संयुक्त राष्ट्रांनी जारी केलेल्या एका अहवालानुसार भारतामध्ये सन २०२५ पर्यंत एक हजारांहून अधिक मोठे बांध आणि धरणं ५० हून अधिक वर्षांची होती. तसेच या असा जुन्या बांधकामांमुळे केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये मोठं संकट निर्माण होऊ शकतं असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिलाय. सन २०५० पर्यंत जगातील मोठी लोकसंख्या ही या एक हजार धोकादायक धरणे आणि बांधकामांच्या आजूबाजूला वसलेली असेल. तसेच या धोकादायक बांधकामांमुळे नवीन धरणांना आणि बांधांना धोका निर्माण होऊ शकतो असंही संयुक्त राष्ट्राने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

‘एजिंग वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर : एन इमर्जिग ग्लोबल रिस्क’ नावाच्या या अहवालामध्ये कॅनडामधील संयुक्त राष्ट्रांच्या विद्यापिठातील जल, पर्यावरण आणि आरोग्य संस्थांनी केलेल्या अभ्यासाचा संदर्भ दिलाय. जगातील एकूण ५८ हजार ७०० मोठे बंधारे हे सन १९३० ते १९७० दरम्यान बांधण्यात आले आहेत. हे सर्व बंधारे केवळ ५० ते १०० वर्षांसाठी वापरता येतील या दृष्टीने बांधण्यात आलेले. सामान्यपणे काँक्रीट वापरुन बनवण्यात आलेले बंधारे हे ५० वर्षांपेक्षा अधिक काळ झाल्यानंतर जुने झाल्याचं समजलं जातं. याच कारणामुळे जगातील हजारो बंधारे हे धोकादायक स्थितीमध्ये आहेत. या बंधाऱ्यांच्या भिंती कोलमडून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या अहवालामध्ये जुन्या बंधाऱ्यांची देखरेख करणे आणि दुरुस्तीसाठी अनेकदा खर्च वाढत जातो तर दुसरीकडे या बंधाऱ्याची पाणी साठवण्याची क्षमता कमी होत जाते. संयुक्त राष्ट्र विद्यापिठातील या अभ्यासामध्ये सन २०५० पर्यंत जगातील बहुतांश लोकं हे या बांधांमुळे प्रभावित होणाऱ्या परिसरामध्ये असतील असंही म्हटलं आहे.

या अहवालामध्ये भारत, अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, जपान, झांम्बिया आणि झिम्बॉब्वेमधील अनेक बंधाऱ्यांचा अभ्यास करण्यात आलाय. या अहवालानुसार एकूण ५५ टक्के म्हणजेच ३२ हजार ७१६ बंधारे आशियामधील चीन, भारत, जपान आणि दक्षिण कोरिया या देशामध्ये आहेत. या देशांमधील अनेक बंधारे हे ५० वर्षांहून अधिक जुने आहेत.

अहवालानुसार केवळ भारतामध्ये एक हजार ११५ बंधारे २०२५ पर्यंत  ५० वर्षांहून अधिक जुने होणार आहेत. तर ६४ हून अधिक बंधारे हे २०५० पर्यंत दीडशे वर्षांहून जुने होती. केरळमधील मुल्लापेरियार बंधारा शंभर वर्षांपूर्वी बनवण्यात आलाय. या बंधाऱ्याला काही नुकसान झाल्यास ३५ लाखांहून अधिक लोकांना फटका बसेल.