त्रलोक्याचा फेरफटका आटोपून नारद कैलासावर पोहोचणार असल्याची बातमी नंदीने दिल्यापासून भगवान शंकर अस्वस्थपणे येरझारा घालत होते. त्यांची ही अस्वस्थता पाहून पार्वतीदेवीदेखील चिंताग्रस्त झाली. कोपऱ्यातल्या बिळाशी खुडबुड करणाऱ्या मूषकास बोलावून, बाहेर कुठे तरी खेळत बसलेल्या गणेशास ताबडतोब घेऊनच ये, असे तिने सांगितले, आणि उडय़ा मारत उंदीरमामा बाहेर गेले. नंदीने पाठमोऱ्या उंदराकडे पाहून उगीचच मान हलविली. भगवान शंकरांना चिंताग्रस्त पाहून त्याच्याही चेहऱ्यावर चिंतेचा भाव उमटला. त्याने गुहेच्या दरवाजातून लांबवर पाहिले, तेवढय़ात दूरवरून चिपळ्यांचा आवाज ऐकू आला. ‘भगवान, ते आले’.. नंदीने आरोळी फोडली, आणि भगवान सावरून बसले. पार्वतीदेवीनेही आसन ग्रहण केले. गणेशही येऊन एका बाजूला उभा होता. काही क्षणांतच नारदमुनी आले. शंकर, पार्वती आणि गणेशास अभिवादन करून ते आसनस्थ झाले. ‘‘बोल नारदा, तू कुठे कुठे जाऊन आलास?’’.. नारदांनी डोळे मिटले, आणि ते बोलू लागले. ‘‘हे भगवान, अलीकडे तेथे फारच बजबजपुरी माजली आहे. रस्त्यावर जागाच राहिलेली नसल्याकारणाने आता तेथे उंचावरून पूल बांधण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी तर, त्यांनी प्रचंड भुयारेही बांधली आहेत. त्यातून मेट्रो नामक कोण्या वाहनाने माणसांना प्रवासाची सुविधा देणार असून त्याला त्यांनी ‘विकास’ असे काही तरी नाव दिले आहे.. तथापि, या ‘विकासा’मुळे सध्या माणसांना चालण्यासही जागा उरलेली नसल्याने, माणसे चिंतित आहेत..’’ एका दमात सारे बोलून झाल्यावर नारदांनी शंकराकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावरची काळजीची रेषा अधिकच गडद झाली होती. ‘‘नारदा, तू वर्णन करतो आहेस त्या जागेस मुंबई, मुंबापुरी असे म्हणतात का?’’.. महादेवांच्या या प्रश्नावर नारदांनी मानेनेच ‘हो’ म्हटले. आता त्यांनाही शंकराच्या काळजीचे कारण कळले होते. त्यांनी गणेशाकडे पाहिले. काहीच झालेले नाही अशा थाटात तो मूषकाशी खेळत होता. आपले इकडे लक्षच नाही असे तो भासवत असला तरी त्याला सारे कळते हे नारदांना माहीत होते. ‘‘नारदा, त्या मुंबापुरीत गिरगाव नामे एका भागात माणसांना चालावयास जागा नाही, वाहनांच्या हालचालीस पुरेशी जागा नाही, तेथे गणेशाचे कसे होणार रे?’’ शंकरांनी पुन्हा नारदास विचारले. आता काही दिवसांतच गणेशास पृथ्वीवर जावे लागणार असल्याने पार्वतीची तयारी सुरू झाली होती. रोज संध्याकाळी परवचा म्हणून झाल्यावर, पृथ्वीवर कसे वागावे याचे शिक्षापाठ ती गणेशास देत असे, पण गणेशाचे तिकडे ध्यान नसे. दर वर्षीच आपण पृथ्वीवर जात असतो. गिरगावातील चिंचोळ्या गल्ल्या, अरुंद रस्ते, माणसांची गर्दी, ‘डीजे’चा गोंगाट, हे सारे काही वर्षांनुवर्षे तेच असतानाही आपण तेथे निमूटपणे बसतो, त्याला आपले भक्तगण गणेशोत्सव म्हणतात, हे सारे तर नेहमीचेच असल्याने आई दर वेळी नवे काय सांगते, हे त्याला कळतच नसे. आताही, नारदांसमोर त्याचीच उजळणी झाली, आणि नेहमीसारखेच नम्रपणे त्याने सारे ऐकून घेतले. दोन दिवसांपूर्वी मंडपांवरून उडालेला राडा त्याच्याही कानावर आला होता, तेव्हा           गणेशाने मूषकास समजावले होते, ‘‘काळजी करू नकोस.. हे नेहमीचेच आहे. त्याला राजकारण म्हणतात. आता तिकडे निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळे त्यांना हे करावेच लागते..’’ नारदांनी अंतज्र्ञानाने ते ओळखले, आणि हसून ते शंकरास सांगितले, ‘‘भगवान, सारे सुरळीत होईल.. काळजी नको..’’ हे ऐकून भगवंतांनी हवेत हात उंचावला, आणि ते म्हणाले, तथास्तु!