प्रिय सलमान, तुझ्यामागे लागलेले अखेरचे शुक्लकाष्ठदेखील संपले आणि आता तू कोणत्याही प्रकरणातील आरोपी राहिला नाहीस हे ऐकून आम्हाला अतीव आनंद झाला आहे. तब्बल अठरा वर्षे खोटय़ानाटय़ा आरोपांखाली तुझी जी छळणूक झाली, याचा आम्हाला पश्चात्ताप तर होत आहेच; पण कसोटीच्या या लांबलचक कालावधीत तू जे धैर्य आणि संयम दाखविलास, त्याबद्दल आम्हाला तुझे कमालीचे कौतुकही वाटत आहे. आम्हा चाहत्यांना तुझ्या निर्दोषत्वाची खात्रीच होती. शेवटी, असत्याची ढाल पुढे करून फार काळ लढताच येत नाही व सत्याचाच विजय होतो. तुझ्या निर्दोषत्वामुळे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ज्या अर्थी साऱ्या अग्निपरीक्षा पार करून तू निर्दोषत्व सिद्ध केलेस, त्या अर्थी तुझी बाजू सत्याचीच होती, हे आता स्पष्टच झाले आहे. राजस्थानाच्या जंगलातील काळवीट आणि चिंकाऱ्याच्या शिकार प्रकरणात तुला गोवून यश व लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली तुझी प्रतिमा मलिन करण्याचा डाव होता, हे आता स्पष्ट झाल्याने, तुला झालेल्या मनस्तापाबद्दल आज आम्ही दिलगिरीही व्यक्त करीत आहोत. दारू पिऊन गाडी चालविताना काही जणांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा ठपका ठेवून तुला अग्निपरीक्षा देण्यास भाग पाडले गेले, तेव्हाही आमचे हृदय कळवळले होते. तुझी त्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यावरही त्या प्रकरणास फाटे फोडण्याचे उद्योग झालेच होते. काळवीट व चिंकारा शिकार प्रकरणात न्यायालयाने तुझी निर्दोष मुक्तता केल्यानंतरही आता तसाच प्रकार पुन्हा सुरू झाला आहे. सलमानने शिकार केलीच नाही, तर काळवीट व चिंकारा मेले कसे, त्यांनीच एकमेकांवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्या नसतील ना, असे बालिश प्रश्न उभे करून दिशाभूल करण्याचे प्रकार सुरू झाले असले, तरी त्याची चिंता करण्याचे तुला कारण नाही. कारण, न्यायालयासमोर चाललेल्या खटल्याच्या मर्यादा, तू शिकार केलीस किंवा नाही एवढय़ाच तपासापुरत्या मर्यादित होत्या, व त्या चौकटीतील तपास पूर्ण झाल्यानंतरच तुझी निर्दोष मुक्तता झाली आहे. काळविटे मेलीच कशी हा स्वतंत्र तपासाचा मुद्दा आहे, हे त्यांना समजतच नसावे. हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात तुझी निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही, ‘अपघात झाला कसा’ असे निर्थक प्रश्न विचारले गेलेच होते. आमच्या मते, तू अपराधी नाहीस हे एकदा ठरवल्यानंतर असे प्रश्न फजूल ठरतात. तुला निर्दोषत्वाचा दाखला मिळावा यासाठी आमच्यासारख्या अनेकांनी देव पाण्यात घातले होते. त्यांना आता मोकळा श्वास घेता येणार आहे. तुला झालेल्या त्रासाची शिक्षा त्या बिचाऱ्या देवांना भोगावी लागली, याचीही आम्हाला शरम वाटते. त्यामुळे पुढच्या संक्रांतीला पतंग उडवून दोषमुक्तीचा आनंदोत्सव साजरा करण्याचेही ठरवले आहे..