‘मुंबई में रहना होगा, तो मराठी सीखना होगा’ असे सज्जड इशारे देत माय मराठीची मशाल धगधगती ठेवणाऱ्या तमाम राजकीय/ बिगर-राजकीय मराठी नेत्यांनो, तुमच्या प्रदीर्घ लढय़ाला यश आले आहे. मराठीची पताका साता समुद्रापार एवढय़ा जोराने फडफडू लागली आहे, की महाराष्ट्रात मराठीची कास धरावयास हवी हे त्या गुगलबाबानेही ओळखले आहे. आता गुगलबाबादेखील मराठीच्या मागे धावतो म्हटल्यावर, देशातल्या बिगरमराठी माणसाचीच नव्हे, तर संस्था-सरकारांचीही छाती दडपून गेली असणार यात नवल नाहीच. एरवीच, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने, ‘इथे रहायचे तर आहे, आणि मराठीचा मात्र गंध नाही’, हे चालणार नाही असे अनेकांना वाटावे यामागेही आंदोलनांची धग हेच कारण असणार यात शंकाच नाही. मुंबईच्या रेल्वेगाडीतही मराठीचा वापर वाढल्याचे प्रवासादरम्यान होणाऱ्या हमरीतुमरीवरून दिसू लागलेच आहे. ही झाली प्रवाशांची बात! प्रत्यक्ष रेल्वेनेही मराठी बाण्याचा धसका घेतलेला दिसतो. म्हणूनच, ‘पावलोपावली मराठी’ हा अभिनव प्रयोग रेल्वेने हाती घेतला आहे. हा मराठमोळ्या मशालीचा धगधगता विजय आहे. मुंबईच्या रेल्वेच्या पायरीपायरीवर धंदाव्यसायानिमित्त आक्रमण करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना ‘मराठी आना होगा’, हा इशारा आता तरी ‘काफी’ वाटू लागला असेल. ज्या रेल्वेने त्यांना मुंबईत आणून सोडले, त्या रेल्वेनेदेखील मराठीची कास धरल्याचे पाहून आता मराठी शिकणे सोपे असल्याचे त्यांनाही उमगले असेल. सांप्रतकाळी प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन नावाचे यंत्र असल्याकारणाने, गुगलबाबा हा ज्याचा त्याचा पहिला मार्गदर्शक झाला आहे. त्याच्या एका पोतडीत मराठी शिकविणारे एक यंत्र बसविलेले असते. ते यंत्र स्मार्टफोनमध्ये घुसविले, की मराठीची ऐशीतशी!.. कोणत्याही भाषेतून मराठीत यायचे असेल, तर फक्त टाईपावे! एका ‘टिचकी’सरशी मराठी समोर हात जोडून उभी राहाते. खोटे वाटत असेल, तर रेल्वेला विचारा. मुंबईत बहुसंख्य प्रवासी कसेही असले तरी मराठी जाणतात हे गृहीत धरून रेल्वेनेदेखील अलीकडे तोच प्रयोग केला आहे. एल्फिन्स्टनच्या चेंगराचेंगरीनंतर प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च महत्त्व देण्याचे केवळ ठरवून चालणार नाही, तर त्यासाठी सज्जड उपाय केला पाहिजे हे रेल्वेने ओळखले आणि मराठी माणसासाठी जिन्यांच्या पायरीपायरीवर मराठीतून (की देवनागरी लिपीतून?) सूचनांचा भडिमार सुरू केला. ‘लहान चेंडू घेऊ नका’, ‘हॅण्ड्राईल धरून ठेवा’, ‘घसरनारी बुटे वापरू नका’, ‘एकतर बाजूला ठेवा’, अशा ‘अनमोल’ सूचना पुलांवर पावलोपावली देऊन मराठी माणसाला सावध करण्याच्या प्रयोगामुळे मराठीच्या आंदोलनास आता माघार घेण्यास हरकत नाही. आपली मराठी कोणत्या पायरीवर पोहोचली याचाही आता या आंदोलनास अभिमान वाटू लागला असेल. पण ही मराठी भाषा कळावी यासाठी मराठी माणसाला एक गोष्ट करावी लागेल.. गुगलबाबा साथीला हवा! नाहीतर, ‘जिने चढताना चेंडू कशाला हवा’ हा प्रश्न छळत राहील!