22 January 2018

News Flash

चौथ्या स्तंभाचे ‘व्रताचरण’!

लोकशाहीचा चौथा स्तंभ, जो ‘माध्यम’ म्हणून ओळखला जातो

लोकसत्ता टीम | Updated: August 8, 2017 2:05 AM

सांप्रतकाळी श्रावणमासी सर्वत्र व्रतवैकल्यांचे पेव फुटलेले असताना, लोकशाहीचा चौथा स्तंभ, जो ‘माध्यम’ म्हणून ओळखला जातो, त्यास, आपणही एखादे व्रत करावे असे वाटू लागल्यामुळे, एकदा सारे स्तंभ एकत्र जमलेले असताना त्याने हळूच तिसऱ्या स्तंभास साद घातली. ‘हे बंधो, सध्या सर्वत्र पुण्यसंचयाचा काळ सुरू असताना तुझ्या न्यायबुद्धीने मलाही असे एखादे व्रत सांग की ज्यामुळे वर्तमान स्थितीत पहिल्या दोन स्तंभांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षांची पूर्ती होईल व व्रतपालनाचे पुण्य माझ्या पदरी पडेल,’ असे चौथ्या स्तंभाने तिसऱ्या स्तंभास विनविताच तिसऱ्या स्तंभाचे डोळे चमकले. हीच योग्य संधी आहे असा मनोमन विचार करून तिसऱ्या स्तंभाने चौथ्यास कोपऱ्यात नेऊन व्रतपालनाचे नियम सांगण्यास सुरुवात केली. ‘जरी तुला लोकशाहीचा चौथा स्तंभ वगैरे मानले जात असले, तरी सामान्य नागरिकाहून तुला श्रेष्ठ स्थान नाही, हे जाणून तू यापुढे सर्वसामान्यांसारखा मान खाली घालून व कणा झुकवून वागावेस, सामान्य नागरिकाहून अधिक असे कोणतेही विशेषाधिकार आपणास नाहीत हे समजून घ्यावे व त्यानुसार स्वत:स सामान्यातिसामान्य समजून व्यवहार करावे,’ असे तिसऱ्या स्तंभाने चौथ्यास सांगताच चौथा स्तंभ गोंधळून गेला. ‘हे व्रत माझ्यासारख्यास काहीसे कठीणच असल्याने त्याचे कठोर आचरण कसे साधावयाचे,’ असा अतिसामान्य प्रश्न त्याने तिसऱ्यास विचारला. ‘हे व्रत सुरुवातीस काहीसे कठीण वाटेल, पण त्याचे कठोर पालन केल्यास सध्या सर्वत्र जे सुखाच्या दिवसांचे स्वप्न आहे, ते साकारण्याचे पुण्य तुझ्या पदरी पडेल व तुझे व्रत सुफळ संपूर्ण होईल याची खात्री बाळग,’ असे सांगून तिसऱ्या स्तंभाने चौथ्यास व्रताची दीक्षा दिली. चौथ्या स्तंभाने तातडीने आपल्या पोतडीतील खणखणीत वृत्ते, जी की, सरकारास हादरवून सोडतील व समाजासमोर सद्य:स्थितीचा स्पष्ट आरसा धरतील ती सारी, ताबडतोब एका पोतडीत गुंडाळून खुंटीवर टांगून ठेवली आणि सरकारी माध्यमांकडून येणारी सारी प्रसिद्धीपत्रके, छायाचित्रे आणि अन्य लोकहितैषी मजकुरास वारेमाप प्रसिद्धी देण्यास सुरुवात केली. काही दिवसांतच त्याची फळे दिसू लागली, सर्वत्र आनंदीआनंद भासू लागला. सारे काही छान छान सुरू असल्याच्या भावनेने समाजमन सुखी झाले आणि सुखाच्या दिवसांचे जे स्वप्न दाखविले जात होते त्याच्या अनुभवाने जनताही सुखावून गेली. कुठेच काही वावगेपणा नाही, सारे काही सुरळीत आहे असे चित्र चौथ्या स्तंभातून उमटू लागल्याने देश व जनता आनंदी झाली. इकडे या व्रताची दीक्षा घेतल्यापासून चौथ्या स्तंभाची प्रकृती दिवसागणिक खालावत  गेली, आणि पहिल्या दोन स्तंभांना झळाळी लाभली. या व्रताच्या पालनामुळे जसे दोन स्तंभ समाधानी आणि सुखी झाले, तसे सुख तुम्हाआम्हाला लाभो आणि चौथ्या स्तंभाच्या व्रताची संपूर्ण सांगता होऊन त्याला तिसऱ्या स्तंभाच्या इच्छाआकांक्षा सुफळ होवोत..

First Published on August 8, 2017 2:05 am

Web Title: pillars of democracy 4th pillar of indian democracy media
  1. No Comments.