मुहूर्ताचा दिवस जवळ येत चालला तरी अजून काहीच घडत नसल्याने राजे बेचैन दिसत होते. वाटाघाटींचे दरवाजे उघडून झाले, बंद करून झाले, तरीही हव्या त्या उजेडाची तिरीप अजूनही अंत:पुरापर्यंत पोहोचतच नव्हती. आज सकाळी दिवाणखान्यात येरझारा घालतानाही राजेंच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. ‘ते बालाकोट झाले नसते तर एवढय़ा जागा त्यांना मिळाल्या तरी असत्या का?.. आता म्हणे ३७०चा मुद्दा पुढे करणार..‘ अचानक माघारी वळून टेबलावर मूठ आपटत राजे स्वत:शीच बोलले आणि मोबाइल घेऊन नम्रपणे राजेंच्या मागोमाग चालणाऱ्या विश्वासू सेवकाने लगेच ‘ट्विटर’वर साहेबांचे ते वाक्य कोरले.. पुढच्याच क्षणाला तेथे प्रतिक्रियांचा पाऊस सुरू झाला होता. त्या दाखविण्यासाठी सेवकाने नम्रपणे त्यांच्यासमोर मोबाइल धरला. ‘३७० हे तर आपल्या थोरल्या साहेबांचेही स्वप्न होते, असे म्हणतोय हा’.. आणखीनच झुकून सेवक म्हणाला, आणि राजे थबकले. सेवकाने निमूटपणे मोबाइल मागे घेतला. राजे पुन्हा येरझारा घालत स्वत:शीच बोलू लागले. पुन्हापुन्हा त्यांच्या तोंडून बालाकोट, पुलवामा असे शब्द येत होते. राजे बेचैन आहेत, काहीसे चिडलेदेखील आहेत हे सेवकाने ओळखले. हा राग आवरला नाही तर दुपारच्या मेळाव्यात तो उमटणार या भीतीने सेवक अस्वस्थ झाला. घाईघाईतच त्याने राजेंची सारी वाक्ये ट्विटरवर टाकली, आणि भीतभीतच राजेंना मेळाव्यासाठी तयार होण्याची आठवण केली. क्षणात राजेंचा राग मावळला. त्यांच्या चेहऱ्यावर ते नेहमीचे, ठेवणीतले हास्य उमलू लागले. पुढच्या काही वेळातच राजे तयार होऊन बाहेरही पडले होते. तिकडे मंचावर सारे जण राजेंच्या प्रतीक्षेत ताटकळले होते. ओशाळल्यागत झाल्यासारखे दाखवून राजेंनी नम्रपणे सर्वाची माफी मागितली, आणि भाषणास सुरुवात केली. आता सेवकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य दाटले होते. सकाळच्या संतापाचा लवलेशही राजेंच्या शब्दांत नव्हता. सकाळी रागाने येरझारा घालणारे, संतापाने मूठ आदळणारे राजे कुणी वेगळेच होते, असे सेवकाला वाटले, आणि भाषण करतानाचे त्यांचे सौम्य रूप तो प्रेमाने न्याहाळू लागला.. ‘येत्या निवडणुकीत आमचंच सरकार येणार’.. उजव्या हाताची मूठ आवळून उंचावत राजेंनी गर्दीसमोर आवेशात घोषणा केली. मंचावर बसलेल्यांनी एकमेकांकडे पाहात टाळ्या वाजविल्या. ‘कष्टकऱ्यांच्या जिवावर इमले बांधणाऱ्यांची सेवा आता पुरे झाली, आता आपणच सरकार, आपलीच सत्ता’ असा जोशपूर्ण सल्ला देत राजेंनी सवयीने क्षणभर श्वास घेऊन गर्दीवरून नजर फिरविली. पण नेहमीची, ‘आवाज कुणाचा’ घोषणा गर्दीत घुमलीच नाही. मग साहेबांचा सूर काहीसा बदलला. इथे सगळेच आमच्या विचाराचे, आमच्या पक्षाचे असतील असे नाही, पण आम्ही मात्र तुमचे आहोत, तुम्हीच आमची वाघनखं आहात, आमचं सरकार सत्तेवर पुन्हा येईल, आणि तुमच्या घामाचे मोल तुम्हाला मिळेल, असे भावपूर्ण उद्गारही साहेबांनी काढले. सभेचा नूर भावनिक झाला. सेवकही भारावला.. सकाळी सरकारला धारेवर धरणारे, विरोधकाच्या आवेशात सरकारला जाब विचारणारे आणि लष्करप्रमुखांना चिमटे काढणारे साहेब हेच का, असा अचंबा सेवकाच्या चेहऱ्यावर उमटला. काही मिनिटे ‘विचारांचे सोने’ उधळून राजे थांबले. मंचावरील आसनावर बसताना त्यांनी सुहास्य नजरेने शेजारी बसलेल्या भाऊंकडे पाहिले. नजरानजरेनंतर उजळलेले दोघांचे चेहरे पाहून सेवकास हायसे वाटले.. ‘म्हणजे, नक्कीच यांचं ठरलंय..’ स्वत:शीच मोठय़ाने बोलत त्याने चुटकी वाजविली. पण राजेंनी सांगितल्याशिवाय ‘ट्वीट’ करायचे नाही असे ठरवून त्याने मोबाइल खिशात ठेवला.