तमाम जागरूक नागरिकहो, गेल्या वर्षभराहून अधिक काळ तुम्ही ज्याच्या शोधात होता, ते खासदार किरीट सोमय्या सापडले आहेत. समाजमाध्यमांवर सामान्य जनतेचा वावर वाढल्यापासून कुठेही आर्थिक गैरव्यवहाराची बातमी गाजू लागली, की जनतेला त्यांची आठवण व्हायची. देशात मोदीलाट आली, आणि ईशान्य मुंबई मतदारसंघातून किरीट सोमय्या विजयी झाले. त्याआधी विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे ते मुंबईतील राष्ट्रीय नेते होते. एखादी दुर्घटना घडली, की ते तातडीने रेल्वे स्थानकावर दाखल व्हायचे. फलाट आणि गाडीचे पायदान यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी स्वत फलाटावर झोपून धोक्याचे मोजमाप करायचे, कधी सिग्नलच्या खांबावर चढून रेल्वेच्या यंत्रणेतील ढिसाळपणाचे वाभाडे काढणारी छायाचित्रेही प्रसृत करायचे. असे ‘चमकदार’ परिश्रम घेणारे, विरोधी पक्षात असताना आर्थिक घोटाळ्यांच्या विरोधात शंखनाद करणारे, आंदोलने करणारे सोमय्या खासदार झाले, आणि ईशान्य मुंबई मतदारसंघावर सोमय्यांचा झेंडा फडकला. असे हे सोमय्या, जनतेच्या मनात घर करून न राहते, तरच ती नवलाची बाब ठरती.. एखादा मल्या किंवा एखादा नीरव मोदी काही हजार कोटींचा चुना देशाला लावून देशाबाहेर पळून गेल्याच्या बातम्या येऊ लागल्या तेव्हा जनतेला अगोदर सोमय्यांचीच आठवण व्हायची. भुजबळांच्या पाठीशी हात धुऊन लागलेले, डी एस कुलकर्णीच्या अटकेसाठी देव पाण्यात घालून बसणारे सोमय्या, नीरव मोदी, विजय मल्यांसारख्यांनी केलेल्या घोटाळ्यांच्या वेळी मूकबधिरासारखे का वागतात, हे ‘कोडे’ समाजमाध्यमांवरून जनतेने ‘व्हायरल’ केले, आणि एक शोधमोहीमच सुरू झाली. आपल्या (बुलंद) यंत्रणेच्या जोरावर घोटाळ्यांच्या नावाने शंखध्वनी करीत मोजक्यांवर शरसंधान करणारे सोमय्या अचानक गायब झाल्यासारखे भासू लागले. अशा वेळी जनतेला त्यांची आठवण होणे साहजिकही असते. त्यानुसार, ‘आता कुठे गेले किरीट सोमय्या,’ असा प्रश्न वारंवार विचारला जाऊ लागला होता. समाजमाध्यमांची एक गंमत असते. असे काही प्रश्न तेथे एखाद्या आजाराच्या साथीसारखे फैलावत जातात. तसे या प्रश्नाचेही झाले. पुढे लोकांना हा प्रश्न एवढय़ा जिव्हाळ्याचा झाला, की आर्थिक मुद्दय़ावर कुठेही ‘खुट्ट’ झाले तरी ‘आता कुठे गेले किरीट सोमय्या’ असे विचारले जाऊ लागले. जनतेला अशी पदोपदी आठवण यावी असे भाग्य क्वचितच कुणाच्या वाटणीस येते. सोमय्यांना ते लाभले, तरीही ते कुठे आहेत याचा ठावठिकाणा अनेकांना लागतच नव्हता. आर्थिक घोटाळ्यांचा धुमाकूळ सुरू झाला, आकडे लाख-लाख कोटींच्या घरात गेल्याच्या बातम्या येऊ लागल्या, आणि सोमय्या जणू अज्ञातवासात गेले. ते असे अचानक गायब झाल्याने जनता अस्वस्थ झाली. पण आता ही अस्वस्थता संपली आहे. सोमय्या सापडले आहेत, आणि ते रस्त्यावर आल्याचेही स्पष्ट झाले आहे. जनतेच्या समस्या सोडविण्याच्या ध्यासाने फिरत असताना त्यांनी एका फेरीवाल्यास धक्काबुक्की केली, त्याच्याकडील पैशाच्या नोटा हिसकावून, त्यांचे तुकडे करून ते त्याच्या तोंडावर फेकले आणि वर त्याला दमदाटीही केली अशा तक्रारी पोलीस ठाण्यात सोमय्यांविरोधात दाखल झाल्या आहेत. ते सत्ताधारी पक्षाचे खासदार असल्याने, त्यांच्याविरुद्धची तक्रार अदखलपात्र असणार हे खरे असले, तरी ‘आता कुठे गेले किरीट सोमय्या’ या दीर्घकाळापासून छळणाऱ्या प्रश्नाचे उत्तर तरी मिळाले आहे. सोमय्या आजही क्रियाशील आहेत, केंद्रात मोदी, राज्यात फडणवीस आणि ‘ईशान्य मुंबईत सोमय्या’ असल्याचा दाखला आता जनतेला मिळाला आहे. ईशान्य मुंबईत त्यांचे ‘स्थानिक स्वराज्य सरकार’ आहे. लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या असताना ते सापडले आहेत, याचा आनंद काही थोडका नाही..