म्हणजे आतापर्यंत आम्ही ताजमहालकडे ज्या नजरेने पाहात होतो ते सगळे फुकटच गेले म्हणायचे? आम्ही मन लावून वाचलेल्या इतिहासाचे काय? तो वाचताना फुगलेल्या आमच्या छातीचे काय? त्या छातीला आणि इतिहासालाही टाचणी लावण्याचा अधिकार केंद्र सरकारला आणि त्यांच्या पुरातत्त्व विभागाला कोणी दिला? भर न्यायालयात सांगतात ते, की ताजमहाल हे तेजोमहालय नाही. ती एक कबर आहे मुमताज महलची आणि ती शाहजहानने बांधली. खरे तर, ज्या कोणा व्यक्तीने ख्यातकीर्त इतिहासकार पु. ना. ओक यांच्या इतिहासाभ्यासामागील तर्कशक्तीचा अभ्यास केला आहे, तो एका क्षणात केंद्र सरकारचा हा इतिहास नेस्तनाबूत करील. साधी इतिहासमान्य व तर्कशुद्ध बाब आहे की, कोणता पुरुष आपल्या पत्नीसाठी इतका खर्च करून अशी वास्तू बांधील? आता राहता राहिला मुद्दा ते मंदिर असल्याचा. तर राजमान्य राजेश्री पु. ना. ओक यांनी त्यासाठी एक पुस्तकभर पुरावे देऊन ताजमहाल हे तेजोमहालय असल्याचे सिद्ध केलेच आहे आणि हे पुरावेही कसे? तर्कशुद्ध आणि इतिहासनिष्ठ. म्हणजे तुम्हीच पाहा, आहे का कोणत्याही मुस्लीम इमारतीच्या नावात महाल हा शब्द? मग तो ताजमहालाच्या नावातच कसा? तेव्हा ही इमारत मुस्लीम बादशहाने बांधलेलीच नाही. झाले सिद्ध! शिवाय त्या इमारतीच्या नक्षीकामात किती तरी हिंदुस्थानी प्रतीके वापरली आहेत. कलश वगैरे. मुस्लीम कबरीवर कोण अशी कलाकुसर करील? पण केंद्र सरकारला वा त्यांच्या इतिहासकारांना हे महत्त्वाचे पुरावेही मान्य नाहीत, याला काय म्हणावे? आता हेच पाहा, आपल्याकडे किती तरी इमारतींमध्ये फ्रेंच विण्डो बसविलेल्या असतात. तेव्हा या इमारती फ्रेंचांनीच बांधल्या हे त्यावरून सिद्ध होत नाही काय? किंवा महाराष्ट्रातील खेडोपाडय़ांतील अनेक घरांवर मंगळुरी लाल कौले चढविलेली असतात. त्यावरून ही घरे मुळात मंगळुरी लोकांचीच आहेत हे सिद्ध होत नाही काय? मग? ही साधी गोष्ट जर या इतिहासकारांना समजत नसेल, तर त्यांना हिंदुद्रोहीच म्हणू नये काय? पण हल्ली आमची अगदी रा. रा. ओक यांच्याप्रमाणे खात्रीच पटत चालली आहे, की जगातील या सर्व इतिहासकारांना नेमका इतिहास म्हणजे काय हेच समजत नाही. ते समजत असते, तर त्यांच्या हे लगेच लक्षात आले असते, की प्राचीन काळातील लोकांनी सर्रास चुकीचा इतिहास तयार करून ठेवला आहे. अनेक घटना त्यांनी तद्दन चुकीच्या घडविल्या आहेत. आम्हाला खात्री आहे.. भविष्यात कधी ना कधी अशी तांत्रिक प्रगती होईल की, आपण आजच्या वर्तमानात जो इतिहास लिहू त्यानुसारच भूतकाळातील घटना घडतील. तसे जेव्हा घडेल, तेव्हा तीच पु. ना. ओक यांच्यासारख्यांच्या इतिहासलेखनाला खरी आदरांजली असेल. आता ती मिळेपर्यंत आपल्याला ताजमहाल ही कबरच आहे हे समजून चालावे लागेल. त्याला नाइलाज आहे. जगाच्या सुरात सूर मिसळून केंद्र सरकारच ‘वाह ताज’ म्हणत आहे, त्याला आपण तरी काय करणार?