19 November 2019

News Flash

योगबलाने आधुनिकतेवर मात..

आदित्यनाथांच्या अंगी असे योगबल पुरेपूर मुरलेले आहे, याची आम्हास तरी बालंबाल खात्री पटते आहे

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संग्रहित छायाचित्र

पुरोगामी म्हणविणाऱ्यांचा पाणउतारा करण्यासाठी ‘फेसबुकावर खाते असणे ’ एवढी एकच पात्रता पुरेशी असते. पण अख्ख्या आधुनिकतेमधील फोलपणा दाखवून देण्यासाठी आगळे योगबल अंगी असणे गरजेचे आहे.. आधुनिकतेतील फोलपणा दाखवून द्यायचा म्हणजे तिचे विज्ञान, त्या आधुनिकतेच्या आधी झालेले धार्मिक-आध्यात्मिक प्रबोधन, त्या प्रबोधनाच्या काळादरम्यान भाषा-संस्कृतीची झालेली घडण.. हे सारे कसे आणि का बिनमहत्त्वाचे ठरते, हेही दाखवून द्यावेच लागणार. नाही तर मग आपणा सामान्यजनांसारखी फसगत होते- हातातल्या मोबाइलवरून ‘मोबाइलचा वापर कसा हानिकारक’ यासारखा संदेश पाठवायचा, वर ‘आवडला तर पुढे पाठवा’ म्हणूनच हाही संदेश संपवायचा आणि मोबाइलचा वापर आणखीच वाढवायचा- हे त्या फसगतीचे निव्वळ एक उदाहरण. पण योगबल अंगी असेल तर अशी फसगत होत नाही.

आदित्यनाथांच्या अंगी असे योगबल पुरेपूर मुरलेले आहे, याची आम्हास तरी बालंबाल खात्री पटते आहे. योगबलाने आधी त्यांनी एक मोठे राज्य प्राप्त केले. खरे तर येथेच ते, आपणा जनसामान्यांपेक्षा निराळे ठरले. पण त्यांचे कार्य  आधुनिकतेतील फोलपणा दाखवून देण्याचे, हे त्यांनी ओळखले असावे. सप्टेंबर २०१७ मध्येच त्यांनी आधुनिक वैद्यक- ज्याला आपण सामान्यजन ‘अ‍ॅलोपॅथी’ म्हणून ओळखतो- ते ‘आधुनिक’ असल्यामुळेच कसे फोल आहे, हे सप्रमाण दाखवून दिले. गोरखपूरच्या रुग्णालयातील त्या बालकांडाने तेव्हा अनेकांना वाईट वाटले असेल, पण योगी अविचल होते. मनुष्य जन्मास येतो, मृत्यू होतो, हे त्यांना माहीत होते. आधुनिकतम अशा संगणक उद्योगामध्ये एखादा मनुष्य उच्चपदी असेल, तरी त्यालाही एखाद्या गुंडाचा ‘एन्काऊंटर’ करावा त्या प्रकारे मृत्यू येऊ शकतो, हेही याच योगबलाचा प्रभाव असलेल्या राज्यात प्रचीतीला आले. आधुनिक आस्थापनेतील आधुनिक नोकरी मिळाली आणि आपण ती कॉपरेरेट नोकरी योग्यरीत्या केली की आपण पोलिसांच्या गोळीने रस्त्यावर तरी मरणार नाही, हा आधुनिकतावादय़ांचा दंभ खरे तर तिथेच निश्चेष्ट व्हायला हवा होता, पण ते होणे नव्हते आणि योगींचे ‘अवतारकार्य’देखील संपणे नव्हते. अलीकडे आधुनिक प्रसारमाध्यमांतील नोकरचाकर मंडळींचे- ज्यांना आधुनिक भाषेत ‘पत्रकार’ असेही म्हटले जाते त्यांचे- दंभहरण करण्यासाठी याच योगबलाचा दूरस्थ असा सूक्ष्म प्रभाव दिसला. पण तो दूरस्थ आणि सूक्ष्म होता म्हणून काहीजण दिसलाच नाही म्हणाले.

यापुढले पाऊलही परवाच पडले! पत्रकारांची भाषा कोणती? योगींच्या राज्यात तरी, हिंदी वा इंग्रजीच. त्या दोन्ही भाषांखेरीज संस्कृतमध्येही सरकारी पत्रके निघू लागली! ही गीर्वाणभाषा आधुनिक पत्रकारांना येत नाहीच, पण आधुनिक शिक्षण घेतलेल्यांनाही ‘दहावीच्या मार्कापुरतीच’ येते, हा आधुनिकतेचा फोलपणाच नव्हे काय? अर्थात, योगींचे कार्य केवळ पत्रके संस्कृतात आली म्हणून संपेल असे नव्हे.. ‘संस्कृत वाणी देवे केली, प्राकृत काय चोरापासोन जाली’ अशा एकनाथ महाराजांच्या प्रबोधनविचारांना थाराही न देता, संस्कृतपासून संस्कृतीची कूच सुरू होते आहे.. आधुनिकता हरणारच आहे!

First Published on June 20, 2019 5:04 am

Web Title: uttar pradesh chief minister yogi adityanath decision in cabinet meeting
Just Now!
X