फकिरीमध्ये उभे आयुष्य घालविलेल्या साईबाबांच्या शिर्डीतील सोन्याच्या द्वारकामाईचे व्यवस्थापन आपल्या हाती यावे, यासाठी कित्येकांची लोभी नजर एकवटलेली असताना राज्य सरकारने संस्थानच्या अध्यक्षपदी हावरे यांची निवड केल्यानंतर आता तरी सारे काही शांत होईल अशी अपेक्षा करावयास हरकत नाही. कोणे एके काळी, शिर्डीत येऊन साईचरणावर मस्तक टेकविल्यानंतर अमाप समाधानाचा साक्षात्कार श्रद्धावानांना होत असे. फकीर साईबाबांचे हे स्थान पुढे एक ‘संस्थान’ म्हणून नावारूपाला आले, भाविकांच्या रांगा वाढू लागल्या आणि अमाप श्रीमंतीसाठी साई संस्थान जगप्रसिद्ध झाले. मग सेवेच्या संधीचे सोने करण्याची चढाओढ सुरू झाली. आता साई संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळावर सुरेश हावरे यांची निवड झाल्यावर स्थानिक जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या रोषाला तोंड फुटले असले तरी हावरे यांना श्रेष्ठींचा आशीर्वाद आहे, हे भक्तांना चांगलेच माहीत आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे स्थानिक आमदार असूनही पदसिद्ध विश्वस्तपदावर त्यांची नियुक्ती केली नाही म्हणून काँग्रेसचे भाविक नाराज, तर स्थानिक निष्ठावंतांना डावलून उपऱ्या स्तुतिपाठकांना नेमल्याबद्दल भाजपमधले भाविक नाराज असताना, नवे विश्वस्त मात्र पारदर्शक विकासाचा नारा देऊ  लागले आहेत. अनामिक भक्तिभावाने ओसंडणारी राजकारणातील ही अनोखी नाराजी, सबुरीच्या भावनेने ओथंबलेली विखे पाटील यांची श्रद्धा आणि ‘मी तो केवळ सेवक’ या भावनेने विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदावर आरूढ झालेले हावरे असा ‘त्रिवेणी भक्तियोग’ साई दरबारी पाहावयास मिळतो आहे. देवाच्या सेवेची संधी मिळाली नाही म्हणून नाराज होणारे, निदर्शने करणारे व प्रसंगी बंद पुकारणारे भक्त आणि पदसिद्ध विश्वस्तपद मिळाले नाही तरी नाराज न होता अनुयायांना ‘श्रद्धा व सबुरी’चा सल्ला देणारे नेते पाहून साईभक्तांचाही ऊर भरून आला असेल, यात शंकाच नाही. रुसवेफुगवे हा भक्तांच्या राजकीय भावनांचा क्षणिक आविष्कार होता, हेच खरे. ते अजूनही धुमसत असतीलच, तर विखे पाटील यांचा साईभक्तीने ओथंबलेला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र प्रभावी ठरेल व सारे काही सुरळीत होऊन भाजपला संस्थानचे मनाजोगते व्यवस्थापन करणे सोपे होईल, यातही शंका नाही. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या व्यवस्थापनासाठीही अनेक राजकीय भाविक आपली श्रद्धा पणाला लावून बसले आहेत. साईबाबांच्या चरणसेवेची मर्यादित संधी मिळाल्याने शिवसेनेतील साईभक्त काहीसे नाराज झाले असतील, तरी सिद्धिविनायकाच्या प्रसादाची अद्याप प्रतीक्षा बाकी आहेच. सिद्धिविनायक देवस्थान हेदेखील साई संस्थानाएवढेच जगप्रसिद्ध असल्याने, श्रीमंत भक्तांची येथेही रेलचेल असते आणि साहजिकच, या देवस्थानाची तिजोरीही भलीमोठी असल्याने त्याचे यथायोग्य व्यवस्थापन होईल याची काटेकोर काळजी घ्यावीच लागते. लोभमोह सारे दूर सारून श्रीचरणी सेवाभावाने लीन होऊ  इच्छिणारे भक्त राजकारणात शोधणे काहीसे कठीण होत आहे, असे उपहासाने म्हटले जाते. इथे सेवेच्या संधीसाठी सुरू असलेली चढाओढ पाहता, ते खोटे आहे, हेच खरे नाही का?

BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
Virat Kohli's video goes viral
IPL 2024: गौतम गंभीरच्या गळाभेटीवर विराटने सोडले मौन; चाहत्यांना म्हणाला, ‘तुमचा मसाला संपला म्हणून तुम्ही…’, पाहा VIDEO
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा