उन्हाच्या काहिलीने जिवाची तलखी होत असतानाच एखाद्या संध्याकाळी अचानक आकाशात काळ्या ढगांची दाटी व्हावी, झिंग चढल्यासारखा धसमुसळेपणा करीत सोसाटय़ाच्या वाऱ्याने मरगळल्या झाडामाडांना कवेत घेत उभेआडवे घुसळून काढावे आणि वाऱ्याचे झोत झेलत गिरक्या घेणाऱ्या पाखरांनी स्वत:ला झोकून आकाशात स्वच्छंद झोके देत टपोरे थेंब पंखावर झेलण्याचा खेळ खेळत रिमझिम सरींचा उत्सव साजरा करावा असे स्वप्न उन्हाळ्याच्या काहिलीने भाजून निघाल्यानंतरच्या पहिल्या पावसासाठी ठीक असते. अशी ढगांची दाटी आकाशात दाटू लागली, की एखाद्या सुखद संध्याकाळी, फेसाळत्या लाटा, कुंद हवा, पावसाचा शिडकावा, बोचऱ्या वाऱ्यांचा मारा, हे सारे कौतुक झेलत हातात हात गुंफून चौपाटीवर फेरफटका मारणाऱ्या मुंबईकराच्या पाऊसवेडाला भुलून वारंवार तोच धसमुसळेपणा करू पाहत असशील, तर पहिल्या सरीच्या उत्साहाने तुझे केव्हाही स्वागत करायला आम्हाला वेड लागलेले नाही. दोन दिवसांपूर्वी, पहिल्या पावसाच्या अशाच जोशात आकाशात तू ढगांची दाटी केलीस, धसमुसळा धुमाकूळही सुरू केलास, थंड, बोचऱ्या वाऱ्यांच्या झोताने झाडामाडांना झोडपून काढलेस. पावसाच्या पहिल्या सरीसोबतचा तुझा खेळ आनंदाने साजरा करणारे सारे पाऊसवेडे पुन्हा त्याच, पहिल्या सरीच्या आनंदासारखे आजही वेडावून जातील असे तुला वाटले असेल. पण तसे झालेच नाही. कारण, ओखी नावाचा भलताच कुणी अनोळखी सोबती तुझ्यासोबत आहे याची आम्हाला अगोदरच जाणीव होती. तू ‘नेमेचि येतोस’ म्हणून आम्हाला तुझी प्रेमळ ओळख. पण या वेळी तू त्या अनोळखी ओख्याला सोबत घेऊन अवकाळीच दाखल झालास. तुझ्या त्या आगाऊ सोबत्याने केरळात १९ बळी घेतलेले असताना, तुझ्या अवकाळी आगमनाचा आनंद साजरा करण्याचा वेडगळपणा आम्हाला शक्यच नाही याची आज तुला खात्रीच पटली असेल. एरवी तू आमचा जिवाभावाचा मित्रच; पण या अशा अवकाळी अदांचा आम्हाला आता तिटकारा वाटू लागला आहे. त्या कितीही मोहक असल्या तरी जीवघेण्या आहेत, हे आम्हाला ठाऊक आहे. पहिल्या पावसाचा फसवा माहोल तयार करून तू समुद्राला नादविलेस, काही काळ तो आनंदाने उचंबळून गेला, तुझ्यासाठी वेडापिसाही झाला आणि फसल्याची जाणीव होताच ताळ्यावरही आला. आम्ही तर अगोदरपासूनच सावध होतो. अखेर समजूतदारपणा दाखवून त्या आगाऊ ओखी नावाच्या अनोळखी सोबत्याला घेऊन तू निमूटपणे गुजरातकडे सरकलास. म्हणूनच आम्हाला तुझे कौतुक आहे. आजकाल, महाराष्ट्राच्या वाटय़ाचे जे काही असते ते गुजरातकडे जाते. याचे आम्हाला सतत वाईट वाटत असते. तुझ्या सोबत्यासह तूदेखील गुजरातकडे गेलास खरा, पण त्या सोबत्याला आवर. तिकडे जाऊन असा अवकाळी धिंगाणा घालू नकोस, हेच आमचे तुला आपुलकीचे साकडे आहे.