मराठी पाऊल पडते पुढे! सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत तेलुगूला टाकले मागे

हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण २००१ च्या तुलनेत वाढले आहे. २००१ मध्ये हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ४१. ०३ टक्के होते. २०११ मध्ये हे प्रमाण ४३. ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे.

संग्रहित छायाचित्र
देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठीने तेलुगू भाषेला मागे टाकले असून या यादीत मराठी भाषा आता तिसऱ्या स्थानी पोहोचली आहे. हिंदी भाषा पहिल्या स्थानी असून हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ४१. ०३ टक्क्यांवरुन ४३. ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर बंगाली भाषा ही दुसऱ्या स्थानी आहे.

२०११ मधील जनगणनेच्या आधारे देशातील कोणती भाषा किती बोलली जाते याची यादी तयार करण्यात आली आहे. हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण २००१ च्या तुलनेत वाढले आहे. २००१ मध्ये हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ४१. ०३ टक्के होते. २०११ मध्ये हे प्रमाण ४३. ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. बंगाली भाषा दुसऱ्या स्थानी आहे. बंगाली मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ८. १ टक्क्यांवरुन ८. ३ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर मराठी भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण २००१ च्या तुलनेत २०११ मध्ये वाढले आहे. २००१ मध्ये मराठी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ६.९९ टक्के होते. २०११ मध्ये हे प्रमाण ७.०९ टक्क्यांवर पोहोचले. मराठीने याबाबतीत तेलुगूला मागे टाकले आहे. तेलुगू मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण घटले आहे. तेलुगू भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण ७. १९ टक्क्यांवरुन ६. ९३ टक्क्यांवर घसरले आहे.

मातृभाषेच्या यादीत उर्दू सातव्या स्थानी असून २००१ मध्ये उर्दू भाषा सहाव्या स्थानी होती. आता गुजराती भाषा सहाव्या स्थानी आहे. देशातील २. ६ लाख लोकांनी इंग्रजी ही मातृभाषा असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून राज्यातील १. ०६ लाख लोकांची इंग्रजी मातृभाषा आहे. तर इंग्रजी मातृभाषा असलेल्यांच्या यादीत तामिळनाडू दुसऱ्या स्थानी आहे. देशात फक्त २४, ८२१ लोकांनी संस्कृत ही मातृभाषा असल्याचे म्हटले आहे. भाषा बोलणाऱ्यांच्या संख्येनुसार संस्कृत भाषा बोडो, मणिपुरी, कोकणी भाषेच्याही खाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi third most spoken language in india hindi first bangla second