अगदी बरोब्बर बोलले आपले प्रधानसेवक. म्हणजे ते तसे कधी चुकीचे बोलतच नाहीत. किंबहुना ते बोलतील ते बरोबरच असते. तर ते असो. ‘नोटाबंदीला जे विरोध करीत आहेत ते काळ्या पैशाचे राजकीय पुजारी आहेत’, असे प्रधानसेवकांचे म्हणणे. केवढी मोठी मोहीम हाती घेतली प्रधानसेवकांनी. अख्ख्या देशातील काळा पैसा खणून काढण्याची. कुठेकुठे दडवलेला होता काळा पैसा. घरांतील न्हाणीघरांच्या वर बसवलेल्या टाक्यांमध्ये, सोफा कम बेडच्या सोफ्यामध्ये, सोफ्यावरील उश्यांमध्ये, स्वयंपाकघरांतील डाळतांदळाच्या डब्यांमध्ये, पाकिटाच्या चोरकप्प्यांत, पासकव्हरमध्ये पासाच्या मागे.. काळा पैसा दडवून ठेवण्याचे हे असे असंख्य मार्ग. निश्चलनीकरणाचा निर्णय एका फटक्यात घेऊन प्रधानसेवकांनी सारा काळा पैसा बाहेर काढला. आपल्यासारख्यांचे हिशेब हजारांतले.. लाखांतले.. फार तर एक-दीड कोटींतले. अगदी कालचीच आकडेवारी सांगते की, पाचशे व हजारच्या ज्या नोटा चलनातून बाद झाल्या त्यातील अगदीच थोडय़ा नोटा बँकांबाहेर राहतील. बाद चलनातील जवळपास ९७-९८ टक्के नोटा बँकांत जमा होतील, असे दिसते. म्हणजे केवढे मोठे यश बघा. हे ९७-९८ टक्के म्हणजे किती माहितीये का? १४.७५ लाख कोटी!! आपल्याला हा आकडाही मांडता नाही यायचा. कितीवर किती शून्य असा विचार करून आपणच शून्यात हरवण्याची शक्यता जास्त. तर हे इतके दिग्विजयी कर्तृत्व गाजवायचे म्हणजे अंगी धमक हवी आणि कळकळ हवी. हे दोन्ही आहे म्हणून तर प्रधानसेवक काळ्या पैशांवर हल्ला करू शकले. इतके करूनही काही मूठभर लोक कुरकुर करणे सोडत नाहीत. म्हणे काय, ‘नोटांच्या रांगांत उभे राहून काही लोक हकनाक जिवास मुकले, सामान्य नागरिकांना अतोनात त्रास झाला, उद्योगांना फटका बसला, शेती उद्योगाची रया गेली’ वगैरे. इतका मोठा निर्णय घ्यायचा तर अशा छोटय़ाछोटय़ा गोष्टी होणारच. त्याचा काय इतका बभ्रा करायचा? बरोबरच बोलले प्रधानसेवक. ही कुरकुर करणारे लोक म्हणजे काळ्या पैशाचे राजकीय पुजारीच आहेत. आता म्हणे, संसदेची लोकलेखा समिती प्रधानसेवकांना नोटाबंदीबाबत काही प्रश्न विचारण्याच्या बेतात आहे. म्हणजे, ‘तुम्ही नोटाबंदी का केली, त्यामागे काय हेतू होता, त्याचा फायदा काय झाला’ वगैरे प्रश्न. किती हा घोर अन्याय. प्रधानसेवकांच्या अफाट कामगिरीची कदरच नाही मुळी कुणाला. खरे तर अशा छिद्रान्वेषी वर्तनातून काळ्या पैशाच्या पुजाऱ्यांना बळ देण्यापेक्षा, पांढऱ्या पैशांच्या अराजकीय पुजाऱ्यांचे भले कसे होईल, याचा विचार सगळ्यांनी करायला हवा. आपले प्रधानसेवक अशा पांढऱ्या पैशांच्या अराजकीय पुजाऱ्यांची संख्या कशी वाढेल, याच्या विचारात रात्रंदिवस बुडालेले असतात. देशाच्या भल्यासाठी रात्रंदिवस एक करणाऱ्या देशातील काही नि:स्पृह उद्योगपतींशी ते यावर सातत्याने चर्चा करतात. प्रधानसेवकांच्या या मोहिमेला, आम्ही तो पुजारी पांढऱ्याचे, म्हणत समस्तांनी बळ द्यायलाच हवे. त्यातच समस्तांचे हित सामावले आहे.