‘उबर’च्या सीईओचा राजीनामा

आता ‘उबर’ कोणत्या दिशेने जाणार?

'उबर'चा माजी सीईओ ट्रॅव्हिस कॅलनिक

‘उबर’ या लोकप्रिय टॅक्सीसेवेच्या सीईओने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने टेकविश्वात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या अॅपच्या साहाय्याने टॅक्सीचा व्यवसाय करणाऱ्या अनेक ड्रायव्हर्सच्या गैरवर्तनामुळे ही कंपनी आधीच वादात सापडली होती. त्यामुळे या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांच्या गुंतवणूकदारांमध्ये आधीच नाराजीचं वातावरण होतं. त्यातच हे राजीनाम्याचं वृत्त आल्याने कंपनीच्या संकटांमध्ये आणि एकूणच त्यांची बाजारपेठेतल्या ‘इमेज’ खराब व्हायला आणखीच हातभार लागला आहे.

‘उबर’चा पसारा जगभर आहे. अमेरिकेबरोबर जगातल्या अनेक देशांमध्ये ‘उबर’अॅपचा वापर करत लाखो टॅक्सीचालक आपला व्यवसाय करतात. प्रवाशांना सोयीची असलेली ही टॅक्सीसेवा अनेक कारणांमुळे वादात सापडली आहे. मग त्यात ‘उबर’च्या चालकांनी प्रवाशांशी केलेलं गैरवर्तन असो की लैंगिक छळवणूक आणि बलात्कारासारखे गंभीर गुन्हे असो. ‘उबर’च्या इमेजला दिवसेंदिवस धक्काच पोचत होता. त्यातच ‘उबर’च्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने केलेल्या आरोपांनी तर जगभर खळबळ माजली होती.

‘उबर’च्या या महिला इंजिनिअरने ‘उबर’मध्ये होणाऱ्या लिंगभेदाच्या घटना तिच्या एका फेसबुक पोस्टने उघड केल्यावर जगभर खळबळ माजली. तिने तिचेही अनुभव तिच्या या पोस्टमध्ये शेअर केले. फक्त ती महिला असल्याच्या कारणाने तिला अनेक संधी नाकारण्यात आल्या असा आरोप या महिलेने केला होता. याविषयी तिने कंपनीच्या ‘एचआर’कडे दाद मागण्याचा प्रयत्न केल्यावरही तिला काहीच न्याय मिळाला नव्हता.

य़ा सगळ्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर ‘उबर’चा सीईओ ट्रॅव्हिस कॅलनिकवर सगळीकडून प्रचंड दबाव येत होता. गेले काही दिवस कॅलनिक मोठ्या सुट्टीवरही गेला होता. सु्ट्टीवर असताना त्याने ‘उबर’ च्या कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवत त्यांना सगळं काही आलबेल असल्याचं सांगितलं होतं. पण तो सुट्टीवर जाताच उबरचे शेअर्स कोसळले होते. आता ट्रॅव्हिस कॅलनिकच्या राजीनाम्याने सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आता उबर कोणत्या दिशेने जाणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Uber ceo travis kalanick resigns

ताज्या बातम्या