेमबाजीच्या खेळात बंदुकांतून गोळ्या सुटणार नाहीत, तर रंगबिरंगी किरण बाहेर पडतील आणि लक्ष्याचा वेध घेतील. या प्रस्तावामागचे एक प्रमुख कारण म्हणजे नेमबाजीत गोळ्या वापरल्या तर तो खेळ प्रत्यक्ष वा टीव्हीवरून बघणाऱ्या लक्षावधी क्रीडाप्रेमींना त्यात काही गंमतच वाटत नाही. गोळी बंदुकीतून सुटली कधी, समोरच्या वर्तुळाकार लक्ष्यावर आदळली कधी हे कळतच नाही त्यांना. त्यापेक्षा असे रंगीतसंगीत टोकदार झोत आले की कसे छान दिसेल दृश्य. एखाद्या बाँडपटातील प्रसंगच जणू. त्यामुळे अशा खेळांकडे अधिकाधिक प्रेक्षकांना आकर्षित करायचे असेल तर असे कल्पक उपाय करायलाच हवेत. कारण प्रश्न शेवटी टीआरपीचा आहे. प्रेक्षक नसतील तर टीआरपी कसा मिळणार, आणि टीआरपी नसेल तर जाहिराती कशा लाभणार? खरे तर अशा खेळांच्या माध्यमातूनच विविध उत्पादनांच्या जाहिरातींनाही वाव द्यायला हवा. उदाहरणार्थ बॉक्सिंगचा सामना असेल तर तो सुरू होण्याआधी खेळाडूंनी आपण ताकदीसाठी कुठल्या कंपनीचे शक्तिवर्धक औषध घेतो ते जाहीर करावे. म्हणजे त्या कंपनीची जाहिरात होईलच, शिवाय प्रेक्षकांना मौलिक माहिती मिळेल. बॉक्सिंग सुरू असताना चेहऱ्यावर बसला एखादा बुक्का आणि झाली जखम तर त्या जखमेवर कुठले मलम उपयुक्त हेही खेळाडूंनी लगेचच सांगून टाकावे. धावण्याची स्पर्धा असेल तर धावता धावता चेहरा हसरा ठेवावा आणि आपण कुठल्या ब्रॅण्डचे कपडे घातले आहेत, याची साद्यंत माहिती टीव्हीच्या लक्षावधी प्रेक्षकांना होईल, याची काळजी घ्यावी. कुठल्या ब्रॅण्डचे कपडे घातले की शर्यत आपण जिंकतो, याचे गुपितही सांगावे. हॉकीचा सामना असेल तर आपले बूट कुठल्या कंपनीचे आहेत हे चेंडूचा पाठलाग करता करता धावत्या समालोचनाप्रमाणे सांगावे. कुठल्या कंपनीचे बूट घातले म्हणजे प्रतिस्पध्र्यावर गोल करण्याची संधी आयती मिळते, याचे धावते मार्गदर्शन करावे. हे मार्गदर्शन सुरू असताना सुयोग्य पाश्र्वसंगीत चालू ठेवावे. हा मार्ग दुहेरी फायदेशीर आहे. त्यातून जगभरातील क्रीडासंस्कृती जोपासली जाईलच, शिवाय प्रकृती सुदृढ राखण्यासाठी कुठल्या कंपनीचे काय खावे, काय प्यावे, कुठले कपडे परिधान करावेत, अशी मोलाची माहिती प्रेक्षकांना मिळेल. तात्पर्य असे की, ऑलिम्पिक संघटनेचा हा लेझर किरणांचा प्रस्ताव म्हणजे क्रीडा क्षेत्रासाठी एक आशेचा किरण आहे.. त्याचे स्वागतच व्हायला हवे, कुठलीही कुरबुर न करता.