20 January 2019

News Flash

परंपरेचे पाईक..

विद्यार्थिदशेत आहारशास्त्राला आगळे महत्त्व असते.

असालही तुम्ही उद्याचे वैज्ञानिक, असेलही तुमच्या बुद्धिमत्तेची झळाळी भविष्यात जगाला अचंबित करून सोडणारी किंवा असालही तुम्ही या देशाचे भक्कम भविष्यनिर्माते, पण ‘संस्कार म्हणजे संस्कार’ हे विसरून चालणारच नाही! मुळात, आपली अनादी संस्कृती, आपल्या अनादी परंपरांचा विसर पडून अगोदरच आपण अकारण पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाचा सपाटा लावला आहे. कोणे एके पुराणकाळी, जगाचा अवघा भूभाग व्यापून राहिलेल्या आपल्या या विज्ञान आणि संस्कृतिसंपन्न राष्ट्रभूच्या अवकाशावर घिरटय़ा घालणारी पुष्पक विमाने स्वनातीत वेगाने विश्वमालेतील अवघ्या ग्रहमंडलावर सहज संचार करून क्षणार्धात याच भूतली परतून येत असत. अशा या महान देशाचे आपण भाग्यविधाते आहोत. अशा या देशाच्या पूर्वपरंपरांचा पाईक होण्याची पात्रता आपल्या अंगी यावी यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन, अशी आपली प्रतिज्ञा नसेल, तर या देशाच्या परंपरा पाश्चात्त्य संस्कृतीच्या आक्रमणापुढे गुडघे टेकून शरणागत होतील आणि त्याला जबाबदार आपणच असू असे तुम्हास वाटत नाही काय?

या परंपरांच्या अभिमानाचे पुनरुत्थान करण्याच्या प्रयत्नांना पोषक असे अभूतपूर्व वातावरण सध्या भरतभूच्या रंध्रारंध्रांत भिनलेले असल्याने परंपरांचा पाईक होण्याचे सहजभाग्य आपल्याला लाभत असताना, उगीचच नाके मुरडून भुवया उंचावण्यात अर्थ नाही याचे भान जागविण्याचा प्रयत्न आज सर्वत्र सुरू आहेत, हे आपले परमभाग्य असतानाही काही क्षुल्लक वादंग उभे करून नाहक परंपराजतनाच्या पवित्र कार्यात कमालीचे अडसर का उभे केले जात आहेत?

आता, केवळ बदलत्या जगासोबत प्रगत होण्यावाचून आपल्याला पर्याय नसल्यामुळेच, भारतीय प्रौद्योगिकी संस्थानासारख्या अत्याधुनिक प्रगत शिक्षणसंस्था आपण उभ्या केल्या. हे आपल्या उदार व सर्वसमावेशक संस्कृतीला साजेसेच झाले असले, तरी त्या संस्थांत शिक्षण घेताना संस्कृतीचा विसर पडावा असा त्याचा अर्थ अजिबातच नाही. विद्यार्थिदशेत आहारशास्त्राला आगळे महत्त्व असते. आहारसंस्कृतीचे जतन करणे हादेखील आपल्या परंपरेचाच एक भाग असल्याने, शाकाहारींनी मांसाहारींच्या घासून साफ केलेल्या थाळीत भोजन घेऊन अन्नसंस्कृतीस बाधा आणणे हे परंपरेशी विसंगत असेच कृत्य होय. असे करणाऱ्यांना चाप लावणे हे संस्कृतिरक्षक या नात्याने अशा संस्थांच्या व्यवस्थापनाचे इतिकर्तव्यच ठरते. सुदैवाने, ते कर्तव्यपालन करून मुंबईच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेच्या व्यवस्थापनाने आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर केलेली नाही. वर्तमानात देशव्यापी स्वरूपात सुरू असलेल्या संस्कृतिरक्षणाच्या मोहिमेत खारीचा वाटा उचलून परंपरेचा पाईक होण्याच्या प्रयत्नांची प्रतिज्ञा या संस्थेने जबाबदारीपूर्वक पाळली ही मोठी अभिमानास्पद बाब म्हणावी लागेल. या देशात आहारसंस्कृतीला शिस्त लावण्याचे अनेक प्रयत्न गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने सुरू असताना आणि काही असंतुष्टांकडून त्यात वारंवार अडथळे येत असताना एका मुंबईस्थित संस्थेने केलेल्या या अभूतपूर्व परंपरापालनकृत्याची ‘आयआयटी’च्या इंग्रजी इतिहासात नोंद होईल यात तिळमात्र शंका नाही.

First Published on January 17, 2018 2:15 am

Web Title: mumbai iit student council non vegetarian issue