बीएमएमच्या अधिवेशनाला शुक्रवारी (५ जुलै) सकाळी (अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार) सुरुवात होत आहे. गेली दोन वर्षे बॉस्टनचे बाळ महाले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या अधिवेशनाची कसून तयारी केली आहे. अगदी स्वतःच्या घरातला कार्यक्रम असल्याप्रमाणे सर्वांनी मन लावून काम केल्याने, आता या शेवटच्या घटकेला उत्सुकता अगदी ताणली गेली आहे. त्यातच महाराष्ट्रातून महेश मांजरेकर, प्रशांत दामले, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, संगीतकार अजय-अतुल, सुकन्या कुलकर्णी, राहुल देशपांडे, अजित भुरे, नटरंग-फेम सोनाली कुलकर्णी आणि इतर पन्नासहून अधिक कलाकार इथे येऊन दाखल झाले आहेत. दिलीप वेंगसरकर हेही खास या कार्यक्रमासाठी आले आहेत. या सर्वांच्या आगमनाने स्वयंसेवकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. इथल्या तयारीबद्दल आणि स्वागताबद्दल सर्वच पाहुण्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं. 
पाच जुलैला स्थानिक वेळेनुसार सकाळी सात वाजता हे अधिवेशन सुरु होत आहे. पहिल्या दिवशी उदघाटन सोहळा, मीना नेरुरकर यांनी निर्माण केलेलं – संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या रचनांवर आधारित ‘स्वरगंगेच्या काठावरती’ हे म्युझिकल, मराठी नाटक ‘फॅमिली ड्रामा’, आणि “कॉसमॉस बीएमएम सारेगम २०१३” या भव्य संगीतस्पर्धेच्या अंतिम फेरीचा सोहळा होणार आहे. याव्यतिरिक्त अमेरिकाभरातून स्थानिक मंडळांनी खास अधिवेशनासाठी तयार केलेले इतर अनेक रंगारंग कार्यक्रमही होतील. मराठी माणसांच्या इथल्या पुढच्या पिढीचाही उत्साह आणि आयोजनातला सहभाग वाखाणण्यासारखा आहे. पाहुण्यांच्या स्वागतासाठी अमेरिकेत वाढलेल्या या युवक-युवतींनी लेझिम आणि ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुकीचं आयोजन केलं आहे. खरंतर सर्वच लहान-थोर या अधिवेशनात आपला पूर्ण वेळ देऊन आयोजन नेटके करण्यासाठी झटत आहेत. ७५ वर्षांच्या आजी-आजोबांपासून ४-५ वर्षांच्या नातवंडांनीही तयारीचा धडाका लावला आहे. प्रॉव्हिडन्स शहरातल्या भव्य ‘कन्व्हेंशन सेंटर’मध्ये हे सर्व कार्यक्रम होत आहेत. केवळ अमेरिकेतूनच नव्हे; तर जगाच्या कानाकोपर्‍यातून तीन हजारांवर मराठी मंडळी प्रॉव्हिडन्समधे येऊन दाखल झाली आहेत. परदेशात होणारा मायमराठीचा हा सोहळा अत्यंत देखणा, नेटका आणि भव्य व्हावा यासाठी अमेरिकेतील आणि महाराष्ट्रातील शेकडो देणगीदार आणि अनेक प्रायोजकांनी हातभार लावला आहे. ‘कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक’ या अधिवेशनाची महा-प्रायोजक आहे, तर ‘कोलते-पाटील डेव्हलपर्स आणि साबळे संजीवनी’ हे सह-प्रायोजक आहेत.
४ जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन असल्याने सार्वजनिक सुटीचा दिवस असतो. अधिवेशन जिथे होणार ते कन्व्हेंशन सेंटर यादिवशी पूर्णपणे बंद असल्याने, बीएमएमच्या कार्यकर्त्यांनी २ आणि ३ जुलै दिवसरात्र खपून पाहुण्यांच्या स्वागतासाठी हे ठिकाण सज्ज केलं आहे. अमेरिकेतल्या या शहरात रस्त्यावर मराठीत स्वागताचे फलक झळकले आहेत, तर उपस्थितांच्या स्वागतासाठी कन्व्हेंशन सेंटरच्या परिसरात रांगोळ्या-कमानी घालण्यात आल्या आहेत. ढोल-ताशे आणि ले़झिमीच्या आवाजाने सेंटरचा परिसर दणाणून गेला आहे. हजारो मराठी मंडळींनी स्थानिक हॉटेल्समधे राहण्याची जागा राखून ठेवल्याने अचानक येणार्‍यांना प्रॉव्हिडन्स शहरातल्या हॉटेल्समधे आता खोल्या मिळणं कठीण झालं आहे.
या अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिली ‘इंडो-यूएस एज्युकेटर्स समिट’! बीएमएमचे अधिवेशन हा केवळ एक सांस्कृतिक सोहळा न राहता यातून मायभूमीचं ऋणही फेडता यावं असा आयोजकांचा प्रयत्न आहे. त्यामुळे बीएमएमच्या अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच इंडो-यूएस एज्युकेटर्स समिटचं आयोजन करण्यात आलंय. जगप्रसिद्ध हार्वर्ड युनिव्हर्सिटी, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नॉर्थ-इस्टर्न युविव्हर्सिटी यासहित अमेरिकेतल्या जवळपास १५ शिक्षणसंस्थांचे प्रतिनिधी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या प्रतिनिधींशी चर्चा करतील. अमेरिकेतली नॉर्थ-इस्टर्न युनिव्हर्सिटी आणि अमेरिकन केमिकल सोसायटी हा कार्यक्रम प्रायोजित करत आहेत, यावरुन अमेरिकेतल्या शैक्षणिक क्षेत्रातल्या संस्थांना ही परिषद यशस्वी करण्यात किती रस आहे ते दिसून येईल. महाराष्ट्रातून भारती विद्यापीठ, डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, शिक्षण प्रसारक मंडळी आणि एम्.आय्.टी. (पुणे) या समिटच्या प्रमुख प्रायोजकांपैकी आहेत. या सर्व आणि इतर २५ हून अधिक शिक्षणसंस्थांचे ८० हून अधिक प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित असतील. हे सर्वजणही प्रॉव्हिडन्स शहरात येऊन दाखल झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmm convention curtain raiser article on events
First published on: 05-07-2013 at 10:53 IST