19 November 2019

News Flash

धरण बांधिते..

ती बातमी पुन्हा वाचून काढताना, बालपणाचे दिवस त्याच्या नजरेसमोरून सरकू लागले.

संग्रहित छायाचित्र

पर्यटनाच्या उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील धरणांचा परिसर खासगी क्षेत्राच्या हवाली करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची बातमी वाचून चिंतूच्या बापाने हातातला चहाचा कप खाली ठेवला. ती बातमी पुन्हा वाचून काढताना, बालपणाचे दिवस त्याच्या नजरेसमोरून सरकू लागले. गावाची आठवण अनावर होऊन त्याने आवंढा गिळला, आणि वर्तमानपत्राचे पान चेहऱ्यावर पांघरून घेऊन त्याने डोळे मिटले. आता ते गाव त्याला स्पष्ट दिसत होते. खूप वर्षांपूर्वी कधी तरी, राहते घर, शेतीवाडी, अंगणातली तुळस, गावातले देऊळ, सारे मागे सोडून बिऱ्हाड पाठीवर बांधून त्यांनी गावाला अखेरचा दंडवत घातला होता. नंतर ते गाव पाण्याखाली गेले. तिथे मोठे धरण झाले. कधी तरी एखाद्या दुष्काळी उन्हाळ्यात, धरणाच्या पाण्यानं तळ गाठला की खालची जमीन दिसायची आणि त्या बुडालेल्या आठवणींचे अवशेष टीव्हीवरल्या एखाद्या बातमीतुकडय़ातून अंधूकसे समोर यायचे.. तशा बातम्या पाहताना धरण कोरडंठाक व्हावं, आणि पाण्याखाली हरवलेल्या घरात हुंदडण्यासाठी गावाकडे धाव घ्यावी, असा विचारही मनाला विळखा घालून राहायचा. धरणाखाली गाव गेलेल्या अनेकांपैकीच आपण एक आहोत, विकासासाठी धरण हवेच असे बजावत स्वतच्याच मनाची समजूत काढायचा, आणि आपल्या घरादाराला कवेत घेऊन उभ्या राहिलेल्या धरणामुळे झालेल्या विकासाच्या वार्ता कुठे वाचायला, पाहायला मिळतात का, याचा शोध घेत वेळ घालवायचा.. सरकारी आकडेवारीवर आधाशी नजर फिरवत बसायचा.. एवढी धरणे झाली, एवढा बक्कळ पाणीसाठा तयार झाला म्हणतात, तरी प्रत्येक उन्हाळ्यात पाण्याचा दुष्काळ का, असा प्रश्न त्याला नेहमीच छळायचा. एवढी धरणे होऊनही सिंचनाखालच्या क्षेत्राची आकडेवारी नेमकी सापडत कशी नाही, याचे कोडेही त्याला छळायचे.. धरण बांधल्यानंतर आपण त्या गावाकडे फिरकलोच नव्हतो, हे आज त्याला आठवले, आणि त्याने चेहऱ्यावरचे वर्तमानपत्र समोर धरून ती बातमी पुन्हा एकदा वाचून काढली.. आता धरणांच्या परिसराचा पर्यटनासाठी विकास करण्याचे काम खासगी क्षेत्राला द्यायचे सरकारने ठरविले आहे, हे वाचून त्याचे डोळे चमकले. आता पर्यटनाच्या निमित्ताने गावाकडे जावे, पाण्याखालच्या, भूतकाळात हरवलेल्या गावाचा शोध घेण्यासाठी पाण्याचा तळ धुंडाळून काढावा, जलपर्यटनाच्या निमित्ताने धरणात फिरणाऱ्या होडीतून गावावरच्या पाण्यावर फेरफटका मारावा, आणि आपले बालपण सरले त्या जागी होडी थांबवून, हरवलेल्या आठवणीचा धागा पुन्हा मनाशी जोडता येतो का ते पाहावे असेही चिंतूच्या बापाला वाटू लागले.. पुन्हा तो विचारात हरवला.. गावकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात, लहानपणी म्हटलेली कविता त्याच्या मनात लक्कन डोकावली.

बऱ्याच वर्षांनंतर आज त्याचे शब्द फिक्कट झाले होते.. तरीही त्याला काही शब्द आठवलेच.. ‘पेरापेरांत साखर, त्यांच्या शिवारात आली, घोटभर पाण्यासाठी, मैलमैल धुंडाळते.. माझं मरण, मरण कांडिते’.. दया पवार यांची ती कविता गुणगुणत चिंतूच्या बापाने थंडगार झालेल्या चहाचा उरलेला घोट घशाखाली रिचवला, आणि वर्तमानपत्र काखेखाली पकडून तो गॅलरीत गेला. रस्त्यावरची गर्दी धरणाच्या पाण्यागत संथपणे हेलकावे खात सरकत होती, गर्दीच्या पावलाखालचा रस्ता दिसेनासा झाला होता..

First Published on June 13, 2019 2:12 am

Web Title: tourism in maharashtra 3
Just Now!
X