साहित्य संमेलनाध्यक्षाची निवड सन्मानाने करण्याचा निर्णय महामंडळाच्या बैठकीत घेतल्याची बातमी वर्तमानपत्रात येताच मानिवली साहित्य मंडळाने तातडीची सभा बोलावली. महामंडळाच्या अभिनंदनाचा ठराव तातडीने मंजूर करणे आणि संमेलनाध्यक्षपदासाठी मानिवली पंचक्रोशीतील कवी मनू मानकामे यांचे नाव सुचवून त्यांची सन्मानपूर्वक निवड करण्याचे सर्वाधिकार महामंडळास देणे असे दोन विषय चर्चेस येणार असल्याचे मंडळाने अगोदरच कळविल्यामुळे गावातील सारे साहित्यप्रेमी सदस्य सकाळी चहा न घेताच जमा झाले. त्यामुळे बैठक वेळेवर सुरू झाली आणि मंडळाच्या अध्यक्षांनी थेट मुद्दय़ास हात घातला. येत्या साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी मंडळातर्फे प्रस्तावित उमेदवार असलेले मनू मानकामे एका कोपऱ्यात गंभीरपणे बसले होते. नेहमीच हातात असणाऱ्या डायरीत बोट खुपसून, मध्येच त्यात काही नोंदी करताना त्यांना कविता स्फुरत. त्यांनी लिहिलेल्या कवितांनी किती तरी वह्य़ा भरल्या होत्या.  अलीकडे ‘वाचक दिन’ साजरा होऊ लागल्याने, कथा-कवितांचे वाचन करण्यासाठी मानकामेंना निमंत्रित करून त्यांच्या साहित्यसेवेचा सन्मान करण्याची साहित्यक वर्तुळात सहसा न आढळणारी प्रथा गावाने सुरू केली होती. ‘अनेक वर्षांच्या साहित्यसेवेबद्दल असा सन्मान स्वीकारणारे मनू मानकामे हे राज्यातील एकमेव साहित्यिक असल्याने अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावावर महामंडळाचे शिक्कामोर्तब व्हावे’ अशी मंडळाच्या सदस्यांची एकमुखी भावना अध्यक्षांनी बोलून दाखविली आणि बसल्या जागेवरून मनू मानकामेंनी विनयाने सर्वाना नमस्कार केला. ‘आपल्या साहित्यसेवेचा मानिवलीस अभिमान वाटत असून आगामी साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी आपली सन्मानपूर्वक निवड व्हावी अशी शिफारस ही सभा महामंडळाकडे करीत आहे’, असा एका ओळीचा प्रस्ताव अध्यक्षांनी मांडला. टाळ्यांच्या गजरात तो संमत झाल्यावर दोनदोन बिस्किटांसोबत चहापान करून बैठक संपली आणि मानकामेंची तंद्री भंग पावली. विचार करतच घरी निघाले. अध्यक्षपदासाठी उमेदवारास अनेक दिव्ये पार पाडावी लागतात, असे त्यांनी कुठे तरी वाचले होते. महामंडळाच्या सदस्य संस्थांचे मन वळवून एकेक मत गाठीशी बांधण्यासाठी किती खर्च येतो, याची कथाही एका पराभूत उमेदवाराकडून डोंबिवली संमेलनात जेवता जेवता ऐकलेली असल्याने, मुळात मानकामेंना फारसा उत्साह वाटत नव्हता. ‘शेकडो मतदारांचे मन वळविण्याऐवजी आता महामंडळाच्या दहा-बारा जणांनाच मॅनेज करावे लागेल,’ असे सांगून मानिवली मंडळाच्या अध्यक्षांनी पहिली ‘टिप’ दिल्याने तर मानकामेंची उमेदच संपली होती. मंत्रालयात किंवा कोणत्याच राजकीय पक्षात आपली ओळखही नाही; सरपंच, आमदार किंवा कोणताच नेता ओळखीचा नाही, मतदार आपल्या जातीचे नसतील तर, अशा विचारांनी ते अस्वस्थ झाले. महामंडळाकडे आपल्या मंडळाचा प्रस्ताव गेल्यानंतर त्याला पाठिंबा देणारी मते मिळविण्याकरिता नेमके काय करावे लागते हेदेखील मानकामेंना माहीत नसल्याने, आपले काही खरे नाही, याची त्यांना खात्री झाली. त्याच विचारात ते घरी पोहोचले. तिरमिरीत कपाटाच्या लॉकरमधील पासबुक उघडले. जेमतेम घरखर्चापुरते पैसे हाताशी असल्याचे पाहून माघार घेण्याचे मानकामेंनी मनाशी ठरविले. ‘आपल्या प्रस्तावाबद्दल आभार, पण यंदा माझ्याहून ज्येष्ठ व सन्माननीय असलेल्या मानिवलीच्याच बंडू महाशब्देंची शिफारस करा,’ असे सांगायचे ठरवून ते पुन्हा मंडळात गेले. महाशब्दे तेथे अध्यक्षांसोबत हास्यविनोदात रमले होते. मानकामेंनी लगेचच आपला प्रस्ताव मांडला आणि महाशब्देंचा चेहरा पडला. खिशावर हात आपटत त्यांनी अंगठा आडवातिडवा हलविला आणि ‘मंडळाकडून प्रस्तावच पाठवायचा नाही’, असा निर्णय घेऊन सारे बाहेर पडले.