भरचौकात किंवा भरगच्च रेल्वे स्थानकात, मस्तानीच्या समाधीपासून ते ताडोबा अभयारण्यापर्यंत किंवा एरवीच- पंचक्रोशीत कुठेही कोणतेही प्रेक्षणीय स्थळ नसताना कुठल्याही जागी जी कृती महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत घडू लागली, ती म्हणजे सेल्फी काढणे. शेजारच्या गुजरातेत तर मतदान केंद्राच्या बाहेरसुद्धा अवघ्या दीड वर्षांपूर्वी सेल्फी टिपला गेला, त्यानंतर आपल्या समाजात सेल्फीला राजकीय महत्त्वही आले. दिल्लीदरबारी पत्रकार मंडळीही लाडक्या नेत्यांसह सेल्फी काढू लागली.. पोरासोरांची नवीच हौस म्हणून हसण्यावारी न्यावे एवढी साधी ही बाब नाही, हे साऱ्यांच्याच लक्षात आले. साऱ्यांच्या म्हणजे अगदी जगभर साऱ्यांच्या. कारण जगही मागे नव्हतेच. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह डेन्मार्कचे आणि ब्रिटनचे पंतप्रधान दक्षिण आफ्रिकेत तिहेरी सेल्फी काढत आहेत हेही जगाने पाहिले.. अटलांटिकचे दोन किनारे आणि उत्तर व दक्षिण गोलार्ध असा भूगोल पचवून टाकणारा तो तिहेरी सेल्फी, हा पाचपोच नसलेल्या आत्ममग्नतेचा उत्तुंग नमुनाच ठरला. साध्या शब्दांत सांगायचे तर, सेल्फी काढणारी मंडळी काळवेळ पाहत नाहीत ती कशी आणि किती, याचे टोकच त्या तिहेरी सेल्फीने गाठले.. तिघा नेत्यांनी सुहास्य वदनाने हा सेल्फी ज्या प्रसंगी एकत्र आले असता टिपला, तो प्रसंग होता वर्णभेदविरोधी लढय़ाचे नेते नेल्सन मंडेला यांच्या अंत्यविधीचा. अशा गंभीर वेळी आत्ममग्नच राहणे हे या नेत्यांनी निभावून नेले. चार दिवस लोकांनी या तिघांना धुत्कारले, प्रसारमाध्यमांनी फटकारले आणि मग सारे शांत झाले. ही घटना २०१३ सालच्या डिसेंबरातली. त्यानंतरच्या दोन वर्षांत जगाने स्वत:ला स्वयंचित्रांबाबतची स्वयंशिस्त लावून घेतली, असेही नव्हे. उलट काही मोजक्याच ठिकाणी का होईना, पण ‘येथे सेल्फी काढू नये’ अशा पाटय़ा दिसू लागल्या.. एरवी ‘येथे धूम्रपान करू नये’ किंवा ‘येथे लघवी करू नये’ अशा पाटय़ा दिसतात, तेव्हा त्यांची किती बूज राखली जाते हे वेगळे सांगायला नको. तेव्हा या सेल्फी-प्रतिबंधक पाटय़ांनाही अन्य तत्सम पाटय़ांइतपतच मान मिळणार, हे उघड आहे. प्रश्न निराळाच आहे- अशा पाटय़ा लावूनही सेल्फीची उबळ थांबत नाही, तेव्हा तीस व्यसन म्हणावे की देहधर्माइतकाच अनावर मनोधर्म? गेल्या वर्षी- २०१५ सालात कैक जण जिवाला मुकले. हा आत्मघात करून घेणाऱ्यांत विदर्भ तसेच राजस्थानच्या सेज नामक गावात नदीवर सहलीला गेलेली मुलेसुद्धा होती. या मृत्यूंचा संबंध केवळ त्या-त्या परिस्थितीत असलेल्या धोक्याशीच होता असे मानणे, म्हणजे दुबईत हॉटेलास आग लागलेली असताना सेल्फी टिपणाऱ्या दोघा महाभागांना दहा दिवस तुरुंगात काढावे लागल्यावर अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी झाली म्हणून गळा काढण्यासारखे आहे. आगीतही ज्यांना सेल्फीच सुचला, ते दोघे शनिवारी कोठडीतून सुटले. पण त्याच दिवशी मुंबईत वांद्रे येथे बॅण्डस्टॅण्ड भागातील खडकाळ समुद्रकिनाऱ्यावर, ज्यांची आयुष्ये अजून पुरती उमललीही नाहीत अशा दोघांचे बळी सेल्फीच्या नादाने घेतले. ती हळहळ केवळ लाटेसारखी क्षणिक ठरायची नसेल, तर आत्ममग्नता कशी आत्मघाताकडे नेते आणि हा वेग स्मार्टफोनने किती वाढवला, याचाही विचार व्हायला हवा.