जुन्या, नकोशा खुणा अंगावर दागिन्यासारख्या मिरवत वनवासात वावरण्यामागे काही सुख असते का?.. विदर्भात मूर्तिजापूर-यवतमाळ या नॅरोगेज मार्गावर कंगाल आणि विकलांग अवस्थेत कसेबसे धावत वयाची शंभरी गाठलेल्या शकुंतलेच्या नशिबी असाच वनवास आला होता. खरे म्हणजे, शकुंतला नावाची नॅरोगेज रेल्वे हा महाराष्ट्राचा एक ऐतिहासिक वारसा ठरला असता; पण तिच्यावरील ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या खाणाखुणा कधी पुसल्याच गेल्या नाहीत. १९१६ साली, बरोबर शंभर वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या नॅरोगेज रेल्वेला भारताबरोबर स्वातंत्र्य मिळाले नाहीच, पण ब्रिटिशांच्या हातातून काढून तिला मुक्ती देण्यासाठी फारसे गंभीर प्रयत्नही झाले नाहीत. आता सत्तांतराबरोबरच विकलांग शकुंतलेला मुक्तीचा मार्ग दिसू लागला. क्लिक निक्सन नावाच्या ब्रिटिश कंपनीच्या ताब्यात असलेल्या या गाडीचा रडतखडत चाललेला प्रवास तिच्या वयाच्या शंभरीनंतर आता संपुष्टात आला आहे. याच कंपनीच्या ताब्यातील मूर्तिजापूर-अचलपूर मार्गावरील शकुंतलेने तर केव्हाचाच अखेरचा श्वास घेतला, तर पुलगाव-आर्वी शकुंतला गाडीच्या धावण्याच्या मार्गावरील खाणाखुणाही इतिहासजमा झाल्या. यवतमाळ-मूर्तिजापूर नॅरोगेज मार्गावर दरड कोसळल्याचे निमित्त झाले आणि या मार्गावरील शकुंतला गाडी तीन वर्षांपूर्वी जाग्यावरच थांबली; पण काहीही असले तरी, कधी काळी वाफेच्या इंजिनावर चालणारी ही गाडी म्हणजे, विदर्भातील गरीब जनतेची जीवनरेखा असल्याने, तिच्यावर स्थानिकांचा जीव जडला होता. म्हणूनच, शकुंतलेचा प्रवास असा एक एक करत लवकरच कायमचा थांबणार याची कुणकुण चार-पाच वर्षांपूर्वी लागली तेव्हापासून शकुंतलेच्या आठवणींनी उसासे टाकणारे अनेक जण हळवे झाले होते. अखेर वास्तव स्वीकारणे त्यांनाही भाग पडले आणि किमान शकुंतलेच्या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये विस्तारीकरण तरी करावे यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यासाठीही चार-पाच वर्षांची प्रतीक्षा अटळच ठरली. शकुंतलेचे भविष्य अशाच दुर्लक्षित अवस्थेत काळवंडून जाणार असे दिसू लागल्याने नाराजीही पसरली. आता मात्र या शकुंतलेला ब्रॉडगेज मार्गाचा नवा साज चढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उण्यापुऱ्या शंभर वर्षांचा ब्रिटिश सासुरवास सोसलेली शकुंतला आता खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारताची माहेरवाशीण होईल. ती नव्या ब्रॉडगेज मार्गावर दिमाखात धावू लागेल, त्या दिवसाची आता प्रतीक्षा सुरू झाली आहे. आणखी अडीच वर्षांनंतर पुन्हा देशात नव्या निवडणुकांचे वारे वाहू लागलेले असतील. जुन्या प्रकल्पांच्या पुनरुज्जीवनाचीही भूमिपूजने सुरू होतील, नव्या प्रकल्पांच्या पायभरणीच्या घोषणा दुमदुमू लागतील; पण निवडणुकीसाठीच्या भूमिपूजनाच्या त्या मुहूर्तापर्यंत प्रतीक्षा करत राहण्याची शक्ती आता या क्षीण शकुंतलेच्या अंगी उरलेली नाही. सन्मानाने माहेरवास मिळावा, अशी तिची इच्छा असेल, तर ती लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे, कारण शकुंतला हा महाराष्ट्राच्या जाणिवांचा एक हळवा कोपरा आहे.