प्रदेश कार्यालयात ती नोटीस लागली आणि कार्यालयाच्या दालनादालनात घुटमळणाऱ्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली. ‘म्हाप्र संकुला’त ‘नेतृत्व प्रशिक्षण’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रात नेतृत्वगुणसंपादन वर्ग व दुसऱ्या सत्रात ‘चिअरलीडर’- अर्थात- प्रोत्साहकता नेतृत्वाचे प्रशिक्षण दिले जाणार होते. शिबिरासाठी माधवरावांच्या दालनात नावनोंदणी सुरू झाली. स्वत: माधवराव तृतीय वर्षशिक्षित निष्ठावंत असल्याने, चिअरलीडर गुणसंपादन शिबिराचे नेतृत्व तेच करणार होते. केशवराव व मधूभाऊंनीही दुसऱ्या सत्रातच चिअरलीडरचे प्रशिक्षण घ्यावयाचे आहे अशा सूचना त्यांना अगोदरच देण्यात आल्या होत्या. नव्याने दाखल झालेल्या सर्वाना नेतृत्वगुण विकासाचे धडे प्रत्यक्ष श्रीयुत विसबुद्धे हे देणार होते, तर चिअरलीडर- अर्थात, प्रोत्साहकता नेतृत्वगुण सत्राचे संचालन माधवरावांनी करावयाचे होते.  ठरल्या दिवशी प्रशिक्षण सुरू झाले. पहिल्या सत्रात नवागतांचे जोरदार स्वागत करून भविष्यात त्यांना देण्यात येणाऱ्या पदांची व मानसन्मानाची  कल्पना देण्यात आली. नवागत ही आपल्या संघटनेची ताकद असल्याने, निष्ठावंतांनी त्यांना प्रोत्साहित करण्याकरिता जिवाचे रान करावे हा या प्रशिक्षणाचा उद्देश होता हे एव्हाना स्पष्ट झाले होते. त्यानुसार, नवागतांना नेतृत्वाच्या पहिल्या फळीचे प्रशिक्षण देताना, नवागतांनी करावयाचे कळीचे राजकारण, नवागतांची संख्या वाढवून प्रतिस्पध्र्याना खिंडार पाडण्याकरिता फोडाफोडीत पाळावयाची पथ्ये, बदल्या-नेमणुका, भूखंडादी व्यवहार करताना घ्यावयाची सावधगिरी, इत्यादींची सखोल माहिती देण्यात आली. विसबुद्धे यांनी, ‘हे नवागत प्रशिक्षणार्थी निष्ठावंतांहूनही हुशार व सद्य:स्थितीतील सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत सक्षम असेच आहेत’ असे तोंडी प्रमाणपत्र देऊन शिबिराचा भावपूर्ण समारोप केला.  नंतर दुसऱ्या सत्राची तयारी दालनात सुरू झाली. प्रत्येक निष्ठावंत प्रशिक्षणार्थीच्या आसनासमोर झिरमिळ्यांचे रंगीबेरंगी झुबके आणून ठेवले गेले, आणि ‘एकश: संपत’ असा आदेश ध्वनिक्षेपकावर घुमला. माधवरावांनी प्रशिक्षकपदाचा ताबा घेतला होता. अगोदर त्यांनी निष्ठावंतांची भूमिका समजावून सांगितली. सतरंज्या अंथरणे, खुच्र्या लावणे, सारे काही शिस्तीत पार पडेल याची दक्षता घेणे व काहीही झाले तरी मैदानात स्वत न उतरणे आदी पथ्ये सांगून झाल्यावर, ‘हे तर नेहमीचेच आहे’ असे वाटून सर्व जण एकमेकांकडे पाहत असतानाच, रंगीत झिरमिळ्या हाती धरण्याचा आदेश माधवरावांनी दिला, व ते बोलू लागले. या झिरमिळ्या घेऊन मैदानाच्या सीमारेषेवर उभे राहावयाचे असून नवागतांच्या प्रत्येक पराक्रमानंतर झिरमिळ्या उंचावत तालबद्ध नृत्य करावयाचे आहे, असे सांगून त्यांनी एक नृत्याविष्कार करूनही दाखविला.  दुसऱ्याच दिवशी एका भारदस्त नवागताच्या पराक्रमासाठी खुद्द माधवरावांनी मैदानाच्या सीमेवरून चिअरलीडरची भूमिका वठविली, आणि ते पाहून सारे निष्ठावंत आपापल्या भूमिकेसाठी सज्ज झाले. लवकरच होणाऱ्या निवडणुकीत नवागतांना प्रोत्साहन देण्यासाठी, आदेश येताच नाचायचे असे ठरवून त्यांनी आपापल्या हातातील झिरमिळ्यांचे रंगीत झुबके सज्ज केले..