राजकीय चर्चेबाबत उत्सुकता

मुंबई : नक्षलवादाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित केलेल्या नक्षलग्रस्त दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर शहा यांच्याशी ठाकरे यांची स्वतंत्रपणे भेट होते का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि मध्य प्रदेश या नक्षलग्रस्त दहा राज्यांच्या मुख्यमंत्री व पोलीस प्रमुखांची बैठक गृहमंत्री शहा यांनी आयोजित केली आहे. शहा यांच्यासह गृहसचिव अजय भल्ला, गुप्तचर विभागाचे महासंचालक अरविंद कुमार, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रमुखांसह गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील सी-६० व आंध्र प्रदेशच्या ग्रे हाऊंडस या दोन नक्षलवादी विरोधी पथकांच्या जवानांनी अलीकडे चांगली कामगिरी केल्याने नक्षलवादांच्या कारवाया कमी झाल्या आहेत. छत्तीसगडमध्ये मात्र नक्षलवादी कारवाया वाढल्या असल्याचे गृह मंत्रालयाचे निरीक्षण आहे.

 या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्र्यांनी गृहविभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेत आढावा घेतला होता. मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत भेटीत गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर स्वतंत्र बैठक होणार का, याची उत्सुकता आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले असता अधिकृत बैठकीपूर्वी उभयतांमध्ये सुमारे पाऊण तास स्वतंत्रपणे चर्चा झाली होती. यानंतर राज्यातील राजकीय संदर्भ बदलणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या.

राज्यात शिवसेना व भाजपमध्ये ताणले गेलेले संबंध, महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या मागे लागलेला केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा या पार्श्वभूमीवर शहा व ठाकरे यांच्यात स्वतंत्र बैठक झाल्यास त्याला विशेष महत्त्व असेल.