ज्यांनी संघटनेच्या वटवृक्षाला खतपाणी घालायचे, ज्यांनी त्यास फुलवायचे, खुलवायचे, त्यांनी काय सामान्य माळीबाबाप्रमाणे बागेत बसून रोपटय़ांना पाणी घालत बसावे की काय? ‘सरसंघचालकांच्या हस्ते वृक्षारोपण.. परंतु निगा नाही!’ या ‘लोकसत्ता’ने प्रथमपृष्ठी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताने अनेकांच्या मनी अशा तर्कशुद्ध सवालांचे मोहोळ उठले असून, ते रास्तच आहे. वस्तुत: सरकारी वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत ती रोपे लावण्यात आली होती. याचा अर्थ त्या वर्तमानातच त्या रोपटय़ांचे भवितव्य दडलेले होते. शासकीय योजनेच्या निव्वळ नावातूनच तिचे तंतोतंत भविष्य ओळखण्याची कला ज्यांस अवगत आहे अशा शासकीय बाबूंस एवम् राजकीय कार्यकर्त्यांस या बातमीने लवमात्र धक्का बसलेला नाही. तो बसला तो काही काडीकरणमाहीर पत्रकारू-नारूंनाच. त्यामुळे तर प्रस्तुत वृत्त देण्यात आले. एरवी त्यात जगावेगळे असे ते काय बरे घडले? वास्तविक पाहता, गत १ जुलै रोजी राज्य सरकारने दोन कोटी वृक्षलागवडींचा संकल्प तडीस नेला व त्याची नोंद लिम्का बुकानेही घेतली ही राज्याच्या इतिहासातील महाप्रचंड महाघटना. आता लिम्का बुक हे सर्वात लांब मिश्या, वाढलेली नखे अशा महाविक्रमांचीही नोंद घेते. त्यामुळे त्याने आपले नागपुरी वनमंत्रीजी सुधीरजी मुनगंटीवारजी हे हुरळून गेले तरी इतरांनी एवढे खूश होण्याचे कारण नाही हे मान्य. परंतु अखेर विक्रम तो विक्रमच. त्यास चार सूर्य लागले ते सरसंघचालकजी मोहनजी भागवतजी आणि सहसरकार्यवाहजी दत्तात्रयजी होसबळेजी यांच्या सहभागाने. त्यांनी संघ मुख्यालय परिसरातील आदितवार शाळेजवळील मैदानात रोपे लावून वृक्षवल्ली ही आपलीही सोयरी आहेत हे सिद्ध केले. भाजपचे अध्यक्षजी अमितजी शहाजी हे ज्याप्रमाणे भाजपच्या सभासद रिक्वेस्टा पाठवून पक्षाचा महावटेश्वरवृक्ष करीत आहेत, त्याचप्रमाणे भागवतजी, होसबळेजी प्रभृतीही संघाचा वेलू गगनावेरी नेण्याचे कामी अहोरात्र मग्न आहेत. ते महत्कर्म सोडून ते या लावणीकामास आले, म्हणून आता त्यांनीच रोज येऊन त्या रोपांस पाणी घालावे? तशी अपेक्षा करणे योग्य आहे का? हे काम अन्य फ्रिंज एलिमेन्टांनी वा झालेच तर शासकीय यंत्रणांनी नको का अंगावर घ्यायला? परंतु तसे झाले नाही व शासकीय रीतीप्रमाणे त्या मैदानातील ती रोपे मरून गेली व त्यांभोवतीचे ट्री गार्ड नाहीसे झाले. परंतु यास चोरी म्हणत नाहीत, तर रिवाज म्हणतात. काही जण त्यास शासकीय कारभार असेही म्हणतात. अखेर वृक्षारोपण आणि हा कारभार एकाच तत्त्वावर तर चालत असतो, की – मा वृक्षेषु कदाचन. म्हणजे रोपे लावा. मात्र त्याचा वृक्ष होईल अशी अपेक्षा करू नका. आणि हा सिद्धांत आपल्या संस्कृतीच्या अगदी मुळाशी उभा आहे. तेव्हा दोष द्यायचा तो कोणी व कोणास? तेव्हा आपण ती बातमी विसरावी हेच उत्तम.