सकाळ झाली. चिंतू उठला आणि चहाचा कप हातात घेऊन सवयीप्रमाणे दरवाजाच्या कडीमध्ये अडकवलेली वर्तमानपत्राची घडी काखेत घेऊन तो खुर्चीत बसला. चहाचा पहिला घोट पोटात जाताच त्याला तरतरी आली आणि म्यानातून तलवार उपसावी त्याप्रमाणे त्याने काखेतून वर्तमानपत्राची घडी खेचली. चहाचा कप समोर ठेवला आणि वर्तमानपत्र उघडले. आता नेहमीप्रमाणे काही तरी मनोरंजक वाचायला मिळणार हे त्याला माहीतच होते. त्यातून, नागपूरचे अधिवेशन म्हणजे हवापालटच.. अधिवेशनाच्या निमित्ताने काही वर्षांनुवर्षांच्या ओळखीचेच, पण नेहमीपेक्षा वेगळे वाचायला मिळते असा चिंतूचा अनुभव होता. याही वेळी तसेच घडणार याची कुणकुण असूनही चिंतूने वर्तमानपत्र उघडले. पहिल्याच पानावर त्याची नजर खिळली. चिंतूने आवडीने बातमी वाचायला घेतली. ‘चहापानावर विरोधकांचा बहिष्कार’ ही बातमी वाचायला मिळणारच, हेही चिंतूला माहीत होते. दर वर्षी अधिवेशनाच्या वेळी ही बातमी पहिल्या पानावर वाचायला मिळते, हे चिंतूला लहानपणापासूनच माहीत होते. सत्तेवरून विरोधात गेले किंवा विरोधातून सत्तेत आले की काही शिष्टाचार पाळावेच लागतात. चहापानावर बहिष्कार हा विरोधकांचा शिष्टाचारच असतो, हे चिंतूला पक्केठाऊक होते. त्याने बहिष्काराची बातमी वाचून संपविली. पुन्हा चहाचा घोट घेतला आणि जुन्या बातम्या आठवू लागला. चहापानावर बहिष्कार घालण्याची परंपरा विरोधकांनी चोख पार पाडली हे पाहून त्याला समाधान वाटले. मग त्याने पान पालटले. आतल्या पानावर, विरोधकांच्या पत्रकार परिषदेची बातमी होती. त्या परिषदेत विरोधक काय बोलणार हेही त्याला सवयीने माहीत होते. अधिवेशनकाळातील बातम्यांचा सराव अन् अभ्यास यामुळे कोणत्या बातम्या अधिवेशनाच्या काळात वर्तमानपत्रात असणार हे सांगण्याइतका अधिकार आपल्याला प्राप्त झाला आहे, याबद्दल चिंतूची खात्री होती. हे सरकार केवळ थापा मारते, काहीच करत नाही, फसव्या घोषणा करते आणि निव्वळ प्रसिद्धीवर खर्च करते, हा जुन्या आरोपांचा पाढा पुन्हा वाचायला मिळावा म्हणून चिंतूची नजर पानावर भिरभिरत असताना त्याला ती ओळखीची बातमी सापडली. नेहमीचीच असूनही त्याने ती अधाशासारखी वाचून काढली. आता त्यावर सरकारचे उत्तर असणार हेही त्याला माहीत होते. ते काय असणार याचीही त्याला खात्री होती. तसेच झाले- ‘विरोधकांच्या कारभाराचे पुरावे आमच्याकडे आहेत, ते सभागृहात मांडू’ असा हुकमाचा एक्का मुख्यमंत्री फेकणार हेही त्याला माहीत होते. आजचे विरोधक सत्तेत असताना हेच सांगत असत ते चिंतूला आठवले आणि नवे काही तरी वाचावे म्हणून त्याने पुन्हा पानावर नजर फिरवली, तेवढय़ात ‘डल्लामार’ हा मुख्यमंत्र्यांचा शब्द त्याच्या नजरेस पडला. आता यापुढे डल्लामार हा शब्द राजकारणात रुळणार हे चिंतूच्या चाणाक्ष मेंदूने क्षणात ओळखले आणि चहाचा शेवटचा घोट घेऊन चिंतूने पेपर गुंडाळला!