नसानसांतून भिनलेला मातृभूमीचा अभिमान जेव्हा ओसंडून वाहू लागतो तेव्हा काय होते, हे सांगून समजणारे नाही. ते थेट अनुभवावे लागते. तसे नसेलच, तर तसे अनुभवणाऱ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा लागतो. अशा आदर्शासाठी आजकाल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे पाहावे. अमेरिकेच्या राजधानीत, वॉशिंग्टनच्या विमानतळावरून उतरून शिवराजसिंह बाहेर आले आणि त्यांचा ऊर मातृभूमीच्या अभिमानाने ओसंडून गेला. परदेशाच्या भूमीवर मातृभूमीचे प्रेम थोडे अधिकच उसळते. तसे त्यांचेही झाले. कारण, संस्कार!.. जननी जन्मभूमी ही स्वर्गाहूनही श्रेष्ठच असते, हे मनावर बिंबलेले असल्याने, वॉशिंग्टनच्या रस्त्यांहूनही आपल्या जन्मभूमीचे रस्ते अधिक चांगले आहेत, असा आगळा साक्षात्कार त्यांना झाला आणि उद्योजकांच्या परिषदेत त्यांनी तो बोलून दाखविण्याचे धाडसही केले. अमेरिकावारी करून परतलेला कुणी देशबांधव तेथील रस्त्यांचे रसभरित वर्णन करेल, तर त्याला तातडीने थांबवा आणि शिवराजसिंहांचा हा दावा ऐकवा. अमेरिकावारी करायची इच्छा असेल, तर तुम्हीदेखील अगोदर मध्य प्रदेशात फिरून या.. अमेरिकेच्या राजधानीत नसतील असे दर्जेदार रस्ते मध्य प्रदेशात आहेत, असे  चौहान म्हणतात, म्हणजे ते तसे असणारच यात शंका घेण्याचे कारणच नाही. कारण मागे शिवराजसिंहांनी जातीने या रस्त्यांवरून दौरा केला होता. तेव्हा ते रस्ते पाण्याखाली गेले होते. तरीही दिमतीच्या शिपायांच्या हातांची खुर्ची करून त्यावर बसून दिमाखात पुढे जात त्यांनी ते रस्ते न्याहाळलेही होते. तेव्हा त्यांच्या पावलांना रस्त्यावरील खड्डय़ाचा साधा स्पर्शदेखील जाणवला नव्हता. कोणताही ठोस दावा करण्यासाठी स्वानुभवासारखे शहाणपण नाही. शिवराजसिंहांनी मध्य प्रदेशातील त्या जलमय रस्त्यांवरून धक्काविरहित दौरा केला, तेव्हाच त्यांना या सत्याचा साक्षात्कार झाला होता, म्हणूनच अमेरिकेतील रस्ते पाहिल्यानंतर मन की बात मोकळी करण्यावाचून त्यांना राहवले नसावे. जन्मभूमीचा असा अभिमान बाळगणारा देशाचा सुपुत्र याआधी झाला नसावा. मुंबईकर असल्याने, रस्त्यांच्या दर्जाचाच विषय निघाला की आम्हालाही राहवत नाही. आमचा दगडांचा देश असलेला महाराष्ट्रदेखील रस्त्यांच्या दर्जाच्या बाबतीत मध्य प्रदेशाएवढाच अव्वल आहे, हे आता जगाला ओरडून सांगण्याची वेळ आलेली आहे. आमच्या चंद्रकांतदादांनीही शिवराजसिंहांसारखीच गर्जना गेल्या वर्षीच केली होती. ‘रस्त्यावरचे खड्डे दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा’ असे आव्हानच त्यांनी दिले होते. मातृभूमीवर अमाप श्रद्धा असल्याखेरीज एवढा उत्कट अभिमान आणि आत्मविश्वास अवतरत नसतो. दादांच्या या आव्हानानंतर आजपर्यंत एकही माईचा लाल खड्डे दाखवू शकला नाही आणि एकालाही हजार रुपये देण्याची वेळ आलेली नाही, याचा अर्थच स्पष्ट आहे. आमचेही रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले आहेत. एवढेच नव्हे, तर मध्य प्रदेशालाही आम्ही मागे टाकू शकतो. फक्त आत्मविश्वास आणि मायभूमीवरील प्रेम ओसंडून वाहण्याची वेळ आली पाहिजे, एवढेच!