संस्कार म्हणजे नेमके कसे असतात ते शिकावे बिहारमधील लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबाकडून. कुटुंबप्रमुख लालू हेच इतके सुशील, चारित्र्यवान असल्यानंतर त्यांचे कुटुंब तसे असणारच. राममनोहर लोहिया, कर्पुरी ठाकूर अशी मंडळी लालूंचे गुरू. त्यांच्या संस्कारांतून लालू घडले.. वाढले. पण लालूंचे व्यक्तिमत्त्व एकदम स्वयंभू. आपल्या गुरूंचे संस्कार अंगी बाणवत त्यांनी स्वत जगण्याची, राजकारणाची अनोखी रीत आत्मसात केली व जगापुढे आदर्श ठेवला. गाईगुरांना मुबलक चारा मिळावा, यासाठी सविनय कायदेभंग करणाऱ्या व त्यासाठी कारागृहातील हालअपेष्टा सहन करणाऱ्या लालूंचा त्याग कोण विसरेल? अशा या त्यागमूर्ती लालूंची दोन पुत्ररत्ने म्हणजे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्विनीप्रसाद यादव व आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव. जनसेवेचे अत्यंत कठोर असे व्रत वडिलांप्रमाणेच हे दोघेही पाळत आहेत. या दोघांनी सामाजिक कार्याशीच आपल्या आयुष्याची गाठ बांधून ठेवलेली असली तरी त्यांच्या मातोश्रींना काळजी आहे ती त्यांच्या विवाहाच्या गाठीची. या दोघांच्या मातोश्री म्हणजे काही काळ बिहारच्या मुख्यमंत्रिपदी राहून, राज्याच्या विकासात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या राबडीदेवी. लालूंच्या ७०व्या वाढदिवशी त्यांनी डोईवरचा पदर हलकेच सारखासा करीत सांगून टाकले, ‘आमच्या घराच्या उंबऱ्यावरील माप ओलांडून घरात पाऊल टाकणाऱ्या सुना माझ्यासारख्याच हव्यात. साध्या, सरळ, संस्कारी. ऊठसूट आपले मॉलमध्ये जायचे, तिथल्या चित्रपटगृहांमध्ये चित्रपट बघत बसायचे, असे करणाऱ्या सुना नकोच आम्हाला. त्यांनी कसे घर सांभाळायला हवे, आलेगेले बघायला हवे, वडीलधाऱ्यांचा मान राखायला हवा, आणि बाहेरचीही कामे सांभाळायला हवीत.’ आजच्या काळात साधेपणाची इतकी ओढ कुणाला असणे म्हणजे महद्आश्चर्य. अशा वेळी राबडीदेवींच्या या वक्तव्यात भारतीय जनता पक्षाच्या काही जणांनी खोट काढली आहे. म्हणे, बिहारमधील सर्वात मोठा मॉल पाटण्यात उभारण्यात येत असून, मॉलची जमीन राबडीदेवी व त्यांच्या दोन पुत्रांच्या नावावर आहे. ज्या भाजपला आपद्धर्म व शाश्वतधर्म यांतील अंतर चांगलेच ठाऊक आहे, त्या पक्षाच्या मंडळींनी ही अशी तक्रार करावी? ज्या घरातील दोन्ही कर्त्यां मुलांनी समाजसेवेला वाहून घेतलेले आहे असे घर चालवायचे तर हाती थोडा तरी पैसा नको? हाती चार पैसे यावेत, याचसाठी यादवांनी मॉलचा व्यवहार केलेला आहे. तो त्यांचा केवळ आपद्धर्म आहे. काहीच उपाय नसताना, कुठलाही इलाज नसताना ज्याची कास धरावी लागते असा. थेट भगवद्गीतेत या आपद्धर्माचा दाखला मिळतो. मात्र लालूंसह समस्त यादवांचा शाश्वतधर्म नखशिखान्त साधेपणा, नि:स्पृहता हाच आहे. राबडीदेवी यांनी सुनांबाबत ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या या साधेपणाच्या शाश्वतधर्माला धरूनच. बाकी सारे जाऊ देत, निदान भाजपच्या मंडळींना तरी हा आपद्धर्म ठाऊक असायला हवा. नसेल तर त्यांनी तो ठाऊक करून घ्यायला हवा. अन्यथा त्यांनी संस्कारांबाबत बोलणे थांबवलेलेच बरे..