News Flash

आपुले मरण पाहिले म्या डोळां..

उज्ज्वल उद्याच्या दिशेने मुंबईची दौड आता रोखता येणार नाही.

उज्ज्वल उद्याच्या दिशेने मुंबईची दौड आता रोखता येणार नाही. या वेगाच्या आड येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यास बाजूला सारून, विकासाचे स्वप्न दिवसागणिक आकारास येत आहे. मुंबईच्या कालपर्यंतच्या विकासाचे साक्षीदार ठरलेले काही वृक्ष या नव्या चाहुलीने काही महिन्यांपूर्वी हरखून गेले. या वृक्षांच्या फांदीफांदीवर बहरणारी नवी पालवी या विकासाची वाटचाल उत्सुकतेने न्याहाळू लागली, पिकल्या पानांकडून जुन्या विकासाच्या कथा ऐकत निबरपणे नव्या विकासाकडे डोळे लावून बसली. दिवसागणिक हजारो कष्टकऱ्यांच्या माथ्यावर सावली धरण्याच्या ध्यासाने या झाडांनी सिमेंटच्या जंगलातही आपली मुळे घट्ट रोवली होती. एकएक दिवस उलटत गेला, आणि एका अनपेक्षित क्षणी, याच झाडांच्या खोडांवर खिळे ठोकून सरकारी नोटिसा लावल्या गेल्या. जिवंतपणाची अखेरची तारीख नोंदविलेले फलक स्वत:च्याच शरीरावर मिरवताना या झाडांना वेदना झाल्याही असतील, पण मुंबईकरांना आजवर दिलेल्या सावलीच्या परतफेडीच्या विश्वासावर विसंबून त्या नोटिसा अंगावर मिरवत मुंबईच्या विकासासाठी ही झाडे आपले अस्तित्व पुसण्यासाठी मूकपणे सिद्ध झाली. फूटपाथच्या कडेला रांगेत गळ्यात गळे घालून वाढलेल्या या वृक्षांनी त्यानंतर अनेकदा मूकपणे आक्रोशही केले असतील.. पण विकासासाठी सुरू असलेल्या गदारोळात, आक्रोशाचा हा अनोळखी आवाज कुणाच्या कानावर फारसा पडलाच नसेल. काही निसर्गप्रेमींच्या अखेरच्या प्रयत्नांमुळे, पुनरेपणाच्या रूपाने काही वृक्षांच्या जिवंतपणाच्या आशा पालवल्या असतील.. खांद्याला खांदा लावून अनुभवलेल्या असंख्य आठवणींनी आणि भविष्यातील विरहाच्या वेदनांनी अनेक वृक्ष कळवळून गेले असतील. अखेर जुन्या, वठलेल्या, कित्येक दशके कष्टकऱ्यांवर सावली धरणाऱ्या वृक्षांची कत्तल झालीच, आणि काही मोजक्या, नव्या वृक्षांना नव्या जागी वसविण्याचा संकल्प सोडला गेला. मेट्रो प्रकल्पाच्या रूपाने येऊ घातलेल्या जागतिक दर्जाच्या या विकासाच्या गदारोळातही, आपले अस्तित्व जपण्याचे ‘माणुसकीचे भान’ जागे आहे, या कल्पनेने सुखावलेले उरलेसुरले वृक्ष दुसऱ्या जागी जाण्यास सिद्ध झाले असतील. नव्या जागी, नवी पालवी घेऊन नव्याने मुळे रुजवत नव्या, अनोळखी जगावर सावली धरण्यासाठी ते तयार झाले असतील.. तो दिवसही उजाडला, एकमेकांचा निरोप घेऊन हे वृक्ष आपापल्या नव्या जागी उभे राहिले, आणि लांबूनच विकास न्याहाळण्यासाठी आतुर झाले. पण पुनरेपणाच्या प्रयोगानंतर नवी पाने फुटलीच नाहीत, नवी मुळे रुजलीच नाहीत. आता अनेक झाडांना अखेरच्या श्वासाचा ध्यास लागला आहे. कित्येकांनी जगण्याचा नादच सोडला आहे. कित्येक दशकांपासून विकसित होणाऱ्या मुंबईच्या या साक्षीदारांच्या नशिबात, उद्याचा विकास पाहण्याचे भाग्य मात्र लिहिलेले नाही. मरणाची वेळ कधीच कुणाला कळत नाही असे म्हणतात. या वृक्षांपैकी अनेकांनी तर ती स्वत:च्या छातीवर मिरवली होती, उरलेल्यांना आपले मरण ‘याचि डोळा’ पाहावे लागणार आहे. विकासासाठी स्वत: काळाआड मावळणाऱ्या या वृक्षांसाठी मुंबईकराने आपल्या आठवणींचा एक कप्पा राखून ठेवायला हवा..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2018 2:38 am

Web Title: tree cutting for metro begins in mumbai
Next Stories
1 ‘दा’ चा ‘मा’!
2 ‘भूमिका’ आणि ‘गुलदस्ता’!..
3 सत्यपालांची शास्त्रवाणी
Just Now!
X