News Flash

ऑल इंडिया बेअक्कलपणा!

भारतरत्नांचा अवमान हा कधीही टीआरपीदेय मुद्दा

 

राज्यसभेचे खासदार व क्रिकेटपटू भारतरत्न सचिनजी तेंडुलकर आणि गानसम्राज्ञी भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर यांच्यावर कोणा फडतूस तन्मय भट याने फालतू विनोद केल्याचे ऐकून संपूर्ण भारतात खळबळ माजली आहे. भारतमातेचे सुपुत्र व लोकनेते अनुपम खेर यांच्यापासून थोर (थोरच!) नट रितेश देशमुख, थोर नटी सेलिना जेटली तसेच ‘खडा है खडा है’सारखी सदाबहार गाणी देणारे थोर दिग्दर्शक व सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्यासारख्या अनेकांनी त्या तथाकथित विनोदी ध्वनिचित्रफितीवर जोरदार टीका केली आहे. अशा गंभीर प्रसंगी आपले राजकीय नेते तरी कसे मागे राहतील? समोर राज्यातील दुष्काळ आ वासून उभा आहे, महागाईपासून नालेसफाईपर्यंतचे अनेक प्रश्न पडले आहेत. पण ते तसे रोजचेच. त्यात आता काही तशी गंमत उरली नाही. आता दुष्काळ म्हटला तरी एकदा तिकडचा दौरा करून आल्यानंतर त्यात बोलण्यासारखे काय उरते? त्याहून भारतरत्नांचा अवमान हा कधीही टीआरपीदेय मुद्दा. निहलानींनी तर या प्रश्नावर त्या भटास मोक्का लावावा अशी मागणीच केली आहे. तेव्हा त्याच्यावर किमान गुन्हा दाखल करणे हे तर आमच्या लोकप्रतिनिधींचे कर्तव्य ठरतेच. ते त्यांनी बजावले असून, पोलिसांनीही तातडीने त्याची दखल घेत ती देशविरोधी ध्वनिचित्रफीत इंटरनेटवरून काढून टाकावी यासाठी पावले उचलली आहेत. एकंदर झाले ते सगळे रिवाजानुसारच झाले असून, यातून यापुढील विनोदवीर तरी नीट धडा घेतील अशी अपेक्षा आहे. ती करताना मात्र अनेकांच्या मनी राहून राहून एक प्रश्न येत असेल की, नासिक आणि नासिका यांची वारंवार विचारपूस करणाऱ्या आपल्या मनसम्राट नेत्यास हे सर्व पाहून काय बरे वाटत असेल? कां की तन्मयच्या विरोधात सर्वात मोठा आवाज कोणी दिला असेल तर तो मनसम्राटांच्या राजनिष्ठांनीच. तो आवाज ऐकून त्या नेत्यास आपण पवार, फडणवीस, सोनिया आदी मंडळींच्या केलेल्या नकला तर आठवल्या नसतील? तन्मयने केलेला विनोद हा तिसऱ्या दर्जाचाच होता. कट्टय़ावरून कोणी तरी तोंड झाकून कोणास एऽ टकल्या अशी हाक मारावी असा तो विनोद. सध्या तर समाजमाध्यमांतून त्याचे पेवच फुटले आहे. कोणास फेकू म्हणणे, कोणास पप्पू म्हणणे आणि ते वाचून खदाखदा हसणे हे आपले विनोदी पर्यावरण. असे असताना त्या बिचाऱ्या तन्मयला झोडले जात असताना पाहून त्या नेत्याच्या मनात कदाचित काही व्यंगचित्रांच्या कल्पनाही तरळून गेल्या असतील. त्याला असेही वाटून गेले असेल की, या असल्या मूर्ख गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे सोडून आपण त्यावरून रान पेटवतो, हा सगळा सध्या सर्वदूर सुरू असलेल्या लोकप्रिय सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचाच भाग असावा. त्या कार्यक्रमाचे नाव माहीत आहे ना? – एआयबी अर्थात ऑल इंडिया बेअक्कलपणा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 4:00 am

Web Title: tanmay bhat insults lata mangeshkar sachin tendulkar
Next Stories
1 आयपीएलची ‘कोंबडी’
2 उपऱ्यांचे उपकार
3 बोधकथा!
Just Now!
X