बा अदब बा मुलाहिजा होश्शियार.. दसहजारी मनसबदारांच्या दरबारात आणखी एक मनसबदार दाखल होत आहे. विक्रमशिरोमणी, क्रिकेटभूषण साक्षात विराट कोहली! इतर दसहजारी मनसबदारांच्या रेल्वेगाडय़ांच्या तुलनेत विराटची बुलेट ट्रेन वेगानं दौडत आलीये. त्याबद्दल त्याचं अभिनंदन.  ९ हजार ते १० हजार या प्रवासात त्यानं अवघे ११ सामने/ डाव घेतलेले आहेत. बहुधा त्यालाही मोदी-फडणवीस द्वयीप्रमाणे २०१९ सालाची ‘किक’ बसली असावी. नाही तर इतक्या घाईचं कारणच काय? असो.

गेली अनेक वर्ष भारताचा हा कर्णधार धावांच्या राशी अव्याहतपणे रचित आहे. साक्षात विक्रमादित्य सचिन तेंडुलकरलाही त्यानं या शर्यतीत मागे टाकलं आहे. आता सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतकं, सर्वाधिक अर्धशतकं.. ही यादी मोठी आहे. विक्रमवीर सुनील गावस्कर, विक्रमादित्य सचिन तेंडुलकरपाठोपाठ विक्रमशिरोमणी विराट कोहली!

तरीपण, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा मान राखून स्तुतिफटाके आवरते घेऊन काही प्रश्न..

क्रिकेट हा सांघिक खेळ. यात एखादा फलंदाज धावांच्या राशी उभ्या करतो याचा अर्थ बाकीचे फलंदाज पुरेशा धावा झिरपत नाहीत असा होतो का? विराट सर्वोत्तम ठरतो याचाच अर्थ भारतीय संघात त्याच्या तोडीचा कोणी खेळताना दिसत नाही. किंबहुना, विराट नावाच्या धावांच्या मशीनची घातक सवय बाकीच्यांच्या अंगवळणी पडू लागलीये का? बुधवारी विराटनं खणखणीत शतकाच्या साह्य़ानं १० हजार धावा जमवल्या, पण आपला संघ हरता-हरता राहिला. जगात पहिल्या क्रमांकावर असलेला संघ, त्याचा आठव्या क्रमांकाच्या संघाबरोबर सामना कसाबसा बरोबरीत राखतो, हा आपल्या सांघिकतेचा पराभव आहे का? इंग्लंडात पुढील वर्षी होऊ घातलेल्या विश्वचषक स्पर्धेत पहिल्या ते सातव्या क्रमांकांवर विराटच खेळणार आहे का? तसे नसल्यास (म्हणजे नसेलच) आणि एखाद्या सामन्यात विराट अपयशी वा जायबंदी ठरल्यास भारतीय संघ जिंकूच शकणार नाही का? त्याच इंग्लंडात नुकतीच आपण एकदिवसीय मालिका गमावली, ती गमावणारच या खात्रीने तीनच सामन्यांची ठेवण्यात आली होती का? वेस्ट इंडिजसारखा खिळखिळा झालेला संघ विराटच्या भारतीय संघाविरुद्ध इथं येऊन तोडीस तोड भिडतोय याबद्दल चिंतन करायचं की ते सगळं टाकून तिन्हीत्रिकाळ विराटचं अभिनंदन करायचं?

आता जरा सचिन-विराट तुलनेविषयी.. ब्रॅडमनची तुलना कुणी डब्ल्यू. जी. ग्रेसबरोबर केली? सोबर्सची तुलना कुणी ब्रॅडमनबरोबर केली? रिचर्ड्सची तुलना कुणी सोबर्सबरोबर केली? कारण त्या वेळी आमचे खेळाडू चमकत नव्हते. ते चमकू लागल्यानंतर तुलना उद्योग फोफावू लागला. गावस्कर-झहीर अब्बास, वेंगसरकर-मियाँदाद, सचिन-इंझमाम.. आता सचिन-विराट.. दोघांमध्ये असलंच तर साम्यच आहे. वेडगळ अपेक्षांचं ओझं दोघांनाही वागवावं लागतंय.  संघाचं काहीही होवो, पण त्यांनी उत्तम खेळलं पाहिजे. मग सर्वोत्तम फलंदाज, शतकातला किंवा इतिहासातला सर्वोत्तम फलंदाज वगैरे बिरुद त्यांनी मिरवण्यापेक्षा आम्ही ते चिकटवलं पाहिजे. हा क्रिकेटघाणा खेळ आम्ही कधी थांबवणार का?